Pradnya Satav Victory : प्रज्ञा सातव यांचा विजय राहुल गांधी यांच्यासाठी होता महत्वाचा...

Pradnya Satav victory was important for Rahul Gandhi : प्रज्ञा सातव यांना दुसर्‍यांदा विधान परिषदेची उमेदवारी देऊन राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षासाठी काम करणारा नेता, पदाधिकारी, सामान्य कार्यकर्ता आणि त्याचे कुटुंब किती महत्त्वाचे आहे हे देखील दाखवून दिले आहे.
Pradnya Satav.jpg
Pradnya Satav.jpgSarkarnama
Published on
Updated on

Pradnya Satav : विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या एकमेव उमेदवार प्रज्ञा सातव अपेक्षेप्रमाणे विजयी झाल्या. सातव यांची जागा धोक्यात असल्याच्या चर्चा, काँग्रेसचे आमदार क्रॉस वोटिंग करणार, अशा संशयाच्या वातावरणात मिळालेला हा विजय मोठा म्हणावा लागेल. त्याही पेक्षा काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासाठी प्रज्ञा सातव यांचा विजय महत्वाचा होता.

राहुल गांधी यांचे पक्षातील तरुण व विश्वासू सहकारी राहिलेले दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या आकस्मिक निधनानंतर त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी संपुर्ण गांधी परिवार भक्कमपणे उभा राहिला होता. राजीव सातव यांच्या निधनानंतरच्या सांत्वनपण भेटीत राहुल गांधी यांनी प्रज्ञा सातव, त्यांची मुलं आणि कुटुंबाला आपण वाऱ्यावर सोडणार नाही, अशा शब्द दिला होता. तो राहुल गांधी यांनी एकदा नव्हे तर दोनदा खरा करून दाखवला.

प्रज्ञा सातव यांना दुसर्‍यांदा विधान परिषदेची उमेदवारी देऊन राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षासाठी काम करणारा नेता, पदाधिकारी, सामान्य कार्यकर्ता आणि त्याचे कुटुंब किती महत्त्वाचे आहे हे देखील दाखवून दिले आहे. राजीव सातव सारख्या तरुण, अभ्यासू आणि पक्षासाठी वाहून घेणाऱ्या सच्चा कार्यकर्त्याचे कोरोना काळात झालेले अकाली निधन पक्षासाठी मनाला चटका लावणारे ठरले होते. वैयक्तिक राहुल गांधी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी हा मोठा आघात होता.

राजीव सातव आमच्या कुटुंबातील एक व्यक्ती होता. त्याच्या निधनाने कुटुंबातीलच एक व्यक्ती गमावल्याचे दुःख होत असल्याची प्रतिक्रिया तेव्हा गांधी कुटुंबाने व्यक्त केली होती. राजीव सातव यांच्याशी असलेल्या भावनिक नात्यातूनच राहुल गांधी यांनी त्यांच्या पश्चात सातव कुटुंबाची जबाबदारी घेतली. तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही हा दिलेला शब्द पुर्ण करण्यासाठी काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर प्रज्ञा सातव यांना राहुल गांधी यांनी उमेदवारी दिली.

Pradnya Satav.jpg
Monsoon Assembly Session : राम कदम 'संतापले', उत्तर देताना नाना पटोलेही 'भडकले', विधानसभेत वातावरण तापलं; घडलं काय?

एवढेच नाही तर त्यांना बिनविरोध निवडून आणत खऱ्या अर्थाने दिवंगत राजीव सातव यांना श्रद्धांजली वाहिली, अशी भावना तेव्हा प्रत्येक काँग्रेस नेता, पदाधिकारी आणि कार्यकर्त्याच्या मनात होती. रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर प्रज्ञा सातव यांना जेमतेम दोन-अडीच वर्ष काम करण्याची संधी मिळाली. कार्यकाळ संपल्यामुळे काँग्रेस प्रज्ञा सातव (Pradnya Satav) यांना पुन्हा उमेदवारी देणार? की दुसऱ्या कुणाची वर्णी लागणार? याची चर्चा होती. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसला प्रचंड यश मिळाले.

काँग्रेसचा (Congress) पारंपारिक मुस्लिम मतदार जो एमआयएमकडे वळाला होता, तो पुन्हा काँग्रेसकडे आल्याचे मतदानाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले. महाविकास आघाडीत 12 खासदार आणि एक बंडखोर निवडून आल्याने काँग्रेस मोठा भाऊ ठरला. मुस्लिमांची लक्षणीय मते मिळाल्यामुळे विधान परिषदेच्या एका जागेवर या समाजाला प्रतिनिधित्व मिळावे, असा एक मत प्रवाह काँग्रेस पक्षात होता. तशी मागणी काही पदाधिकार्‍यांनी प्रदेश कमिटीकडे पत्र पाठवून केली होती. त्यामुळे प्रज्ञा सातव यांच्याऐवजी मुस्लिम चेहर्‍याला संधी दिली जाईल, असे बोलले जात होते. परंतु या सगळ्या चर्चाच ठरल्या, राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा प्रज्ञा सातव यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत खऱ्या अर्थाने त्यांना न्याय दिला असेच म्हणावे लागेल.

सातव यांच्या विजयाने हिंगोलीत काँग्रेस भक्कम...

लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. त्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा काँग्रेस सोडून भाजपमध्ये झालेला प्रवेश ही मोठी आणि राजकारणातील भूकंप म्हणावी अशी घटना होती. मराठवाड्यात अशोक चव्हाण यांच्यासारखा मोठा नेता पक्ष सोडून गेल्यानंतर अनेक जिल्ह्यात याचा परिणाम होणार होता, त्यात हिंगोलीचा उल्लेख केला जातो. राजीव सातव (Rajiv Satav) यांच्या निधनानंतर अशोक चव्हाण यांनी हिंगोली जिल्ह्यात अधिक लक्ष घातले होते.

लोकसभा निवडणुकीत हिंगोलीतून आपल्या समर्थकाला उमेदवारी मिळवून देण्यासाठी चव्हाण यांनी महाविकास आघाडीत असतांना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना जालन्याच्या बदल्यात हिंगोलीची जागा सोडण्याची गळ घातली होती. चव्हाण यांनी ही जागा काँग्रेसला सुटणार अशा दृष्टीने हिंगोलीत तयारी सुरू केली होती. तेव्हा प्रज्ञा सातव समर्थक आणि अशोक चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांमध्ये भडका उडाला होता.

Pradnya Satav.jpg
Maharashtra MLC Elections : विधान परिषदेसाठी दुपारी बारापर्यंत 160 आमदारांनी केले मतदान; सर्वाधिक मतदान भाजपचे

अशोक चव्हाण यांची हिंगोली जिल्ह्यातील घुसखोरी सातव समर्थकांना मान्य नव्हती. औढा-कळमनुरी विधानसभा मतदारसंघासह (Vidhansabha Constituency) हिंगोली जिल्ह्यात राजीव सातव यांनी काँग्रेस पक्षाची मजबूत केलेली बांधणी कायम ठेवून पक्षाची ताकद अजून वाढवण्याची जबाबदारी प्रज्ञा सातव यांनी स्वीकारली होती. पहिल्यांदा विधान परिषदेची काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाली तेव्हा राजीव सातव याचे अपूर्ण राहिलेले स्वप्न आपल्याला पूर्ण करायचे आहे, असा संकल्प त्यांनी केला होता.

हिंगोली जिल्ह्यात काँग्रेसची संघटनात्मक बांधणी मजबूत होऊन येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अधिकाधिक यश मिळवण्यासाठी प्रज्ञा सातव यांची विधान परिषदेवर दुसर्‍यांदा झालेली निवड महत्त्वाची ठरणार आहे. राजीव सातव यांच्या निधनानंतर नोव्हेंबर 2021 मध्ये विधान परिषदेवर आमदारांद्वारे प्रज्ञा सातव (Pradnya Satav) यांची बिनविरोध निवड झाली. हा विजय हीच त्यांची राजकारणातील एन्ट्री होती. राजीव सातव खासदार असताना प्रज्ञा त्यांना राजकारणात मदत करायच्या पण त्या सक्रिय नव्हत्या.

विधान परिषदेवर संधी मिळाल्यानंतर खऱ्या अर्थाने त्या सक्रिय झाल्या. राहुल गांधी यांनी त्यांना सक्रिय केले असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. ऑगस्ट 2021 पासून त्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत. पती राजीव सातव यांचे 16 मे 2021 रोजी वयाच्या 46 व्या वर्षी कोरोना संसर्गामुळे निधन झाले होते. 23 सप्टेंबर 2021 रोजी शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर काँग्रेसने सातव यांना उमेदवारी दिली होती. भाजपचे उमेदवार संजय खेडेकर त्यांच्या विरोधात होते. पण निवडणुकीपूर्वी त्यांनी माघार घेतल्याने सातव बिनविरोध निवडून आल्या होत्या.

राजीव सातव यांच्या कामाला पावती..

2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत हिंगोली मधून राजीव सातव काँग्रेसचे खासदार म्हणून निवडून गेले होते. मोदी लाटेत निवडून आलेल्या महाराष्ट्रातील काँग्रेसच्या दोन खासदारांपैकी ते एक होते. त्यांनी शिवसेनेचे (Shivsena) खासदार आणि दोन वेळा आमदार राहिलेले सुभाष वानखेडे यांचा पराभव केला होता. त्या आधी 2009 च्या विधानसभा निवडणुकीत कळमनुरी मतदारसंघातून ते निवडून आले होते.

Pradnya Satav.jpg
Maharashtra MLC Elections : विधान परिषदेसाठी दुपारी बारापर्यंत 160 आमदारांनी केले मतदान; सर्वाधिक मतदान भाजपचे

गुजरात राज्याचे अखिल भारतीय काँग्रेस समिती प्रभारी आणि काँग्रेस कार्यकारिणीचे स्थायी निमंत्रित म्हणून सातव यांच्यावर मोठी जबाबदारी राहुल गांधी यांनी दिली होती. गुजरातचे प्रभारी म्हणून त्यांची नियुक्ती होण्यापूर्वी ते गुजरात विधानसभा निवडणूक 2017 दरम्यान सौराष्ट्र प्रदेशाचे प्रभारी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस समितीचे सचिव होते. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. राजीव सातव हे पंजाब विधानसभा निवडणुका 2017 साठी स्क्रीनिंग कमिटीचे सदस्य देखील होते.

फेब्रुवारी 2010 ते डिसेंबर 2014 पर्यंत ते भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते. भारतीय युवक काँग्रेसच्या अध्यक्ष पदावर विराजमान होण्यापूर्वी ते मे 2008 ते फेब्रुवारी 2010 पर्यंत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते. याशिवाय मसुदा समिती, उप गट: राजकीय समिती आणि अखिल भारतील काँग्रेस कमिटीचे ते 2018 साठी घटना दुरूस्ती समिती सदस्य म्हणून नियुक्त होते. भारत - युरोपियन यूनियन संसदीय मैत्री गट आणि भारतीय संसदीय गटाचे सदस्य असलेल्या राजीव सातव यांना 2020 मध्ये राहुल गांधी यांनी राज्यसभेवर संधी दिली होती. राजीव सातव यांनी काँग्रेस पक्षात दिलेल्या योगदानाची पोच पावती म्हणूनच राहुल गांधी यांनी प्रज्ञा सातव यांना महाराष्ट्र विधान परिषदेत दुसर्‍यांदा संधी देत त्यांचा सन्मान केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com