Sambhajiraje Chhatrapati
Sambhajiraje Chhatrapati Sarkarnama
महाराष्ट्र

'मविआ'च्या नेत्यांना टाळलं, भाजपपासून अंतर राखून; संभाजीराजेंच्या मनात नेमकं चाललंय काय?

सरकारनामा ब्युरो

किल्ले शिवनेरी : आज शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळा पार पडला. यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil), पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे, खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांच्यासह इतर उच्चस्तरीय अधिकारी आमदार आणि खासदार उपस्थित होते. मात्र जन्मोत्सव सोहळ्याला उपस्थित असलेले संभाजीराजे छत्रपती नंतरच्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमास मात्र उपस्थित नव्हते.

अजित पवार आणि अन्य मंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या शासकीय सभेलाही उपस्थित राहणे संभाजीराजे यांनी जाणीवपूर्वक टाळले, असे म्हटलं जात आहे. ते जन्मोत्सव सोहळ्याचा कार्यक्रम झाल्यानंतर तडक गडावरुन खाली उतरले. या कृतीमुळे कार्यक्रमस्थळी त्यांच्या अनुपस्थितीची चांगलीच चर्चा रंगली. मराठा समाजाच्या मागण्यांसाठी संभाजीराजे छत्रपती २६ फेब्रुवारी पासून आझाद मैदानात आमरण उपोषणास बसणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी आज शासकीय कार्यक्रमातून काढता पाय घेतला का असा प्रश्न विचारला जावू लागला आहे.

याशिवाय संभाजीराजे छत्रपती भाजपपासून देखील अंतर राखून असल्याचे दिसून येत आहे. त्यांची राज्यसभेतील राष्ट्रपती नियुक्त खासदारकीची मुदत येत्या जून महिन्यामध्ये संपत आहे. मात्र गेल्या ६ वर्षांच्या काळात ते पक्षीय चौकटीत ते अडकले नाहीत. किंवा कोणत्याही निवडणुकीत ते भाजपला मते द्या म्हणून सांगायला गेले नाहीत. या कारणांमुळे भाजपकडून त्यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता नसल्याचे सांगितले जात आहे.

आपल्याला मिळालेली खासदारकी ही भाजप सरकारने दिली असली तरीही तो शाहू घराण्याचा सन्मान म्हणून दिली असल्याची त्यांची भूमिका राहिली. थेट शिवाजी महाराजांचे वंशज, राजर्षी शाहूंच्या विचारकार्याचे वारसदार व त्यांच्या स्वत:च्या व्यक्तिमत्वाचे राज्यभरातील मराठा समाजात असलेले वलय याची दखल घेऊन भाजपने त्यांना हा बहुमान दिला, असा दावा त्यांनी सातत्याने केला. त्यामुळे त्यांची आगामी राजकीय वाटचाल नेमकी कशी असणार यावरुन चर्चा सुरु आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT