Rahul Gandhi | Eknath Shinde Sarkarnama
महाराष्ट्र

Rahul Gandhi : राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाखांचं बक्षीस; शिंदे गटातील आमदाराचं खळबळजनक विधान

Akshay Sabale

Controversial Remark by Shinde Group MLA: शिवसेना ( शिंदे गट ) आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा धक्कादायक विधान केलं आहे. तेही काँग्रेस खासदार, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबाबत. "राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख रूपयांचे बक्षीस देण्यात येईल," असं वक्तव्य संजय गायकवाड यांनी केलं आहे. सातत्यानं वादग्रस्त विधाने करणाऱ्या आमदार गायकवाड यांच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वचक आहे की नाही? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

शिवसेना शिंदे गटातील आमदार सातत्यानं वादग्रस्त कारणाम्यामुळे चर्चेत असतात. त्यात बुलढाण्यातील आमदार संजय गायकवाड ( Sanjay Gaikwad ) यांचा प्रथम क्रमांक आहे. धमक्या देणे, मारहाण करणे, अशा गोष्टींसाठी ते कुप्रसिद्ध आहेत. आपल्यातील गुंड प्रवृत्तीचं ओंगाळवाणे प्रदर्शन आमदार गायकवाड यांनी सातत्यानं केलं आहे.

आता मात्र आमदार गायकवाड यांनी राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांची जीभ छाटणाऱ्याला बक्षीस घोषित केल्यानं नव्या वादाला तोंड फुटलं आहे. पण, आमदार गायकवाड यांच्यावर मुख्यमंत्री शिंदे यांचा धाक आहे की नाही? असा सवाल उपस्थित होत आहे.

संजय गायकवाड यांनी काय म्हटलं?

संजय गायकवाड म्हणाले, "महाराष्ट्रात आणि देशात आरक्षणाच्या मागणीची आग लागलेली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात मागासवर्गीय, आदिवासी आणि अन्य प्रवर्गातील लोकांना आरक्षण दिलं. मात्र, राहुल गांधींनी विदेशात जाऊन, 'माझ्या देशातील आरक्षण संपवायचं आहे,' असं विधान केलं. काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला असून राहुल गांधींनी त्यांच्या पोटातील मळमळ यांनी बाहेर ओकली."

"लोकसभा निवडणुकीत संविधान धोक्यात आहे, असा फेक नरेटिव्ह सेट करून काँग्रेसनं मते घेतली. आज ते आरक्षण संपविण्याची भाषा करू लागले आहेत. 100 टक्के काँग्रेसला मागासवर्गीय, ओबीसी आणि आदिवासींचं आरक्षण संपवायचं आहे. राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाखांचं बक्षीस देईल," असं विधान संजय गायकवाड यांनी केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT