शिवसेना शिंदे गटातील आमदार विविध कारणांमुळे चर्चेत असतात. त्यात बुलढाण्यातील आमदार संजय गायकवाड यांचा समावेश आहे. धमक्या देणे, मारहाण करणे यासाठी ते कुप्रसिद्ध आहेत.
आपल्यातील गुंड प्रवृत्तीचं त्यांनी अनेकदा ओंगाळवाणे प्रदर्शन केलेले आहे. यातच आमदार गायकवाड यांनी 'लाडक्या पुत्राला' वाढदिनादिवशी तलावारीनं केक भरवला आहे. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
गुरूवारी ( 15 ऑगस्ट ) संजय गायकवाड ( Sanjay Gaikwad ) यांनी त्यांचा मुलगा मृत्यूंजय गायकवाड यांचा वाढदिवस बुलढाण्यातील जैस्तंभ चौकात साजरा केला. हे बुलढाण्यातील वर्दळीचं ठिकाण समजलं जातं. अशा वर्दळीच्या ठिकाणी युवासेनेचे जिल्हाप्रमुख मृत्युंजय गायकवाड यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यातच सगळ्याचं लक्ष वेधलं ते मृत्युंजय गायकवाड यांना तलवारीनं भरवलेल्या केकनं. तेही आमदार संजय गायकवाड यांनी.
संजय गायकवाड यांनी तलवारीनं केक कापून मुलाला भरवला. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. संजय गायकवाड हे शिवसेनेकडून ( Shivsena ) सलग दुसऱ्यांदा बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. शिवसेनेत बंड झाल्यानंतर आमदार गायकवाड यांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटात उडी मारली.
पण, बेताल वक्तव्ये करणे, धमक्या देणे, मारहाण करणे, अशा गोष्टींसाठी संजय गायकवाड 'फेमस' आहेत. यातच आमदार संजय गायकवाड यांनी 'लाडक्या मुलाला' तलवारीनं केक भरविल्यानं लोकप्रतिनिधींकडून जनतेनं कोणता 'आदर्श' घ्यायचा? कायदा सुव्यवस्था फक्त जनतेसाठी असते का? आमदार गायकवाड यांच्यावर काय कारवाई होणार? असे सवाल उपस्थित होत आहे.
काँग्रेस नगरसेवकांना गायकवाडांची धमकी...
मोताळा नगरपंचायतीतील काँग्रेसच्या 12 पैकी आठ सदस्यांनी काँग्रेस सोडून आमदार गायकवाड यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला होता. विकासासाठी निधी देणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यावेळी दिले होते. पण, निधी मिळाला नाही. तसेच आमदार गायकवाड यांनीही शहरात विकासकामे केली नाहीत, असा संबंधित सदस्यांनी आरोप केला होता. त्यामुळे हे नगरसेवक पुन्हा स्वगृही काँग्रेसमध्ये परतले. यात महिला सदस्यांची संख्या जास्त होती. असे असूनही चिडलेल्या आमदार गायकवाडांनी त्यांना थेट धमकीच दिली. शिवसेना सोडून जाणाऱ्या या नगरसेवकांचे येत्या 15 दिवसांत काय होते बघा, असा गंभीर इशारा त्यांनी दिला होता.
तरूणाला मारहाण...
शिवजयंतीच्या कार्यक्रमात आमदार गायकवाड यांनी काही जणांसह एका तरूणाला मारहाण केली होती. पोलिसांच्या हातातील काठी घेऊन आमदार गायकवाड यांनी तरूणाला बेदम मारलं होतं. याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आमदार गायकवाड यांनी तरूण चाकूहल्ला करण्याच्या प्रयत्नात होता, असं स्पष्टीकरण दिलं होतं.
वाघाची शिकार करून दात गळ्यात घातला...
‘1987 मध्ये मी एका वाघाची शिकार केली होती आणि त्याचा दात काढून गळ्यात घातला,’ असं वक्तव्य आमदार गायकवाड यांनी केलं होतं. तसेच, 'वाघ होता की बिबट्या?' असा प्रश्न विचारल्यावर आमदार गायकवाड म्हणालेले, 'वाघाची शिकार केली होती. बिबट्या वैगरेंना तर मी असेच पळवून लावत होतो.'
आमदार गायकवाड यांच्या वक्तव्यांची दखल घेत वनविभागानं थेट त्यांच्याविरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. याशिवाय आमदार गायकवाड यांच्या गळ्यातील ती वाघाची दातसदृश्य वस्तूसुद्धा वन विभागाचे पथकाने जप्त केली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.