Devendra Fadnavis-Sanjay Raut
Devendra Fadnavis-Sanjay Raut  sarkarnama
महाराष्ट्र

राऊत तोंडावर पडणार? २५ हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप पण प्रत्यक्ष आकडेवारी वेगळीच...

सरकारनामा ब्युरो

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेवून भाजपवर जोरदार हल्ला चढवला. यात त्यांनी राज्यातील भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), सुधीर मुनगंटीवर, किरीट सोमय्या, मोहित कंबोज यांच्यावर ओळीने आरोप केले. यावेळी राऊत यांनी फडणवीस यांच्या काळात महाआयटीमध्ये २५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला असा आरोप केला. या सगळ्याचे पुरावे आपल्याकडे आहेत आणि आपण ते तपास यंत्रणांना देणार आहोत असेही त्यांनी सांगितले.

पण दूसऱ्या बाजूला मागील फडणवीस यांच्या ५ वर्षांच्या काळात महाआयटी विभागाला राज्य सरकारने केलेल्या आर्थिक तरतुदींवर नजर टाकली तर मात्र २५ हजार कोटी रुपयांचा आकडा याबद्दल शंका उपस्थित होत आहे. कारण राज्य सरकारने गेल्या पाच वर्षात आयटी विभागाला फक्त ३५५ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. यात २०१५-१६ या वर्षांत ६.३२ कोटी, २०१६-१७ या वर्षांत १४.५९ कोटी, २०१७-१८ या वर्षांत १५५.८६ कोटी, २०१८-१९ या वर्षांत ८४.६४ कोटी आणि २०१९-२० या वर्षांत ७४.४५ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता.

याशिवाय विविध विभागाने आयटी विभागाला ७२४ कोटी रुपयांची कामे दिली आहेत. हे दोन्ही एकत्र केलं तरी १ हजार १०० कोटी रुपयांची काम आयटी विभागाला देण्यात आली आहेत. त्यामुळे संजय राऊत यांनी २५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला, त्यात खरंच तथ्य आहे का असा प्रश्न पडतो.

याच आकडेवारीनंतर भाजपचे डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांनी संजय राऊत यांच्यावर धडधडीत खोटं बोलतं असल्याचे आरोप केले आहेत. ते म्हणाले, माहिती आणि तंत्रज्ञान खात्याचे ५ वर्षाचे बजेट ३५५ कोटी आहे. मात्र ते म्हणतात २५ हजार कोटींची घोटाळा झाला आहे. त्यांनी या सर्व गोष्टीची माहिती घेतली पाहिजे आणि खोटे बोलणे सोडून द्यायला हवे, असा सल्ला त्यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT