Sanjay Raut
Sanjay Raut  Sarkarnama
महाराष्ट्र

Mahavikas Aaghadi News : संजय राऊत एकाकी; महाविकास आघाडीनंही ऐनवेळी सोडली साथ

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Assembly Session : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विधानाचे विधानसभेच्या अधिवेशनातही तीव्र पडसाद उमटले. ऐनवेळी महाविकास आघाडीतील त्यांच्या सहकाऱ्यांनीही राऊतांच्या विधानावर हात वर केले. काँग्रेस, राष्ट्रवादीने राऊतांच्या विधानांवर सत्ताधारी पक्षाला समर्थन दिले. यामुळे महाविकास आघाडीच्या निर्मितीतील महत्वाची जबाबदारी पार पाडणारे राऊत एकाकी पडल्याचं स्पष्ट झालं आहे.

हे विधीमंडळ नाही, चोरमंडळ आहे असं विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले होते. यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. तसेच विधानसभेच्या अधिवेशनातही राऊतांच्या वक्तव्यावरुन मोठं घमासान रंगलेलं पाहायला मिळालं. यावेळी भाजप आमदार आशिष शेलार यांनी राऊत यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.

संजय राऊत(Sanjay Raut) यांनी केवळ महाराष्ट्राचा अपमान केला नाही तर महाराष्ट्र द्रोह केला आहे. उद्या कुणीही सभागृहातील सदस्यांना काहीही म्हणेल. त्यामुळे आताच जरब बसणे आवश्यक आहे असं आशिष शेलार म्हणाले. त्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शेलार यांच्या वक्तव्याचं समर्थन केलं. याचवेळी माजी मंत्री व काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांनीही राऊत यांच्या विधानाशी असहमत असल्याचं सांगितलं. त्यामुळे राऊत एकाकी पडल्याचं दिसून आलं आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार(Ajit Pawar) यांनी राऊतांच्या विधानावर भाष्य करताना म्हणाले, आपण सर्व विधिमंडळाचे सदस्य आहोत. कोणी कोणत्याही पक्षातून निवडून येऊ द्या. कोणत्याही नेत्याला, व्यक्तीला चोरमंडळ म्हणण्याचा अधिकार नाही. टीव्हीवर एक बातमी आली आहे. एका व्यक्तीने विधिमंडळाला चोरमंडळ म्हटलं. शेलार यांच्या मताशी सहमत आहे. पक्षीय गोष्टी बाजूला ठेवून काही गोष्टी पाळल्या पाहिजे.

संविधानाने बोलण्याचा अधिकार दिला. पण काहीही बोलणं योग्य नाही. जे बोलले ते खरोखरच बोलले आहे का? त्यात तथ्य आहे का? जे बोलले त्यांची बाजू घेत नाही. पण शहानिशा केली पाहिजे. कारण नसताना एखाद्या व्यक्तीला टार्गेट करता कामा नये. पण ती व्यक्ती तशी बोलली असेल तर कोणत्याही पक्षाची असो कोणत्याही पदावरील असो त्यांना समज दिली पाहिजे असं अजित पवार म्हणाले.

बाळासाहेब थोरात म्हणाले, कुणीही असो विधिमंडळ सर्वोच्च सभागृह आहे. थोर परंपरा असलेलं सभागृह आहे. त्याचा अभिमान सर्वांना आहे. खरंच तसं म्हटलं की नाही ते तपासून पाहिलं पाहिजे. सध्याच्या काळात शब्दांचा वापर दोन्ही बाजूने होतो. अध्यक्ष महोदय चोर मंडळ म्हणणं योग्य नाही. तसंच विरोधी पक्षातील सदस्यांना देशद्रोही म्हणणं योग्य नाही. शब्दांचा वापर सर्वांनीच योग्य पद्धतीने केलं पाहिजे. चोर मंडळ म्हणणं आम्हाला मान्य नाही असं थोरात म्हणाले.

नाना पटोले काय म्हणाले ?

संजय राऊतांच्या विधानावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole) म्हणाले,राऊतांनी जे वक्तव्य केलं, ते निषेधार्थ आहे. त्याचं कुणीही समर्थन करण्याचं काहीही कारण नाही. विधीमंडळाचा नाहीतर राज्यातील जनतेचा अवमान करण्याचा कुणालाच अधिकार नाही. राऊतांच्या विधानाबाबत कारवाई करण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना होता.

भाजपा(BJP) च्या सदस्यांकडून हक्कभंगही आणला होता. त्यावर तातडीने निर्णय द्यायला हवा होता. याला सभागृहात कुणाचाही विरोध नव्हता. तरीही त्यांनी पूर्ण दिवसाचं सभागृहातील कामकाज तहकूब केलं. म्हणजे एकप्रकारे राज्यातील जनतेच्या घामाच्या पैशांची उधळपट्टी सुरू आहे अशी टीकाही पटोले यांनी भाजप व शिवसेनेवर केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT