Sanjay Raut Sarkarnama
महाराष्ट्र

Sanjay Raut : ''वंदे मातरम्'ला विरोध, आता आमदार केलाय'; राऊत म्हणाले, 'कुठे तो हिंदुंचा गब्बर?'

Pradeep Pendhare

Mumbai News : राज्यपाल नियुक्ती सात आमदारांच्या महायुती सरकारच्या कार्यवाहीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी थेट भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांच्यावर हल्ला चढवला.

"ज्याने वंदे मातरम् गीताला विरोध केला, त्यांना राज्यपाल नियुक्त आमदार केले. हे यांचे हिंदुत्व आहे का? कुठे गेला हिंदुंचा गब्बर? कुठे देवेंद्र फडणवीस?", असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

महायुती (Mahayuti) सरकारने विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या पाच तासापूर्वी सात जणांना विधान परिषद सदस्याची शपथ दिली. त्यावर संजय राऊत यांनी महायुती सरकारच्या, भाजपच्या असंविधानिक कृतीवर बोट ठेवत हल्ला चढवला. याचवेळी वंदे मातरम् या स्फूर्ती गीताला सांगली महापालिकेत विरोध करणाऱ्याला विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्ती आमदार केल्यावरून संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला.

संजय राऊत म्हणाले, "ही नियुक्ती बेकायदेशीर आणि घटनाबाह्य आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) घर घर संविधानाचा नारा देत आहेत. तसा कार्यक्रमच राबवत आहेत. उच्च न्यायालयात, सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल असताना, घाईघाईने, आचारसंहिता लागू होण्याच्या पाच तास अगोदर, सात आमदारांना शपथ घेण्याचा निर्णय घटनाबाह्य आहे. पहिली यादी राजभवनात प्रलंबित आहे. दुसरी यादी घाईघाईने पाठवली. ज्या कारणांसाठी पहिली यादी थांबवली, त्यातील सदस्यांची चौकशी करण्यात आली. त्यांच्याविरोधात खटले आहे का? हे अगोदरच्या राज्यपालकांनी केले. मग या सात आमदारांच्या संदर्भात राज्यपालांनी कोणती विशेष माहिती घेतली?"

"हे सर्व कार्यकर्ते आहेत. धर्मगुरू आहेत. यातील एक सदस्य, इद्रिस नाईकवडी त्यांचा इतिहास काय आहे? त्यांनी वंदे मातरम् या स्फूर्ती गीताला विरोध केला होता. सांगली महापालिकेत, त्यांनी वंदे मातरम् गीताला विरोध केला आहे. त्याला तुम्ही राज्यपाल नियुक्त आमदार करता, कुठे गेला हिंदुंचा गब्बर? कुठे देवेंद्र फडणवीस? वंदे मातरम् गीताला विरोध करणाऱ्याला राज्यपाल नियुक्त आमदार करता, त्याच्या मांडीला मांडी लावून बसता. भंकस लोक!", अशी खोचक टीका संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.

तसंच नाईकवडीने हिंदू संघटनेच्या कार्यालयावर देखील हल्ला केल्याची आठवण संजय राऊत यांनी करून दिली. काय तुमची नियत आणि नीती? इतर सहा जणांच्या कुंडल्या काढू शकतो. वंदे मातरम् स्फूर्ती गीताला विरोध करणाऱ्यांना राज्यपाल नियुक्त आमदार करा, यांनी राष्ट्रभक्तीवर आता पिपाण्या वाजवायच्या नाहीत, असा सल्ला देत टिळेवाल्यांनी त्यांना आता विरोध करावा. त्यांना मागं बोलवा. तर समजेल, तुम्ही खरे हिंदुत्वाची औलाद आहात, असं आव्हान संजय राऊत यांनी दिलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT