Mahavikas Aghadi Sarkarnama
महाराष्ट्र

Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीची बिघाडी होण्याने शिवसेनेच्या पदरात काय पडणार? सेनेला आत्ताच मित्र पक्षांची ॲलर्जी का?

Split in Mahavikas Aghadi : राज्यात एकीकडे महायुती एक संघ राहुन विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळवले आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला समन्वय ठेवता आलेला नाही. यामुळे महाविकास आघाडीत आता फुटीचे तडे जाताना पाहायला मिळत आहे

Aslam Shanedivan

Sanjay Raut On Mahavikas Aghadi : राज्यातील महाविकास आघाडीला घरघर लागण्याची टीक टीक आता वाजत आहे. आता कोणत्याही क्षणी आघाडी विस्कटू शकते अशी शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीवरून भाष्य करताना आघाडीलाच मशाल लावली आहे. चांदा ते बांद्यापर्यंत स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणूका स्वबळावर लढवू असे संकेत राऊत यांनी दिले आहेत. यामुळे महाविकास आघाडीवर मोठा परिणाम होणार असून याआधीच शिवसेना दबावतंत्र तयार करत आहे.

शिवसेनेत नाराजी

राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्या आहेत. भाजपला महाविकास आघाडीने लोकसभेवेळी योग्य समन्वयामुळे रोखले. पण तेच चित्र विधानसभेवेळी दिसले नाही आणि आघाडीचा सुफडा साफ झाला. पण आता राऊत यांनी आमच्या लोकांना जागा मिळाल्या नसल्याने जागा कमी आल्या आणि पक्षात नाराजी असल्याचे म्हटले आहे.

20 आमदार निवडून आले

लोकसभा आणि विधानसभा वेळी शिवसेनेला जागा वाटपात योग्य वाटा मिळाला नाही, प्रचारात अंतर्गत कलहामुळे अनेकांनी वेगळी भूमिका घेतल्या फटका शिवसेनाला बसल्याचा राग आता शिवसेना आळवत आहे. तर विधानसभेवेळी शिवसेनेचे फक्त 20 आमदार निवडून आले असून एकट्या मुंबईत जवळ जवळ 13 आमदार आहेत. तर इतर 7 एक आमदार राज्यभर आहेत.

दबावतंत्र

महाविकास आघाडीत सगळ्यात जास्त आमदार हे शिवसेना ठाकरे गटाचे आहेत. यामुळे शिवसेना आता आघाडीवर दबातंत्र निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. जे लोकसभा आणि विधानसभेला झाले नाही ते स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत मिळवण्याची धडधड शिवसेनेची दिसत आहे. पक्षातील नाराजी दूर करण्यासाठी आघाडीतून बाहेर पडण्याची जोखीम शिवसेना घेण्यास तयार आहे.

मुंबईवर डोळा, पण सहकारी नको

राऊत यांच्या घोषणेप्रमाणे शिवसेना तयारीला लागली आहे. चांदा ते बांद्यांपर्यंत सर्वच स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना उतरणार आहे. पण शिवसेनेसाठी मुंबई महानगरपालिका महत्वाची असून शिवसेना यासाठीच आता मैदानात उतरली आहे. येथे पक्षाचे 12 ते 13 आमदार असल्याचे ताकद लागू शकते अशी शक्यता आहे. तसेच अनेक नवे चहरे आगामी निवडणुकीत शिवसेनेची मशाल हाती घेऊ शकतात. अशा अपेक्षेमुळे राऊत यांनी रणनीती आखण्याची तयारी केली आहे.

प्रमुख महानगरपालिकेत सहकाऱ्यांची साथ नको?

राज्यात स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका कधीही जाहीर होऊ शकता. पण याआधीच शिवसेनेनं 'एकला चलो' ची भूमिका घेतली आहे. याआधी देखील शिवसेनेकडून अशी वक्तव्य समोर येत होती. पण आज राऊत यांनी चित्र स्पष्ट केले. यामुळे मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, कोल्हापूरसह महत्वाच्या मोठ्या महानगरपालिका काबीज करायच्या आहेत. पण त्यावेळी त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ नको आहे.

जागा कमी होण्याची भीती

तर पुन्हा एकदा आघाडीकरून निवडणुकीत उतरल्यास आपल्याला जागा कमी येतील अशी भीती शिवसेना असावी असेही यामागची कारण असू शकते. तर भविष्यात काहीही होऊ शकते असे आधीच राऊत यांनी सांगितल्याप्रमाणे शिवसेना भाजपबरोबरही जाऊ शकते.

भाजप- शिवसेना एकत्र येण्याची वेळ?

एकीकडे शिवसेनेनं आता महाविकास आघाडीला स्वत: बाहेरपडून खिंडार पाडले आहे. तर भविष्यात भाजपबरोबर जवळीक करून शिंदे यांना त्रास देण्याचा मौका सोडणार नाही, अशी परिस्थिती तयार करत आहे. सध्याच्या घडीला भाजपला कोणाच्या साथीची गरज नसून ते कोणत्याही निवडणुकीला सामोरं जाऊ शकतात. पण भाजपच्या मुंबईवर झेंडा फडवण्याच्या मनसुब्यांवर अनेकदा पाणी फिरले आहे. यंदा शिवसेना जवळीक देऊन भाजप आपले स्वप्न सत्यात ही उतरवू शकते.

पण सध्याच्या परिस्थिती पाहता मुंबई सोडल्यास राज्यात शिवसेनेकडे म्हणावे तसे पक्ष नेतृत्वाची कमतरता दिसत आहे. यामुळे स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेचा कस लागणार आहे. शिवसेनेचा कोर मतदार हा जादातर शहरात असून ग्रामीण भागात त्यामानाने कमी आहे. त्यामुळे शिवसेनेची नजर फक्त महानगपालिकांकडे असून जिल्हापरिषद आणि नगरपरिषांसाठी नवे चेहरे शोधण्याची वेळ येण्याची परिस्थिती सध्याची आहे. त्यामुळे 'एकला चलो'ची भूमीका घेणाऱ्या शिवसेनेला किती यश मिळते हे आता निवडणुका लागल्यानंतरच आणि निकाल हाती आल्यानंतरच कळणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT