Rahul Narwekar, Sanjay Raut Sarkarnama
महाराष्ट्र

Sanjay Raut : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या विरोधात मुख्यमंत्र्यांना पत्र, संजय राऊतांचा गंभीर आरोप, 'आदिवासींची जमीन...'

Devendra Fadnavis Rahul Narwekar : संजय राऊत यांनी पत्रात म्हटले आहे की, राहुल नार्वेकर यांच्या मनमानी वर्तनाविरोधात अलिबाग तालुक्यातील आदिवासी समाज गेल्या काही काळापासून आंदोलन करीत आहे

Roshan More

Sanjay Raut News : विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केला आहे. अलिबाग तालुक्यातील अफाट जमीन खरेदीचे व्यवहार व म्हात्रोळी गावातील गरीब आदिवासींच्या जमिनी नार्वेकरांनी लाटल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून हा प्रकार थांबण्याची मागणी राऊत यांनी केली आहे.

राऊत यांनी पत्रात म्हटले आहे की, अत्यंत व्यतीत अंतःकरणाने व आपण नक्की न्याय कराल या अपेक्षेने मी हे पत्र लिहीत आहे. संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीने सार्वजनिक जीवनात वावरताना किमान मर्यादांचे पालन केले पाहिजे हे आपणही मान्य कराल. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या मनमानी वर्तनाविरोधात अलिबाग तालुक्यातील आदिवासी समाज गेल्या काही काळापासून आंदोलन करीत आहे व पोलीस यंत्रणा त्या आदिवासींवर जबरदस्ती करत त्यांना पळवून लावत आहेत. हे सर्व विधानसभा अध्यक्षांच्या दबावाखाली घडत असेल तर नार्वेकर यांना त्यांच्या पदावरून तत्काळ दूर करणे गरजेचे आहे.

राहुल नार्वेकर व त्यांचे नगरसेवक बंधू मकरंद यांनी गेल्या काही काळापासून अलिबाग तालुक्यात मोठ्या प्रमाणावर जमीन खरेदीचा सपाटा चालवला आहे. या 'सपाट्या'तून गरीब आदिवासींच्या जमिनीही सुटलेल्या नाहीत. म्हात्रोळी गावातील येथे कातकरी आदिवासी कुटुंबाच्या जमिनीचा बेकायदेशीर कब्जा घेऊन त्यांचे घर तोडून संपूर्ण कुटुंबाला विस्थापित करण्याचा प्रकार महाराष्ट्राच्या प्रतिमेस कलंक लावणारा आहे.

त्यांनी पत्रात पुढे म्हटले आहे की, अलिबाग तालुका, जिल्हा रायगड येथील म्हात्रोळी गावातील कातकरी आदिवासी वाडीत पिढ्या‌न्पिढ्या राहणाऱ्या सुमारे २० आदिवासी कुटुंबांच्या घरांची दिनांक २४ मार्च २०२४ रोजी व त्यानंतरच्या दिवसांत बेकायदेशीर पद्धतीने तोडफोड करून त्यांना जबरदस्तीने विस्थापित करण्यात आले.

सदर जमीन (गट क्रमांक १४८/१, क्षेत्र १५ एकर) फेब्रुवारी २०२४ मध्ये महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांच्या पत्नी सरोजिनी राहुल नार्वेकर यांच्या नावे खरेदी केली.

जमिनीवर आदिवासींची घरे असल्याचे लक्षात आल्यानंतर नार्वेकर यांचे एजंट दशरथ पाटील यांनी मोठ्या जमावासह येऊन कोणतीही पूर्वसूचना न देता जेसीबीच्या सहाय्याने आदिवासींची घरे तोडली. घरातील सामान उद्ध्वस्त करून मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडून टाकण्यात आले. बोअरवेलदेखील उखडून टाकण्यात आली. तेथे आदिवासी रहात असल्याचे पुरावे अशा प्रकारे दाबून टाकले.

वृत्त गुंड प्रवृत्तीचीच...

आदिवासी-कातकरी कुटुंबांनी आक्रोश केला तेव्हा वाडीपासून २-३ किलोमीटर अंतरावरील पर्यायी जागेत राहायला जबरदस्ती करण्यात आली. काही कुटुंबांना थोडे पैसे दिले गेले, तर काहींना काहीही दिले नाही. तुमचे तुम्ही बघा. या जमिनीवर आता आमचा कब्जा आहे असे धमकवण्यात आले. विधानसभा अध्यक्षांची ही कृती गुंड प्रवृत्तीचीच आहे.

महाराष्ट्र शासनाने ४ जानेवारी २०१७ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार ही कुटुंबे त्यांच्या घराखालील जमिनीचे मालक आहेत. ही नोंद अलिबाग तहसीलदाराच्या सर्वेक्षण रेकॉर्डमध्ये आहे. या कुटुंबांकडे १५-२० वर्षांपासून घरपट्टीच्या पावत्या आहेत. यातील योजनेतून घर मिळाले होते, तेही उद्ध्वस्त करण्यात आले. हे अत्यंत निघृण आहे. घरात लहान मुले व वृद्ध महिला असताना असे वागणे हे अत्यंत निघृण आहे. या प्रकरणात पोलीस व महसूल यंत्रणेची भूमिका ही गुंडशाहिस त साथ देण्याची आहे, असे देखील त्यांनी म्हटले आहे.

पुढे म्हटले की, आदिवासी कुटुंबांनी वारंवार तक्रार केली असतानाही पोलीस व महसूल अधिकाऱ्यांनी तक्रार दाखल न करता धमकी देऊन त्यांच्याकडून 'आम्ही हक्क सांगणार नाही' असे लेखी घेतले. कागदावर काय लिहिले आहे हे न वाचता अंगठे घेण्यात आले. २०२५ मध्ये याबाबत राज्य मानवी हक्क आयोगाकडे दाखल केलेला दावादेखील अज्ञानी याचिकाकर्ते सुनावणीला उपस्थित न राहिल्याच्या कारणावरून एकतर्फी निकाली काढण्यात आला.

सध्या ही कातकरी कुटुंबे अत्यंत दयनीय स्थितीत आहेत. पर्यायी जागेत पिण्याचे पाणी, वीज, रस्ता अशा मूलभूत सोयी नाहीत. बोअरवेलचे पाणीदेखील दूषित आहे. मालक त्यांना तेथूनही हुसकावून लावत आहेत. मुख्यमंत्री महोदय याला कायद्याचे राज्य म्हणायचे काय?

कारवाईची मागणी

संजय राऊत यांनी म्हटले आहे की, माझी मुख्यमंत्र्यांकडे विनंती आहे की,या प्रकरणी तातडीने स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, दशरथ पाटील तसेच कृत्यात सहभागी झालेल्या अन्य व्यक्तींवर अत्याचार प्रतिबंधक कायदा व संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात यावा, विस्थापित आदिवासी कुटुंबांना त्यांच्या मूळ जागेवर पुनर्वसन करण्यात यावे किंवा योग्य पर्यायी जागा व भरपाई मिळावी, पोलीस व महसूल यंत्रणेतील अधिकाऱ्यांच्या या प्रकरणातल्या भूमिका तपासाव्यात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT