महाराष्ट्र

Maharashtra School Holiday: पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई, डोंबिवली, वसई, विरारमध्ये सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

Heavy rain alert in Maharashtra: महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून पुणे, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, वसई-विरारसह अनेक भागांत शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Mangesh Mahale

School Holiday Declared In Maharashtra : राज्यात बहुतांश जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड,रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे, मुंबईला आज रेड अलर्ट देण्यात आला आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड,मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई, विरारमध्ये सर्व शाळा आणि महाविद्यालयांना प्रशासनाने सुट्टी जाहीर केली आहे.

पुणे

पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देत हवामान विभागाने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. संभाव्य अतिवृष्टी आणि निर्माण होणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र, सर्व मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी नियमित कार्यालयीन वेळेत उपस्थित राहावे. तसेच स्थानिक प्रशासनाच्या सूचनांनुसार आपत्ती व्यवस्थापन आणि मदतकार्याशी संबंधित कामांसाठी सज्ज राहण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

पालघर

पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वसई-विरारसह संपूर्ण जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या ऑरेंज अलर्टच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी इंदूराणी जाखड यांनी हा आदेश जारी केला आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

रायगड

रायगड जिल्ह्यातील सर्व शाळा, अंगणवाड्या आणि महाविद्यालयेही 6 जुलै रोजी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हवामान खात्याने पुढील दोन दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.

ठाणे

ठाणे जिल्ह्यासह कल्याण-डोंबिवली परिसरातही मुसळधार पावसामुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेऊन केडीएमसी प्रशासनाने हद्दीतील सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सततच्या पावसामुळे अनेक भागांत पाणी साचण्याची आणि वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मुंबई

मुंबईत सर्व शासकीय, खासगी, महापालिका शाळा तसेच महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेऊन प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे. सखल भाग, समुद्रकिनारे आणि पाणी साचणाऱ्या परिसरांपासून दूर राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

नवी मुंबई

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. संबंधित शाळांनी या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करून विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना त्वरित माहिती द्यावी, असे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT