Schools
Schools  
महाराष्ट्र

शाळा सुरु होणार नाहीत; मुंबई पाठोपाठ पुणे महापालिकेचा मोठा निर्णय

सरकारनामा ब्युरो

मुंबई : दक्षिण आफ्रिकेत (South Africa) आढळलेल्या ओमिक्रॉन व्हेरीयंट च्या पार्श्वभुमीवर मुंबई महापालिका आणि पुणे महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात एक डिसेंबरपासून प्राथमिक शाळा सुरु होणार (Schools Reopens) असल्याची घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी केली. त्याचबरोबर शाळा सुरू करण्यासंबंधीची नियमावलीही त्यांनी सोशल मीडियाद्वारे जारी केली.

मात्र, मुंबई महापालिकेने (BMC ) 1 डिसेंबरपासून पहिली ते चौथीचे वर्ग सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र पाचवी ते सातवीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाच्या नवीन ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने पहिली ते चौथीचे वर्ग तुर्तास तरी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

तर मुंबई पाठोपाठ पुणे महापालिकेनेही (Pune Municipal Corporation) शाळा 15 डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महापौर मुरलधीधर मोहोळ यांनी दिली आहे. मुरलीधर मोहोळ आणि महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांच्यातील बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर, मुंबई, पुण्यापाठोपाठ सोलापूर आणि नाशिक जिल्ह्यातही शाळा सुरू करण्याबाबत निर्णय लांबणीवर टाकण्यात आला आहे.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही शाळा सुरु करण्यासंदर्भात महत्वाची माहिती दिली होती. देशात सध्या ओमिक्रॉनचा एकही रुग्ण नाही आणि हा व्हेरीयंट अतिशय धोकादायक असल्याचं कुठेही सिद्ध झालेलं नाही, पण, दक्षिण आफ्रिकेत व्हेरीयंटचा प्रभाव पाहता काळजी घ्यायला हवी, म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य विभाग आणि टास्क फोर्सची बैठक झाली. त्यानंतर, 1 डिसेंबरला ठरल्याप्रमाणे शाळा सुरू होणार असल्याचे राजेश टोपे यांनी स्पष्टपणे सांगितले होते.

तर राज्यातील शाळा सुरु करताना जिल्हा प्रशासनालाही मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या होत्या यात दोन विद्यार्थ्यांमध्ये सहा फूटाचे अंतर, शाळेत मास्क घालणे बंधनकारक, बायोमेट्रिक पद्धतीचा अवलंब करू नये, शाळेत गर्दी होणार नाही असे उपक्रम, खेळ किंवा सामूहिक प्रार्थना घेऊ नयेत, वैयक्तिक आणि शाळेत स्वच्छता, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झालेले असावे, ज्यांना कोणतीही लक्षणे नाहीत अशाच व्यक्तींना शाळेच्या किंवा वर्गात येण्यास परवानगी द्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT