Mumbai News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर दोनच दिवसापूर्वीच माजी खासदार शालिनी पाटील यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या आरोपानंतर अजित पवार गटाच्या नेत्यांकडून शालिनी पाटील यांच्यावर प्रत्यारोप केले जात असल्याने राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. त्यातच आता या वादात अमोल मिटकरींनी उडी घेत शालिनी पाटील यांना धारेवर धरले आहे.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा एकेरी उल्लेख करत त्यांचे संविधान निर्मितीत निर्विवाद असलेल्या योगदानाला नाकारून स्वतःला तत्वज्ञानी समजणाऱ्या माजी खासदार शालिनी पाटील यांना आता जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवावी, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिला आहे. त्यांनी केलेल्या या वक्तव्याची गंभीर दखल घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
माजी मंत्री शालिनी पाटील (shalini Patil) यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्या मध्ये म्हटले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना लिहलीच नाही, असे म्हणत त्यांनी डॉ. आंबेडकर यांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या व्हिडिओवरून वातावरण चांगलेच तापले आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचाही सर्वस्तरांतून निषेध केला जात आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर दोनच दिवसापूर्वी शालिनी पाटील यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुढील चार महिन्यात तुरुंगात जातील, त्यामुळे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न अपूर्णच राहिल, अशी टीका माजी खासदार शालिनी पाटील यांनी केली होती.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान, शालिनी पाटील यांनी केलेल्या टिकेला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. राजकारणातून आलेले नैराश्यातून पाटील बोलत असल्याची टीका त्यांनी केली.
(Edited By Sachin Waghmare)