Shambhuraj Desai Makrand Patil  sarkarnama
महाराष्ट्र

Satara Bank Chairman : भाजपच्या मनसुब्यांना ब्रेक: सातार जिल्हा बँक अध्यक्षपदाच्या निवडीत शंभूराज देसाई-मकरंद पाटील किंगमेकर!

Shambhuraj Desai Makrand Patil : सातार जिल्हा बँकेत अध्यक्षपदावर भाजपकडून दावा सांगितला जात आहे. मात्र, संख्याबळ पाहता भूराज देसाई-मकरंद पाटील किंगमेकर ठरणार आहे.

Umesh Bambare-Patil

Satara Bank Politics : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक जागा मिळवत वर्चस्व राखले असले, तरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदेंच्या शिवसेनेची एकजूट त्यांना अध्यक्षपदापासून दूर ठेवणारी ठरली आहे. जिल्ह्यातील सर्व संस्था ताब्यात घेण्याचे भाजपचे स्वप्न जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत यशस्वी झाले नाही.

या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्हा बॅंकेच्या उभारणीत आणि बांधणीत योगदान असलेल्या बाळासाहेब देसाई, विलासराव पाटील- उंडाळकर व किसन वीर यांच्या वारसांचा बँकेत प्रवेश झाला आहे. ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरेंनी आपली चाल यशस्वी करत तीन जागांसह बँकेत दणदणीत प्रवेश केला आहे. पालकमंत्री शंभूराज देसाईंनी चार जागा घेऊन बॅंकेत प्रवेश केला आहे. जिल्हा बॅंकेत सर्वाधिक जागा जिंकून भाजपने वर्चस्व सिद्ध केले असले, तरी सत्तेच्या चाव्या राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या नेत्यांकडे राहिल्या आहेत.

जिल्हा बँकेची यावेळची निवडणूक अनेक दिग्गज नेत्यांना जागा दाखविणारी ठरली. एकनाथ शिंदेंच्या मोहऱ्याने दहा वर्षे संचालक राहिलेल्या संचालकांना अपात्र ठरविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत केलेली लढाई अनेक दिग्गज नेत्यांना निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर काढले. त्यानंतर मात्र, या दिग्गज नेत्यांना महायुतीची आठवण झाली. जिल्हा परिषदेतील संघर्ष जिल्हा बँकेत होऊ नये, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांनी महायुती म्हणून एकत्रित निवडणूक करण्याची सूचना केली. त्यानुसार सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व आमदार धैर्यशील कदम यांच्यावर समन्वयाची जबाबदारी दिली होती.

महायुतीत जागा वाटपावरून थोडे पुढे मागे झाले; पण शेवटी सोसायटीच्या अकरा जागा वगळता उर्वरित जागांमध्ये भाजपने पाच, राष्ट्रवादी तीन व शिवसेनेला दोन जागा असे सूत्र ठरले. समन्वयाच्या भूमिकेमुळे सर्वाधिक जागा असलेले मंत्री शिवेंद्रसिंहराजेंना तीन जागांवरच समाधान मानावे लागेल. सुरुवातीच्या टप्प्यात बिनविरोध झालेल्या नऊ जागांपैकी भाजपच्या पाच, राष्ट्रवादीच्या तीन आणि शिवसेनेची एक जागा बिनविरोध झाली.

उर्वरित १२ जागांमध्ये आठ ठिकाणी भाजप व राष्ट्रवादी, दोन ठिकाणी शिवसेना व भाजपमध्ये, तर दोन ठिकाणी राष्ट्रवादी व शिवसेनेत लढती झाल्या. त्यामुळे महायुतीतच एकमेकांच्या विरोधात झालेल्या लढतीत भाजपला चार, राष्ट्रवादीला पाच, तर शिवसेनेला तीन जागांवर यश मिळाले.

नेत्यांच्या वारसांना संधी

जिल्हा बॅंकेच्या या निवडणुकीत प्रथमच बँकेच्या उभारणीत आणि बांधणीत योगदान देणाऱ्या नेत्यांच्या वारसांना संधी मिळाली आहे. यामध्ये बाळासाहेब देसाईंचा नातू मंत्री शंभूराज देसाईंना पाटण सोसायटीतून यश मिळाले आहे. ते प्रथमच बॅंकेत निवडून आले आहेत, तर ज्यांनी बँकेत शिस्त लावून तिची कीर्ती देशभर पोचविणारे विलासराव पाटील -उंडाळकर यांच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र उदयसिंह पाटलांना तब्बल एक टर्मनंतर बॅंकेत एंट्री मिळाली आहे. यापूर्वीही ते २००२ मध्ये शशिकांत शिंदेंना पराभूत करून बॅंकेत संचालक झाले होते. किसन वीर आबांचे नातू सत्यजित वीर यांना प्रथमच संधी मिळाली आहे.

नऊ नवे चेहरे

जिल्हा बॅंकेच्या या निवडणुकीत दहा वर्षे संचालक राहिलेल्या दिग्गज संचालकांना रिझर्व्ह बॅंकेच्या अधिनियमाने घरचा रस्ता दाखविला. यामध्ये माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, खासदार उदयनराजे भोसले, नितीन पाटील, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, अनिल देसाई, राजेंद्र राजपुरे, प्रभाकर घार्गे, प्रदीप विधाते, कांचन साळुंखे यांचा समावेश आहे. या संचालकांच्या जागी इतर सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी मिळाली. त्यामुळे यानिमित्ताने बॅंकेत नवे चेहरे संचालक म्हणून आले. यामध्ये संजीवराजे नाईक निंबाळकर, काका धुमाळ, सर्जेराव सावंत, रूपाली राजपुरे, सत्यजित वीर, चंद्रकांत जाधव, नंदकुमार मोरे, मंगल पाटील, योगेश फडतरे यांचा समावेश आहे.

गोरे ठरवणार का दावा खरा?

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ग्रामविकासमंत्री गोरे यांनी शांत राहून आपले मनसुबे पूर्ण केले आहेत. त्यांना महायुतीतील इतर नेत्यांनी बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला; पण मंत्री गोरेंनी शांत राहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने बँकेत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना बिनविरोध, तर स्वत: सोसायटीतून आणि अर्जुन काळे यांना विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातून निवडून आणले. त्यासाठी त्यांनी मतांची योग्यपद्धतीने जुळणी केली. त्यामुळे त्यांच्या विचारांचे तीन संचालक बँकेत आले आहेत. बँकेत अध्यक्ष भाजपचाच होईल, असा दावा ते वारंवार करत होते. आजच्या निकालानंतर तो ते पूर्ण करतील का? हे पाहणे आगामी काळात रंजक ठरेल.

शिवसेनेचे चार संचालक

यापूर्वी अनेकदा प्रयत्न करूनही पालकमंत्री शंभूराज देसाईंना बॅंकेत संचालक होण्याची संधी मिळाली नाही. दिग्गज नेत्यांनी त्यांना शब्द दिला; पण तो पाळला नाही; पण यावेळेस मंत्री देसाई स्वत: पाटण सोसायटीतून निवडून आलेच त्यासोबत त्यांनी महिला राखीवमधून मंगल पाटील यांना बिनविरोध, तर संजीवराजे नाईक निंबाळकर, दीपक चव्हाण यांना शिवसेनेच्या माध्यमातून निवडून आणून संचालक केले. त्यामुळे शिवसेनेचे चार संचालक बॅंकेत आले आहेत.

अध्यक्षपदासाठी दावे

भाजपने नऊ जागा जिंकून आघाडी घेतली असल्याने अध्यक्षपदासाठी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून दावा केला जाणार आहे, तर जिल्हा परिषदेतील संघर्ष वर्मी लागलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या नेत्यांनी एकजूट ठेवल्यास त्यांचे १२ संचालक होतात. त्यामुळे मदत आणि पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील, पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडूनही बँकेचे अध्यक्षपद आपल्याकडेच घेण्यासाठी प्रयत्न होणार आहेत. त्यासाठी तीनही पक्षांच्या नेत्यांच्या एकत्रित बैठकीत यावर शिक्कामोर्तब होणार असला, तरी जिल्हा बॅंकेचा अध्यक्ष भाजपचा करण्याचा आपला आग्रह ग्रामविकासमंत्री गोरे कसा पूर्ण करणार याची उत्सुकता असेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT