मी १९६९-७० मध्ये मी मुंबईत सीआयडी सब इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत असताना न्यू लॉ कॉलेजमध्ये एलएलबी करीत होतो. आधी ज्या सोलापूरच्या कोर्टात मी चपराशी म्हणून काम केलं, तिथं काळा कोट घालून वकिली करावी इतकं माझं सीमित ध्येय होतं. त्याच्या पूर्ततेसाठी नोकरीत राजकीय, तसेच कामगार चळवळीच्या हालचालीवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी स्वीकारली. त्या विभागाचे काम पाहणारे गायकवाड नावाचे अधिकारी महिनाभर रजेवर गेल्यानं तत्कालीन उपायुक्त सूर्यकांत जोग यांनी माझ्याकडं ते काम सोपवलं.
नाथ पै यांच्या राजकीय हालचालींवर व त्यांच्या ऑस्ट्रियन पत्नीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचं काम होतं. काँग्रेस पक्षाच्या हालचालीवरही नजर ठेवायची होती. न्यू लॉ कॉलेजमध्ये मला शिकवणारे बॅ. विठ्ठलराव गाडगीळ व में, इँक्बाल गाया हे दोन प्राध्यापक प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस होते. त्यामुळे मला माहिती मिळवणं फारसं अवघड नव्हतं. याच काळात काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस असलेले शरद पवार तेथे येत असत.
माझे आणखी एक मित्र श्रीराम लेले युनायटेड मिलमध्ये काम करत होते. त्यांची व शरद पवारांची घसट होती. गाडगीळ, गाया यांच्यासमवेत गप्पांच्या काळात शरदरावही तेथे येत असत. बॅ. गाडगीळ यांनी शरदरावांशी माझ्याबद्दल बोलताना हा दलित समाजातील तरुण अतिशय कष्टानं रात्रशाळेत व मॉर्निंग कॉलेजमध्ये शिकून एलएलबी करत असल्याचं सांगून माझं कौतुक केलं. त्या काळात ते तरुणांचे संघटन करत होते. विशेषतः निरनिराळ्या जाती-धर्मातील तरुणांचं एकत्रीकरण त्यांनी केलं होतं. लेले व पवार यांच्या घसटीतून माझीही त्यांच्याशी जवळीक झाली. नोकरी सोडून राजकारणात येणार का, असा प्रश्न शरदरावांनी मला थेटपणे विचारला; परंतु माझं ध्येय वकील होण्याचं असल्याचं त्यांना सांगून विचार करेन, असं म्हणालो. त्यांनी त्या वेळी ते ऐकून घेतलं.
दरम्यान, १९७१ मध्ये लोकसभेच्या निवडणुका लागल्या. पंढरपूर राखीव मतदारसंघासाठी माझ्या नावाची चर्चा सुरू झाली. शरदराव हे हरहुत्ररी व्यक्तिमत्त्व. त्यांच्यातील नेतृत्वगुण वाखाणण्याजोगे आहेत, हे मी त्या वेळेपासून पाहतो. त्यांनी मला पुन्हा निवडणुकीत उतरण्याविषयी सांगितले. त्यांनी एकीकडं काँग्रेसचे सोलापूर जिल्ह्याचे तत्कालीन अध्यक्ष (कै.) नामदेवराव जगताप यांच्याकडून उमेदवारी देण्याविषयी शिफारस घेतली, तर दुसरीकडं शिंदे यांना उमेदवारी द्यावी, असं पत्र जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष विजयसिंह मोहिते-पाटील यांना द्यायला लावलं, एखाद्याला साथ द्यायची म्हटली, की शरदराव ते शेवटपर्यंत निभावतात. तन, मन, घर लावून मदत करतात, असा माझा अनुभव आहे.
(कै.) यशवंतराव चव्हाण यांच्या घरी वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक, नासिकराव तिरपुडे, बाळासाहेब देसाई, शंकरराव चव्हाण, सुंदरलाल सोळंकी आदी नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या लोकसभा पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत माझ्या नावाची चर्चा सुरू झाली. मला तिथे बोलावलं. सर्वांनी माझी माहिती घेतली. सकारात्मक चर्चा झाली; परंतु पुढं ती जागा रिपाईसाठी सोडण्यात आली. या काळात मी नोकरीचा राजीनामा दिला नव्हता. नंतर पुन्हा सहा महिन्यांतच विधानसभेच्या निवडणुका लागल्या. मला शरदराव यांनी नोकरीवा राजीनामा द्या, करमाळ्यातून तुम्हाला उमेदवारी देणार, असं सांगितलं. मी नोकरीचा राजीनामा दिला.
माझ्या नावाची शिफारस झाली; परंतु दिल्लीतून माझं नाव कापण्यात आलं. तायप्पा सोनवणे यांना करमाळा मतदारसंघातून उमेदवारी दिली गेली. माझी स्थिती उमेदवारी नाही अन् नोकरीही नाही, अशी झाली. शरदराव दिल्लीहून परतत होते. विमानतळावर त्यांना घेण्यासाठी मी गेलो होतो. मला पाहिल्यानंतर त्यांचा चेहरा मलूल झालेला दिसला. मी त्यांना म्हणालो, "शरदराव जाऊ दे, तुम्ही काळजी करू नका. मी आजपर्यंत स्ट्रगल करून इथपर्यंत आलो आहे. आणखी स्ट्रगल करून यापुढं यशस्वी होईल." करमाळ्यातून निवडून आलेल्या तायप्पा सोनवणे यांचं दुर्दैवानं अकरा महिन्यांत निधन झालं.
करमाळ्यातून मला उमेदवारी दिली गेली व १९७४ मध्ये मी निवडून आलो. नंतर मला वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालं. त्यात शरदरावांचा मोठा वाटा होता. माझ्यासारख्या अनेक तरुणांना त्या काळात शरदरावांनी मोठं केलं. त्यात दादासाहेब रुपवते, एकनाथ साळवे, विनायकराव पाटील, अंकुशराव टोपे, अॅड. रवींद्र शंकरराव मोरे, विलासकाका उंडाळकर, प्रभाकर कुंटे, शांताराम घोलप, गोविंदराव आदिक अशा वेगवेगळ्या समाजातील, धर्मातील तरुणांचा समावेश होता. सर्वधर्मसमभावावर त्यांची निष्ठा आहे. सुनील तटकरे, छगन भुजबळ यांच्यासारख्या गरीब समाजातील व्यक्तीला पक्षाच्या अध्यक्षपदी नेमण्यात त्यांची दृष्टी अजूनही निकोपच असल्याचं जाणवतं.
आजही त्यांचं आमचं मैत्रीचं नातं कायम आहे. माझी पत्नी उज्ज्वला, त्यांची पत्नी प्रतिभाताई यांचीही मैत्री आहे. पुढं आमच्या मुली, सुप्रिया यांच्यातही मैत्रीचं नातं; त्यानंतरच्या पिढीत आमच्या दोघांच्या नातवंडांतही मैत्रीचा हा अतूट धागा जुळलेला आहे. आम्ही राजकारणात विचारांनी वेगवेगळे असलो, तरी एकमेकांच्या सुखदुःखांवेळी एकत्रित असतो. राजकारणात काहीही असो. शरदराव हे हाडाचे नेतेच आहेत.
मी व आमचे काही सहकारी १९७३ ते १९८० पर्यंत त्यांच्यासमवेत सतत राहत असू. त्यांनी अनेक उद्योगपतींची आमची ओळख करून दिली. त्यांचे लक्ष उद्योगपतींच्या अडचणी सोडविण्याकडे असे. कामगार चळवळीतील सर्वपक्षीय राजकीय नेत्यांबरोबर त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्यांना मदत करण्याची भूमिका घेतली पाहिजे, असं ते म्हणत. मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा प्रश्न असो की त्यांच्यावर त्यावेळी झालेली टीका किंवा मैत्री असतानाही शिवसेनेने त्यांच्यावर केलेली त्या काळातील टीका असो, ते मोठ्या शिताफीने हे सारे सहन करीत. त्यातून सहजपणे मार्ग काढण्याची त्यांची हातोटीही मोठी होती. कठीण परिस्थितीतही तुम्ही रागावत का नाहीत, असं विचारल्यावर ते म्हणतात, की राजकारण आणि समाजकारण करताना सर्वच बाबी संयमानं घ्याव्या लागतात. सर्वसामान्यांना जेवढी म्हणून आपल्याला मदत करता येईल, तेवढी करावी. त्यामुळेच ते राजकारणात यशस्वी झाले. त्यांच्याविषयी आमच्या मनात असलेला आदर हा कायम राहील. त्यांना वाढदिवसानिमित्त आभाळभर शुभेच्छा ! त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना !
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.