sharad pawar Devendra Fadnavis

 
Sarkarnama
महाराष्ट्र

अजितदादांना फडणवीसांसोबत सरकार स्थापनेसाठी तुम्हीच पाठवलं होतं का? शरद पवार म्हणाले..

मी त्यांना पाठवलं असतं, तर त्यांनी राज्यच बनवलं असतं. त्यांनी अर्धवट काही काम केलं नसतं.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रमुख नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पहाटेच्या शपथविधीची अनेकदा चर्चा होत असते. त्यांचा भाजपसोबत जाण्याचा निर्णय आजही दंतकथा म्हणून चर्चिला जातो. पण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनीच अजित पवारांना फडणवीसांकडे पाठवल्याचं बोललं जातं. मात्र, आता या गुपिताचा स्वतः शरद पवार यांनीच एका मुलाखतीत खुलासा केला आहे.

“२०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर मीच अजित पवार यांना देवेंद्र फडणवीस आणि भाजपासोबत पाठवलं अशी चर्चा होत असते हे खरं आहे. पण मी त्यांना पाठवलं असतं, तर त्यांनी राज्यच बनवलं असतं. त्यांनी अर्धवट काही काम केलं नसतं. मी अजित पवार यांना पाठवलं होतं यात काहीच अर्थ नाही. तेव्हा तसं होण्यामागे प्रमुख २ कारणं होती.”

“माझं ते एक वक्तव्य सेना-भाजपातील अंतर वाढायला फार उपयोगी पडलं,” असे शरद पवार म्हणाले. पवारांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त ‘लोकसत्ता’तर्फे ‘अष्टावधानी ’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आयोजित केला होता. यावेळी घेण्यात आलेल्या मुलाखतीत पवार बोलत होते.

एक वक्तव्य अंतर वाढायला फार उपयोगी पडलं..

पवार म्हणाले की, तेव्हा स्पष्ट बहुमत कुणाकडेच नव्हतं. आघाडी म्हणून बघितलं तर सेना-भाजपाकडे बहुमत होतं. मात्र, सेना आणि भाजपा एकत्र राहणार नाही हे आम्हाला दिसलं. महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत येऊ पाहणाऱ्या भाजपा बाजूला करायचं असेन तर त्यांना सोयीची भूमिका घेणं शक्य नव्हतं. म्हणून पहिल्यांदा निवडणूक झाल्यावर मी दिल्लीत एक वक्तव्य केलं की, देवेंद्र फडणवीस यांना बहुमतासाठी काही लोकांची कमतरता असेन तर आम्ही त्याचा गांभीर्याने विचार करू. माझं ते एक वक्तव्य सेना-भाजपातील अंतर वाढायला फार उपयोगी पडलं.

त्यामुळे शिवसेना आमच्यासोबत आली..

“साधी गोष्ट आहे की ते दोघे एकत्र यावेत असा प्रयत्न आम्ही केला असता, तर आम्ही पुन्हा ५ वर्षे सत्तेबाहेर राहिलो असतो. शिवसेनेत अस्वस्थता आहे हे दिसत होतं आणि ते तातडीने मुख्यमंत्रीपद हवंय म्हणत होते. त्यामुळे तेव्हा तात्पुरतं पोषक वक्तव्य केल्यानं नुकसान होणार नव्हतं. माझ्या या एका वक्तव्यामुळे सेनेत अस्वस्थता निर्माण झाली आणि फडणवीसांकडून राष्ट्रवादीसोबत जाण्याचे प्रयत्न होऊ शकतात ही शक्यता निर्माण झाली. त्यामुळे शिवसेना आमच्यासोबत आली,” असे पवार म्हणाले.

मोदींची तशी इच्छा होती...

“माझी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रात राष्ट्रवादी आणि भाजपाने एकत्र येण्याबाबत चर्चा झाली. मोदींची तशी इच्छा होती, पण मी स्वतः त्यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना सांगितलं की, हे शक्य होणार नाही, आम्हाला तुम्हाला अंधारात ठेवायचं नाही, आपली भूमिका वेगळी आहे. यावर त्यांनी अजूनही विचार करा असं सांगितलं. निवडणुकीनंतर दीड महिने सरकार स्थापन झालं नव्हतं. त्यामुळे सेना-भाजपात खूप अंतर वाढलं होतं. त्यामुळे भाजपाला महाराष्ट्रात स्थिर सरकार आणण्यासाठी राष्ट्रवादीची गरज वाटली असेन,” असं पवारांनी स्पष्ट केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT