Mumbai News : "नेहरूंचा काळ, त्यांचे कर्तृत्व आणि योगदानाशी तुलना होऊ शकत नाही", असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला चपराक लगावली. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करण्यात येत आहे. त्यावर राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन सोहळ्याप्रसंगी शरद पवार बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेस, नेहरू आणि गांधी घराण्याचे देशासाठीच्या योगदानावर प्रकाश टाकला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 27 व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम बुधवारी मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झाला. यावेळी मार्गदर्शन करताना शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, 'पंतप्रधान होण्याआधी नेहरूंनी इंग्रजांना देशातून बाहेर काढण्याचे काम केले. मोलाची कामगिरी केली. हा इतिहासाचा भाग आहे, हे विसरू शकत नाही. नेहरू सुविद्य गृहस्थ होते, संघर्ष करणारे होते. स्वातंत्र्याआधी अनेक वर्ष तुरुंगात राहिले, गांधींच्या नेतृत्वाखाली संघर्ष केला. शेवटी तुम्हाला मला स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणून ओळख झाली. यात नेहरूंची कामगिरी मोठी होती. ती विसरता येणार नाही.'
नरेंद्र मोदी (Narendra Modi) देशाचे पंतप्रधान आहेत. ते संस्थात्मक पद आहे. त्या पदाची प्रतिष्ठा ठेवणे हे भारतीयांचे काम आहे. धोरणात्मक गोष्टी आम्ही मांडू. पण धोरणात्मक पदाची प्रतिष्ठा आम्ही ठेवत असतो, त्याचा अनादर करत नाही. स्वातंत्र्य मिळण्याआधी पंडित नेहरूंनी देश संघटित करण्याचे काम केले. त्यांनी ही देशाची प्रतिष्ठा सांभाळली. नेहरूंचा त्याग देश कधीच विसरणार नाही. त्यासोबतच इंदिरा गांधींनी देशाची प्रतिष्ठा सांभाळली, असेही यावेळी शरद पवार म्हणाले.
महाराष्ट्रातील मंत्रिमंडळातील एक मंत्री शीख समाजाच्या कार्यक्रमाला गेले होते. त्यावेळी त्यांनी जे भाषण केले ते हस्यास्पद होते. त्यांनी फार मोठी टिप्पणी केली. त्यांनी इंदिरा गांधींवर टीका केली. इंदिरा गांधींनी या देशाला स्वातंत्र्यानंतर संघटित केले. जगामध्ये देशाची प्रतिष्ठा वाढवायला अतिशय चांगली कामगिरी त्यांनी केली आहे. त्या महान व्यक्ती होत्या. इंदिरा गांधींनी देशाच्या प्रतिष्ठेशी तडजोड केली नाही, असेही यावेळी पवार म्हणाले.
तर राष्ट्रवादी रस्त्यावर उतरेल...
शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करता येणार नाही, त्यांच्यासाठी लक्ष द्यावे लागेल. समाजासाठी काम करणाऱ्यांना हा देश माझा आहे, असं वाटणारा राज्यकारभार चालला पाहिजे, पण त्याची पूर्तता होत नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली आहे. येत्या आठ ते दहा दिवसांमध्ये बसू, उपेक्षित समाजाचे प्रश्न एकत्र येऊन सोडवू. आवश्यकता असेल तर राष्ट्रवादी रस्त्यावर उतरेल, ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना योग्य दिशा दाखवू. त्यांनी आपलं म्हणणं स्वीकारलं नाही तर संघर्ष करू, अशी घोषणा यावेळी शरद पवार यांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.