Sharad Pawar, Jitendra Awhad, Ajit Pawar Sarkarnama
महाराष्ट्र

Sharad Pawar Vs Ajit Pawar : शरद पवार 38 वर्षांचे असताना..! आव्हाडांनी सगळा इतिहास सांगत अजितदादांना घेरलं

Rajanand More

NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांच्या बंडावरून टीका केली होती.  शरद पवारांनी 38 या वर्षीच बंड केले होते, अशी आठवण अजितदादांनी करून दिली होते. त्यावर पवारांनीही त्यावेळी चर्चा करून निर्णय घेतल्याचे सांगत पलटवार केला होता. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्या बंडावेळी नेमके काय घडले, याचा संपूर्ण इतिहास सांगत अजित पवारांना निशाणा साधला आहे.

जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) सोशल मीडियात (Social Media) लांबलचक पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, साहेब जेव्हा या राज्याचे मुख्यमंत्री झाले. तेव्हा ते 38 वर्षांचे होते. पुरोगामी लोकशाही दल म्हणजेच पुलोद, या आघाडीची कल्पना ही समाजवादी नेते एस.एम. जोशी (S M Joshi) यांनी पुढे आणली. नाशिकराव तिरपुडे हे वसंतदादांना देत असलेल्या त्रासाबद्दल मंत्रिमंडळात उघड चर्चा होती. पण, त्या काळात दिल्लीच्या हायकमांडमध्ये नाशिकराव तिरपुडेंचा दबदबा होता. अशा परिस्थितीत काहीतरी केलं पाहिजे, असे सर्वच पुरोगामी नेत्यांना वाटत होते. अन् यशवंतराव चव्हाणांनी मान हलवल्यानंतरच पुढील घडामोडी घडल्याचे आव्हाडांनी म्हटले आहे.

सर्वात मोठी भूमिका एस.एम. जोशी यांची असल्याकारणाने त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) साहेब यांचे नाव सुचविले. त्यावेळेस असलेल्या जनता पार्टीची निर्मिती ही जयप्रकाश नारायण यांनी केली होती. अन् जनसंघ हादेखील जनता पार्टीत विलीन केला होता. जनसंघाचे अस्तित्व संपले होते आणि भारतीय जनता पार्टीची निर्मिती व्हायची होती. त्यामुळे कुठलाही जातीयवादी पक्ष हा पुलोदचा भाग नव्हता, अशी माहितीही आव्हाडांनी दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

साहेबांशी तुलना हास्यास्पद

अर्धवट माहितीच्या आधारे साहेबांवर आरोप करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की साहेबांनी कधीच जातीयवादी पक्षांशी हातमिळवणी केली नाही. कारण की, सन 1981 मध्ये भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली. त्या आधीच पुलोदचे सरकार बरखास्त होऊन दुसरे सरकार सत्तेवर आले होते. त्यामुळे अजितदादांनी स्वतःची तुलना साहेबांच्या निर्णयाशी करावी, हे जरा हास्यास्पदच वाटतेय. एवढ्या सर्व लोकांना विश्वासात घेऊन मुख्यमंत्री होणे आणि समान तत्वावर सरकार चालवणे, ही सोपी गोष्ट नव्हती. त्यावेळेस उद्धवराव पाटील, कृष्णराव धुळप, दि. बा. पाटील, एस .एम. जोशी, ना. ग. गोरे असे दिग्गज नेते महाराष्ट्राच्या राजकारणात होते, असे आव्हाड यांनी लिहिले आहे.

यशवतंराव चव्हाणांची मान्यता

स्वकर्तृत्वावर तयार झालेले शरद पवार आणि काकांच्या सावलीत वाढलेले अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात बरंच अंतर आहे. त्यामुळे साहेबांनी ज्या वयात केले; त्या वयात तुम्हाला ते करताही आले नसते आणि त्यांनी जे केले ते तुम्हाला 63 व्या वर्षीही जमले नाही. तुम्ही कितीही शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांचे नाव घेतले तरी उजव्या मांडीवर कोण आणि डाव्या मांडीवर कोण, हे महाराष्ट्रातील प्रत्येक पुरोगामी माणसाला कळतंय. आधी थोडीशी माहिती करून घेतली असती तर अशी गल्लत झाली नसती आणि या सर्व प्रकरणाला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची मान्यता होती.

राजकारण म्हणजे साखर कारखाना; राजकारण म्हणजे बँका ; राजकारण म्हणजे इथेनॉल फॅक्टरी; राजकारण म्हणजे सहकारी उद्योग असे समीकरण तेव्हा नव्हते तर महात्मा गांधीजींचा वारसा घेऊन चाललेले नेते हे समाजसेवेचे व्रत घेऊन पुढे जात होते. हाच आजच्या आणि तेव्हाच्या राजकारणातला फरक असल्याचे आव्हाडांनी नमूद केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT