Sunil Tatkare And Bharat Gogawale sarkarnama
महाराष्ट्र

Raigad Guardian Minister : तटकरेंनी बालहट्ट सोडावा अन्यथा राज्यभर रायगड पॅटर्न राबवू; महायुतीत वादाची ठिणगी

Dispute over Raigad Guardian Minister : राज्यात पालकमंत्रिपदाचा तिढा काही सुटलेला नाही. यातच मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्याच्या अंतराचे कारण देत वाशिमच्या पालकमंत्रिपद सोडले आहे. यामुळे पालकमंत्री पदावरून महायुतीतील रूसवे, फुगवे पुन्हा एकदा समोर आले आहेत.

Aslam Shanedivan

Raigad News : राज्यात महायुतीचे सरकार आले असून 26 जानेवारीच्या आधी जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यावेळी नाशिक आणि रायगडच्या नियुक्त्यावरून पेच निर्माण झाला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही जिल्ह्यात आमने-सामने आली होती. तर कोल्हापूरचे पालकमंत्रिपद हसन मुश्रीफ यांना मिळण्याची शक्यता असताना त्यांना डावलण्यात आले होते. यामुळे महायुती सरकारमध्ये पालकमंत्री पदावरून रूसवे, फुगवे समोर आले होते. काही काळानंतर आता पुन्हा एकदा रूसवे, फुगवे उघड झाले असून वादाचे निखारे आता महायुतीत उडताना दिसत आहेत.

काहीच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगडचा दौरा करत नाराजांची व्यथा ऐकून घेतल्या होत्या. त्यावेळी त्यांनी रायगडचे पालकमंत्रिबाबत सावध पवित्रा घेताना सरकारमधील आम्ही तिघेही रायगडचे पालकमंत्री असल्याचा दावा केला होता. पण त्यांनी पाठ फिरवताच पालकमंत्री पदाचा वाद आता उफाळून बाहेर आला आहे. येथील क्रिकेटच्या मैदानावर राजकारणाची जोरदार बॅटींग होताना दिसत आहे. शिंदेंची शिवसेना राष्ट्रवादीला डिवचताना दिसत असून त्याला प्रत्युत्तर राष्ट्रवादी देताना दिसत आहे.

दरम्यान आता मंत्री भरत गोगावले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात रंगलेल्या कलगितुऱ्यामुळे रायगडचे राजकारण तापलेलं आहे. तटकरे यांनी माणगाव येथील क्रिकेटच्या एका सामन्यात पालकमंत्री पदावरून गोगावले यांना मारलेल्या राजकीय टोल्यामुळे आता नवा वाद सुरू झाला आहे. तटकरे यांनी, पंचाचा निर्णय हा अंतिम असतो, अशी खोटक टीका मंत्री भरत गोगावले यांच्यावर केल्याने शिवसेना शिंदे गटाचे तिन्ही आमदार आता आक्रमक झाले आहेत.

तटकरेंना प्रत्युत्तर देताना, आमदार महेंद्र थोरवे यांनी, पंचांचा निर्णय अंतिम असतो. पण या सामन्यात तुम्ही कप्तान असला तरीही सगळंच मिळणार नाही. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे असून "तटकरे, आलमगीर औरंगजेब" असल्याची टीका केली होती. तटकरे यांना औरंगजेबाची उपमा देताना, 'औरंगजेब हा सुतार वाडीत बसलाय', असे म्हटले होते. यामुळे वातावरण चांगलेच तापलेलं आहे.

अशातच रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद टोकाला गेल्याचे दिसत आहे. रायगड पालकमंत्री पदासाठी शिवसेनेचे तिन्ही आमदार आता आक्रमक झाले आहेत. पालकमंत्रीपदाचा वाद सुटला नाही तर डीपीडीसी होऊ देणार नाही, असाच पवित्रा त्यांनी घेतला आहे. तर तटकरे यांनी बालहट्ट सोडावा अन्यथा रायगडास जाग आली तर तर रायगड पॅटर्न राज्यभर राबवण्याचा ही सूचक इशारा देखील या तिन्ही आमदारांनी दिला आहे.

दरम्यान रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निश्चिंत राहण्याचे आश्वासन तिन्ही आमदारांना दिले आहे. यामुळे रायगडचे पालकमंत्री भरतशेठ गोगावलेच होतील अशा चर्चा आता रंगल्या आहेत.

SCROLL FOR NEXT