Eknath Shinde Shivsena sarkarnama
महाराष्ट्र

Shivena hearing : शिवसेना पक्ष, चिन्हावर सुनावणी सुरू होण्यापूर्वीच दिल्लीतून एकनाथ शिंदेंचं 'धनुष्यबाण' संदर्भात मोठं वक्तव्य

Shivsena Bow and Arrow Symbol hearing : मागील सुनावणीत ठाकरेंच्या शिवसेनेकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला. शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयाच्या आधारावर ठाकरेंच्या शिवसेनेने प्रश्न उपस्थित केले.

Jagdish Patil

Shivena News, 02 Sep : शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हावरील हक्काच्या वादावर आज (2 सप्टेंबर) सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी होणार आहे. मागील सुनावणीत ठाकरेंच्या शिवसेनेकडून आपली बाजू मांडण्यात आल्यानंतर आता शिंदेंच्या शिवसेनेकडून युक्तिवादाला सुरुवात होणार आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी आणि नीरज किशन कौल बाजू मांडणार आहेत.

आजच्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी दिल्लीत वकिल आणि कायदेतज्ज्ञांसोबत चर्चा केली. या बैठकीत प्रकरणातील कायदेशीर बाबी, उपलब्ध पुरावे आणि सर्वोच्च न्यायालयासमोर मांडण्यात येणाऱ्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह शिंदेंच्या शिवसेनेकडेच कायम राहावे, यासाठी कायद्याच्या विविध पैलूंचा अभ्यास करून न्यायालयात बाजू मांडण्याची तयारी करण्यात आली.

या कायदेशीर तयारीसाठी शिंदे मंगळवारी दुपारनंतर दिल्लीला रवाना झाले होते. सुनावणीदरम्यान पक्षाची बाजू अधिक प्रभावीपणे मांडता यावी, यासाठी त्यांनी वकिल आणि कायदेतज्ज्ञांकडून या प्रकरणातील महत्त्वाच्या मुद्द्यांची माहिती घेतली. दरम्यान, मागील सुनावणीत ठाकरेंच्या शिवसेनेकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला. शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयाच्या आधारावर ठाकरेंच्या शिवसेनेने प्रश्न उपस्थित केले.

देवदत्त कामत यांनी संबंधित आमदारांच्या कथित पक्षांतराचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयासमोर मांडला. या आमदारांनी पक्षांतर केले होते की नाही, याचा अंतिम निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घ्यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली. जर न्यायालयाने संबंधित आमदारांचे पक्षांतर झाल्याचे ठरवले, तर त्यांच्या विधिमंडळातील संख्याबळाच्या आधारे निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयाचा आधारच बदलू शकतो, असा युक्तिवाद ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आला.

याच सुनावणीदरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेकडून ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह गोठवण्याची मागणी करण्यात आली. पक्ष आणि चिन्हावरील वादाचा अंतिम निर्णय होईपर्यंत हे चिन्ह कोणत्याही एका गटाला देऊ नये, अशी भूमिका ठाकरेंच्या शिवसेनेने घेतली आहे. या मागणीवर एकनाथ शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘धनुष्यबाण’ हे केवळ निवडणूक चिन्ह नसून बाळासाहेब ठाकरे यांच्या अस्मितेचे आणि श्रद्धेचे प्रतीक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

धनुष्यबाण गोठवण्याची मागणी करणे अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी असल्याचे सांगत, अशी मागणी म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा पुसून टाकण्याचा प्रयत्न असल्याची टीका शिंदे यांनी केली. महाराष्ट्रातील जनतेने दिलेला कौल आणि हिंदुत्वाची विचारधारा गोठवण्याचा प्रयत्न यामागे असल्याचेही त्यांनी म्हटले.

आपण बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा पुढे घेऊन जात असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 2019 मध्ये ज्यांनी बाळासाहेबांची विचारधारा सोडली, त्यांनी जनतेने दिलेला कौलही नाकारला आणि मोडला, असा आरोप त्यांनी केला.

‘धनुष्यबाण’ हे आमच्यासाठी श्रद्धेचा विषय असल्याचे सांगत, हे चिन्ह गोठवण्याची मागणी न्यायालयात करणे म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आदर असलेल्या सर्व शिवसैनिकांचा अपमान असल्याचेही शिंदे यांनी म्हटले. आता आजच्या सुनावणीत शिंदेंच्या शिवसेनेकडून कोणते कायदेशीर मुद्दे मांडले जातात आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युक्तिवादाला काय प्रत्युत्तर दिले जाते, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. त्यामुळे शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हाच्या वादातील आजची सुनावणी महत्त्वाची ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT