BJP NCP Alliance : बिडकरांचा सूर बदलला! आठवड्याभरातच ‘तू-तू, मैं-मैं’ संपवून ‘हम सब एक है’ म्हणत राष्ट्रवादीशी जुळून घेतलं

Pune BJP NCP Alliance : पुणे महापालिकेच्या राजकारणात काही दिवसांपूर्वीपर्यंत ‘तू-तू, मैं-मैं’ करणारे दोन्ही पक्ष आता अचानक ‘हम सब एक’च्या भूमिकेत दिसत असून दोन्ही पक्षातील नेते खांद्याला खांदा लावून फिरताना दिसत आहेत.
Pune BJP NCP Alliance; BJP Leader Ganesh Bidkar
Pune BJP NCP Alliance; BJP Leader Ganesh Bidkarsarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे महापालिकेच्या राजकारणात आठवडाभरापूर्वी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पेटलेली राजकीय ठिणगी आता विझवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. नगरसेवकांच्या विकासनिधीवरून राष्ट्रवादीला थेट ‘शून्य’ दाखवणाऱ्या भाजपला आता पुन्हा युतीची आठवण झाली आहे.

विशेष म्हणजे, ‘महापालिकेत युती नाही’ अशी भूमिका घेणारे सभागृह नेते गणेश बिडकर आज मात्र “राज्यात आणि देशात राष्ट्रवादी आमच्यासोबत आहे,” असे सांगताना दिसत आहेत. त्यामुळे भाजपचा हा अचानक झालेला ‘यू-टर्न’ नेमका वरिष्ठांच्या कानउघाडणीनंतर झाला का? असा सवाल उपस्थित झाला आहे.

गेल्या आठवड्यात स्थायी समितीच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अमोल बालवडकर आणि सुहास टिंगरे यांच्या विकासनिधीला अक्षरशः ‘ब्रेक’ लावत तो शून्यावर आणण्यात आला. कोथरूडमधील विकासकामांच्या चौकशीसाठी बालवडकरांनी मांडलेल्या प्रस्तावावर सुहास टिंगरे यांनी स्वाक्षरी केली होती. याच मुद्द्यावरून भाजप आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली.

Pune BJP NCP Alliance; BJP Leader Ganesh Bidkar
BJP-NCP Alliance : उपमहापौरपदावरून नवा ट्विस्ट? भाजप-राष्ट्रवादी युतीच्या चर्चांवर शहराध्यक्षचं मोठं वक्तव्य; 'तसा प्रस्ताव आल्यास विचार करू...'

या वादात भाजपचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी राष्ट्रवादीला चांगलाच राजकीय डोस दिला. राज्यात आणि केंद्रात युती असली तरी महापालिकेत युती नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यानंतर दोन्ही पक्षांतील स्थानिक नेत्यांचा संघर्ष उघडपणे चव्हाट्यावर आला होता. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांविरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रारीचे पत्र पाठवले. त्याला प्रत्युत्तर देत गणेश बिडकर आणि भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांविरोधात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार केल्याचे समोर आले.

विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीपर्यंत ‘तू-तू, मैं-मैं’ करणारे दोन्ही पक्ष आता अचानक ‘हम सब एक’च्या भूमिकेत आले आहेत. आज पुणे महापालिकेत भाजप आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांची समन्वय बैठक होत आहे. या बैठकीला महापौर मंजुषा नागपुरे, सभागृह नेते गणेश बिडकर, राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे, शहराध्यक्ष सुनील टिंगरे आणि विरोधी पक्षनेते निलेश निकम उपस्थित आहेत.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पहिले चित्र महापालिकेत लावण्यासाठी जागेची पाहणी करतानाही भाजप आणि राष्ट्रवादीचे नेते एकत्र दिसले. काही दिवसांपूर्वी एकमेकांवर तक्रारी करणारे नेते आज मात्र खांद्याला खांदा लावून फिरताना दिसल्याने महापालिका वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. यावेळी गणेश बिडकर यांना भाजप-राष्ट्रवादीच्या युतीबाबत विचारले असता त्यांनी “राज्यात आणि देशात राष्ट्रवादी काँग्रेस आमच्यासोबत आहे,” असे स्पष्ट केले. पण मग प्रश्न असा आहे की, आठवडाभरापूर्वी महापालिकेत युती नसल्याचे सांगणाऱ्या बिडकरांना आज अचानक युतीची आठवण कशी झाली?

विकासनिधी ‘शून्य’ करण्यापासून तक्रारींच्या फैरी झाडण्यापर्यंत गेलेला वाद अचानक समन्वयाच्या बैठकीपर्यंत कसा पोहोचला? हा समन्वय आधी करता आला नसता का? की वरिष्ठ नेत्यांनी कानउघाडणी केल्यानंतर या नेत्यांना परिस्थितीचे भान आले आणि दोन्ही बाजूंनी तलवारी म्यान केल्या का? अशा चर्चा सध्या पालिकेच्या वर्तुळात सुरू झाल्या आहेत.

Pune BJP NCP Alliance; BJP Leader Ganesh Bidkar
NCP BJP alliance : पुण्यात मोठी घडामोड; विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत सत्तेत जाणार, उपमहापौर पदावर डील? माजी खासदाराने टाकला डाव...

राज्यात भाजप-राष्ट्रवादीची सत्ता आहे आणि आगामी राजकीय गणितांसाठी दोन्ही पक्षांना एकत्र राहणे गरजेचे आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरील कुरघोड्या वरिष्ठांना परवडणाऱ्या नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता पुणे महापालिकेतला ‘विकासनिधीचा वाद’ हा केवळ नगरसेवकांचा विषय राहिलेला नसून, भाजप-राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना वरिष्ठांनी दिलेला ‘राजकीय धडा’ ठरतोय का, याची चर्चा रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com