sarkarnama
sarkarnama
महाराष्ट्र

'ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे' 'धर्मवीर' लवकरच रुपेरी पडद्यावर

सरकारनामा ब्युरो

पुणे : 'ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे' अशी ओळख असलेले कट्टर शिवसैनिक (shivsena) दिवंगत आनंद दिघे (anand dighe) यांचा आज जन्मदिवस. या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांसाठी आज गुड न्यूज आहे. 'धर्मवीर' आनंद दिघे यांचं आयुष्य आता मोठ्या पडद्यावर साकारण्यात येत आहे. आनंद दिघे यांचे आयुष्य "धर्मवीर" या चित्रपटातून लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. या चित्रपटाचे मोशन पोस्टर समाज माध्यमांवर प्रदर्शित झाले आहे.

अभिनेते, निर्माते प्रविण विठ्ठल तरडे यांनी या चित्रपटाचे लेखन केलं आहे. दिग्दर्शनही ते करणार आहेत. अभिनेता मंगेश देसाई याच्या साहिल मोशन आर्टस् या निर्मिती संस्थेतर्फे "धर्मवीर"ची निर्मिती करण्यात येत आहे. अनेक नाटक, चित्रपट, मालिका म्हणून अभिनय साकारणारा मंगेश देसाई या चित्रपटाच्या माध्यमातून निर्मिती क्षेत्रात उतरत आहे. त्याचा हा पहिलाच चित्रपट आहे.

"देऊळ बंद", "मुळशी पॅटर्न" ''पांडू'' यांसारख्या गाजलेल्या आणि बहुचर्चित आगामी "सरसेनापती हंबीरराव" या चित्रपटानंतर "धर्मवीर"चे शिवधनुष्य पेलण्यासाठी प्रविण तरडे सज्ज झाले आहेत. चित्रपटासाठी निवड चाचणी नुकतीच घेण्यात आली. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटात आनंद दिघे यांची भूमिका कोण करणार, हे मात्र गुलदस्त्यात आहे. केदार गायकवाड हे सिनेमॅटोग्राफर म्हणून काम पाहत आहेत. ठाण्यात या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु झालं आहे.

ठाणे जिल्ह्यामध्ये ९० च्या दशकात शिवसेना अगदी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम दिघे यांनी केलं. शाखा संस्कृती ठाण्यामध्ये मजबूत करण्यामध्ये दिघे यांचा सिंहाचा वाटा होता. टेंभी नाका परिसरातच आनंद दिघे यांनी ‘आनंद आश्रमा’ची स्थापना केली. या आश्रमात दररोज सकाळी ‘जनता दरबार’ भरायचा. आपल्या तक्रारी दिघे यांना ऐकवण्यासाठी लोक सकाळी सहा वाजल्यापासून रांगा लावून उभे असायचे. ठाणे शहरच काय जिल्हाभरातील लोक येथे येऊन त्यांच्या समस्या दिघेंना सांगायचे आणि ते त्या तत्काळ सोडवायचे.

अनेकदा ते तक्रार ऐकल्यानंतर तेथूनच फोन करायचे आणि तक्रार सोडवण्याच्या सूचना द्यायचे अशा आठवणी जुने शिवसैनिक आजही सांगतात. कधी कधी काम पूर्ण करुन घेण्यासाठी त्यांनी रोक’ठोक’ भूमिकाही घेतल्या आहेत. त्यांनी काही प्रसंगी हात उचलल्याचेही उदाहरणे आहेत. त्यामुळेच त्यांच्याबद्दल प्रशासनापासून सामान्यांपर्यंत एक आदरयुक्त दरारा तयार झाला. दिघे यांनी कधीच बघू करु अशी उत्तरे दिली नाहीत.

२४ ऑगस्ट २००१ रोजी कार्यकर्त्यांच्या घरी गणेशोत्सवानिमित्त भेट देण्यासाठी बाहेर निघाले. याच दरम्यान ठाण्यातील वंदना टॉकीजसमोरील रस्त्यावर त्यांच्या गाडीला भिषण अपघात झाला. त्यांना तात्काळ सिंघानिया रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. तेथे २६ तारखेला त्यांच्या पायावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. संध्याकाळी सव्वा सातच्या सुमारात त्यांना हृद्यविकाराचा झटका आला. रात्री साडे दहाच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जेव्हा दिघे यांचे निधन झाले ते ५० वर्षाचे होते

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT