महाराष्ट्र

Shiv Sena Anniversary : बंडखोर खासदारांपैकी फक्त दोघांनीच दिल्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा, पण कोणत्या शिवसेनेला?

Sanjay Jadhav, Nagesh Patil Ashitkar : संजय पाटील यांच्या कन्या राजूल पाटील या ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबईतील नगरसेविका आहेत. त्यांनी मात्र ठाकरेंच्या शिवसेनेला वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्याचे दिसते.

Rajanand More

Shiv Sena Split : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सहा खासदारांनी बंड केले आहे. या खासदारांनी स्वतंत्र गट करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन होण्याचा निर्णय घेतल्याची जोरदार चर्चा आहे. ठाकरेंच्या शिवसेनेने शुक्रवारी बोलाविलेल्या बैठकीलाही या खासदारांनी दांडी मारली. त्यामुळे त्यांचा शिंदेसोबत जाण्याचा निर्णय पक्का झाल्याचे मानले जात आहे.

शिवसेनेचा ६० वर्धापनदिन शुक्रवारी साजरा केला जात असतानाच ही धक्कादायक घडामोड घडल्याने चर्चेला तोंड फुटले आहे. बंडखोर खासदार ठाकरे की शिंदेंच्या व्यासपीठावर दिसणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. पण त्याआधी या खासदारांनी वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या का, याबाबत त्यांचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना उत्सुकता असेल.

शिवसेनेच्या वर्धापनदिनी शुभेच्छांचा वर्षाव होत असताना बंडखोर खासदारांपैकी केवळ दोघांनीच सोशल मीडियात शुभेच्छा देणारी पोस्ट केली आहे. त्यामध्ये परभणीचे खासदार संजय जाधव आणि हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा समावेश आहे. मात्र, या दोघांनी केलेल्या पोस्टमध्ये केवळ बाळासाहेब ठाकरेंचा यांचा फोटो आहे. ना ठाकरे ना शिंदे, ना धनुष्यबाण ना मशाल. केवळ शिवसेना असा उल्लेख केला आहे. अखंड शिवसेना, अटळ हिंदूत्व, असे पोस्टमध्ये म्हटले आहे.

विशेष म्हणजे दोन्ही खासदारांची पोस्ट एकसारखीच आहे. दोघांनीही एकाच व्यक्तीकडून डिझाईन तयार करून घेतल्याचे दिसते. त्यामुळे त्यावरूनही चर्चांना उधाण आले आहे. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे, दोघांनीही फेसबुकवर पोस्ट करताना कमेंट सेक्शन बंद करून ठेवला आहे. त्यांच्या मागील काही पोस्टवरून बरेच ट्रोल करण्यात आल्याने त्यांनी कमेंट बंद केल्याची चर्चा आहे.

खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, संजय दिना पाटील, संजय देशमुख आणि भाऊसाहेब वाकचौरे यांनी मात्र सोशल मीडियातून शुभेच्छांची पोस्ट केलेली नाही. त्यावरून चर्चा रंगू लागल्या आहेत. संजय पाटील यांच्या कन्या राजूल पाटील या ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबईतील नगरसेविका आहेत. तसेच त्या युवासेनेच्या कार्यकारिणी सदस्यही आहेत. त्यांनी मात्र ठाकरेंच्या शिवसेनेला वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्याचे दिसते. त्यामुळे वडिलांनी बंड केले असले तरी लेक मात्र ठाकरेंसोबतच असल्याचे सध्याचे चित्र आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT