शिवसेनेचा दसरा मेळावा
शिवसेनेचा दसरा मेळावा Facebook
महाराष्ट्र

१९९२ च्या दंगलीत शिवसेना नसती तर आज टीका करणारे दिसले असते का?

ऋषीकेश नळगुणे

मुंबई : मुंबईच्या षणमुखानंद हॉलमध्ये आज शिवसेनेचा (Shivsena) दसरा मेळावा (Dasara Melava) संपन्न झाला. यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्ष भाजपवर टीका करण्यापासून सरकार पाडण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांपर्यंत अनेक मुद्दांवर भाष्य केले. सोबतच हिंदूत्वावर देखील त्यांनी भाष्य केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भाषणाचे संदर्भ ठाकरे यांनी घेत भाजपच्या कार्य़पद्धतीवर आसूड ओढले. भागवत म्हणतात की आपले पूर्वज एकच होते. हे जर मान्य असेल तर विरोधी पक्ष, आंदोलन करणारे शेतकऱ्यांचे पूर्वज परग्रहावरुन आलेत का? लखीमपूरमधील हिंदूंना मारणे हे मोहन भागवतांना पटत का? हे मोहनजींना मान्य आहे का? सत्तेसाठी संघर्ष नको. भागवतजी तुमच्या लोकांची शिकवणी लावा. सत्तेचे व्यसन हा अंमली पदार्थ आहे.

हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा.

उद्धव ठाकरे म्हणाले, पूर्वीपासुन आपल्याकडे एक खेळ आहे. छापा-काटा. तसा काहीसा खेळ सध्या सुरु आहे. छापा टाकायचा आणि काटा काढायचा. दोन वर्षात सरकार पाडण्याचे अनेक प्रयत्न झाले. पण छापा टाकून काटा काढायचा हे प्रकार जास्त चालू शकणार नाही. सरकार पाडण्यासाठी किती हा खेळ खेळा. पण सरकार पडणार नाही. आणि तरी हिंमत असेल तर सरकार पाडुन दाखवाच, असेही आव्हान उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला दिले.

आजच्या सत्ताधीशांमुळे हिंदुत्व धोक्यात.

उद्धव ठाकरे म्हणाले, केंद्रीय गृहमंत्रालयाने सांगितले हिंदुत्वाला धोका नाही. पण आजच्या सत्ताधीशांमुळे हिंदुत्व धोक्यात आहे. हिंदुत्व परक्यांपासुन धोक्यात नाही तर ह्या नवहिंदुंपासुन धोक्यात आहे, आताच्या उपटसुंभांमुळे धोक्यात आहे.

महात्मा गांधी आणि सावरकर यांचे नाव घेण्याची लायकी आहे का?

उद्धव ठाकरे यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या सावरकांविषयीच्या विधानाचा देखील समाचार घेतला. राजनाथसिंग काही दिवसांपूर्वी एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमामध्ये महात्मा गांधींच्या सांगण्यावरुन सावरकरांनी माफी मागितली होती, असे वक्तव्य केले होते. यावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, महात्मा गांधी आणि सावरकर यांचे नाव घेण्याची लायकी आहे का. हे नाव घेणाऱ्यांना समजलेत का तरी?

१९९२ च्या दंगलीत शिवसेना नसती तर आज टीका करणारे दिसले असते का?

मुंबईत १९९२ मध्ये झालेल्या दंगलीत इतरांच्या शेपट्या आतमध्ये गेल्या होत्या, जेव्हा हिंदुत्वाला धोका होता, तेव्हा फक्त एकमेव हिंदुहृदयसम्राट उभे होते. धमक्या येत होत्या. परंतु, त्यांनी सांगितलं ज्या रंगाची गोळी आम्हाला चाटून जाईल तो रंग हिंदुस्थानातून संपवून टाकू. शिवसेनाप्रमुखांनी बाबरी मशीद पाडल्यावरसुध्दा `गर्व से कहो हम हिंदू है`, असा नारा दिला होता. बाकीचे थरथरत होते. केवळ शिवसैनिक रस्त्यावर होते. त्यामुळे १९९२ च्या दंगलीत शिवसेना नसती तर शिवसेनेवर टीका करायाला आज तोंडात बोंडख घालुन बसले आहेत ते दिसले असते का, असा सवाल त्यांनी केला.

माझा मर्द शिवसैनिक आहे. अन्य कोणीही तेव्हा समोर नव्हते. केवळ हा शिवसैनिक आज तुमची पालखी वाहत नाही म्हणून भ्रष्टाचारी झाला? शिवसैनिकाचा जन्म हा देव, देश आणि धर्मासाठी झाला आहे, तुमच्या पालखीचा भोई होण्यासाठी नाही. आम्ही हिंदुत्वाचे, भारतमातेचे भोई आहे. वाईट काळात तुम्हाला शिवसेना चालली, आता हर्षवर्धन पाटील चालतात. कुटुंबावर, सदस्यांवर टीका हे हिंदुत्व नाही तर षंढपणा आहे. हर्षवर्धन पाटील तुमच्याकडे आले की शुद्ध होतात. म्हणजे इकडे असले की गटारगंगा आणि तिकडे आले की गंगा कसे होतात?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT