Shivsena 16 MLA Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. निकाल देताना उद्धव ठाकरे यांच्या गटाचे प्रतिज्ञापत्र अमान्य करत शिंदे गटातील 16 आमदारांना नार्वेकर यांनी पात्र ठरवले आहे. तसेच खरी शिवसेना देखील एकनाथ शिंदे यांचीच असल्याचे नार्वेकरांनी स्पष्ट केले आहे. या निकालानंतर आता राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीटद्वारे या निकालावर मोठं विधान केलं आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) म्हणाले, 'मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्त्वात राज्यात सरकार स्थापन करताना संवैधानिक आणि कायदेशीर प्रक्रियेचे संपूर्णत: पालन करण्यात आले होते आणि त्यामुळेच हे सरकार मजबुत आणि भक्कम आहे, असे आम्ही प्रारंभीपासूनच सांगत होतो. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा आपल्या आदेशात हे सरकार बरखास्त करण्याचा कुठलाही आदेश देण्याची गरज नाही, असे स्पष्ट केले होते.'
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
याचबरोबर 'पण, काही लोक मुद्दाम आणि वारंवार सरकारबाबत गैरसमज पसरवून राज्यातील वातावरण अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत होते. आज विधानसभाध्यक्षांनी विविध नियमांचा दाखला घेत, जो आदेश आज दिला, त्यानंतर आतातरी कुणाच्या मनात सरकारच्या स्थैर्याबाबत शंका राहण्याचे कारण नाही.' असं फडणवीस म्हणाले आहेत.
याशिवाय 'मी पुन्हा सांगतो, हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल! मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि त्यांच्या सहकार्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो.' अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे.
विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच (Eknath Shinde) आणि शिंदे गटातील सर्व आमदार पात्र म्हणून निर्णय दिला. शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांची निवडदेखील त्यांनी वैध असल्याचा निर्णय दिला. सुनील प्रभू यांचा व्हीप आमदारांना लागू होणार नाही आणि त्यामुळे शिंदेंचे आमदार हे पात्र ठरतात, असा निर्णय राहुल नार्वेकर यांनी दिला.
अध्यक्षांनी हा निकाल दिल्यानंतर भरत गोगावले यांनी सुनील प्रभूंना हाक मारून त्यांच्यापुढे हात जोडले. सुनील प्रभू हे बाहेर जायला निघताच गोगावले यांनी त्यांच्या पुढ्यात हात जोडले. यावेळी गोगावलेंच्या चेहऱ्यावर जिंकण्याचा आनंद दिसला.
खरी शिवसेना कुणाची, हे ठरवण्याचा अधिकार मलाच आहे, असं आज राहुल नार्वेकर म्हणाले. शिवसेनेची ही घटनाच हे सांगते आहे, की त्यात कशी पदरचना आहे. त्यानुसारच खरी शिवसेना कुणाची आहे? याचा निर्णय घेतला आहे. 21 जून 2022 ला शिवसेनेत दोन गट पडले. सगळ्या पुरावे, साक्षी यांचा विचार करता मी शिंदे गटाची शिवसेना (Shivsena) हीच खरी शिवसेना आहे ही मान्यता देतो, असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.