Bjp News : पाच राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने प्रस्थापित नेत्यांना जोरदार धक्का दिला. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये शिवराजसिंह चौहान, वसुंधराराजे यांच्यासह मातब्बर नेत्यांना मुख्यमंत्रिपदाची संधी न देता नवीन चेहऱ्यांची निवड केली. त्याच प्रकारचे धोरण येत्या काळात होणाऱ्या महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीतही राबवले जाणार असल्याचे भाजपकडून स्पष्ट करण्यात आले.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने (Bjp) तयारी सुरू केली असून उमेदवारीसाठी कोणीही पक्षाला गृहीत धरू नये. निवडून येण्याची क्षमता व अन्य बाबी पाहून उमेदवारीबाबत संसदीय मंडळाकडून निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे जर कोणी बॅनरबाजी किंवा अन्य माध्यमातून दबाव आणत असेल तर अशा मंडळींना उमेदवारी मिळणार नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पक्ष शिस्त मोडू पाहणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
भाजप प्रदेश कार्यकारिणीची बैठक नुकतीच झाली. या बैठकीस उपस्थित असलेल्या सदस्यांना संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी सूचना दिल्या. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार निवडताना भाजपकडून प्रस्थापितांसाठी धक्कातंत्र वापरले जमणार आहे. त्याशिवाय उमेदवारीसाठी इच्छूक असलेल्यांनी कोणताही दबावतंत्र अथवा मतदारसंघात बॅनरबाजी केल्यास त्यांचा विचार केला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा फडणवीस यांनी दिला आहे.
कार्यकर्त्यांना दिला कानमंत्र
कार्यकर्त्यांना सूचना देत त्यांनी कानमंत्र दिला. येत्या काळात विजयाबद्दल आत्मसंतुष्ट होऊ नका आणि 2024 च्या लोकसभा निवडणुका गांभीर्याने घ्या, असा सल्ला त्यांनी दिला. लोकसभा निवडणुकीत भाजपचा विजय निश्चित आहे, असे समजून मैदानात उतरून काम करणे थांबवू नका, असाही इशारा त्यांनी दिला आहे. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना सामान्यांपर्यंत पोहोचण्याचा सल्ला दिला आहे. भाजपची व्होटबँक असलेल्या सर्वसामान्य आणि गरिबांशी त्यांनी जोडले पाहिजे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
भाजपची निवडणूक कार्यालये सुरू होणार
लोकसभा निवडणुकीची तयारी करीत असताना भाजप कार्यकर्त्यांनी 2024 च्या सार्वत्रिक निवडणुका हलक्यात घेण्याची गरज नाही, असा सल्ला फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिला आहे. येत्या काळात उमेदवार जाहीर होण्याची वाट न बघता 31 जानेवारीपर्यंत लोकसभा तर 14 फेब्रुवारीपर्यंत विधानसभानिहाय भाजपची निवडणूक कार्यालये सुरू करण्याचे आदेश सहराष्ट्रीय सरचिटणीस शिवप्रकाश यांनी बैठकीत दिले.
(Edited by Sachin Waghmare)