Amit Shah, Ashish Kulkarni, Prashant Kishor, Devendra Fadanvis  Sarkarnama
महाराष्ट्र

Politcal News : महाराष्ट्राच्या राजकारणात एकदा नव्हे तर दोनदा भूकंप घडवणारा 'नवा चाणक्य'

Bjp News: शिंदे, अजितदादांचं बंड ते माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसमधील बडे प्रस्थ मानले जाणारे अशोक चव्हाण यांनी मागच्याच आठवड्यात भाजपमध्ये प्रवेश केला.

Sachin Waghmare

Politcal News : महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. शिंदे, अजितदादांचं बंड ते माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसमधील बडे प्रस्थ मानले जाणारे अशोक चव्हाण यांनी मागच्याच आठवड्यात भाजपमध्ये प्रवेश केला. या सर्व घटनांनी जरी आश्चर्याचा धक्का बसला असला तरी या सर्व घटनाक्रमांमागे भाजपचे एक 'रणनीतीकार' असल्याचे पुढे येते. त्यांच्यामुळेच महाराष्ट्राच्या राजकारणातील हे भूकंप घडल्याची चर्चा जोरात आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे एकेकाळी ते निकटवर्तीय राहिले आहेत. शिवसेना ते भाजप व्हाया काँग्रेस असा राजकीय प्रवास असलेले आशिष कुलकर्णी महाराष्ट्राचे नवे रणनीतीकार म्हणून समोर येत आहेत. कुलकर्णी हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोअर टीममधले मानले जातात. सध्या ते सीएम एकनाथ शिंदे यांच्याकडे 'सीएमओ'मध्ये मुख्य समन्वयक म्हणून काम पाहत आहेत.

आशिष कुलकर्णी यांनी जवळपास दोन दशकांपूर्वी 2003 मध्ये शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला. उद्धव ठाकरे यांनी जेव्हा पक्षाची सूत्रे हाती घेतली आणि त्यांना बाजूला केले होते. नारायण राणे यांच्याशीही त्यांचे जवळचे संबंध होते. ते स्वतःच उद्धव यांच्यासोबत काम करणे कठीण झाल्याने 2003 मध्ये काँग्रेसकडे वळले होते. त्यानंतर राहुल गांधी यांचेही ते विश्वासू मानले जात होते. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत 6 लोकसभा जागा जिंकण्याची जबाबदारी काँग्रेसने आशिष कुलकर्णी यांच्यावर सोपवली होती. त्यांनी पक्षाला 6 जागांवर विजय मिळवून दिला होता.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आशिष कुलकर्णी यांचे कौशल्य पाहून त्यांना त्यांचे तत्कालीन राजकीय सल्लागार अहमद पटेल यांच्यासोबत काम करण्यासाठी दिल्लीला बोलावले. त्यानंतर कुलकर्णी यांनी 2017 मध्ये काँग्रेसलाही रामराम ठोकला. मधल्या काळात ते राजकारणापासून दूर राहिले होते.त्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

...त्यांच्यामुळे झाले धनंजय महाडिक विजयी!

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या कोअर टीममध्ये काम करत आहेत. 2022 मध्ये झालेल्या राज्यसभा निवडणुकीत भाजपचे तिसरे उमेदवार असलेले धनंजय महाडिक यांना सर्व आमदारांनी दुसरी पसंती दिली. हे सर्व आशिष कुलकर्णी यांच्या नियोजनानुसार घडले. ज्याला भाजप निरीक्षक अश्विनी वैष्णव आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम रूप दिले.

पियुष गोयल आणि बोंडे यांना 48-48 मते मिळाली, जी 4800 गुणांमध्ये बदलली. दुसऱ्या पसंतीची मते महाडिक यांच्याकडे वर्ग करण्यात आली. एकूण 106 आमदारांची मते भाजपला मिळाली. याशिवाय 8 अपक्ष आणि इतर 9 आमदारांच्या मतांची भर पडल्याने धनंजय महाडिक यांचे एकूण गुण 4156 झाले. त्यामुळे महाडिक विजयी झाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिंदेच्या बंडापूर्वीचा मास्टर 'प्लॅन'

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड करण्यापूर्वी आशिष कुलकर्णी यांनी संपूर्ण प्लॅन तयार केला होता. शिवसेनेतले फुटू शकणाऱ्या आमदारांची यादीच त्यांनी नेत्यांसमोर मांडली होती. त्यांच्या अभ्यासामुळे ४० आमदार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत आले होते. याशिवाय सत्तासंघर्षात शिवसेनेसोबत काम केल्याने त्यांना संपूर्ण घटना माहीत होती. निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट आणि विधानसभा अध्यक्षांसमोर झालेल्या सुनावणींसाठी कुलकर्णी यांनी अभ्यासपूर्ण माहिती दिली. त्यामुळे सर्व खटल्यांचे निकाल शिंदेंच्या बाजूने लागले.

त्यापूर्वी आशिष कुलकर्णी यांनी अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांच्यासोबत काम केले होते. त्याशिवाय गणेश उत्सवात सप्टेंबर 2023 मध्ये अशोक चव्हाण व फडणवीस यांची आशिष कुलकर्णींच्या घरीच भेट झाली होती. त्यावेळेसपासून चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा जोरात रंगल्या होत्या.

...यानंतर चव्हाणांच्या प्रवेशाची सूत्रे हलली

निवडणूक आयोगाने राज्यसभेची निवडणूक जाहीर केल्यानंतर सूत्र हलली. महाराष्ट्रातील सहा जागांसाठी राज्यसभेची निवडणूक होत आहे. भाजपचे तीन उमेदवार आणि शिवसेना, राष्ट्रवादी प्रत्येकी एक उमेदवार निवडून येण्याची खात्री होती. काँग्रेसच्या उमेदवाराबाबत मात्र अनिश्चितता होती. काँग्रेसने माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) यांना उमेदवारी दिली. त्यामुळे पूर्वी बोलणी झाल्याप्रमाणे त्या नाराजीचा फायदा घेऊन अशोक चव्हाणांना (Ashok Chavan) भाजपमध्ये आणणं कुलकर्णी यांना सोपं झालं. या सर्व घटनाक्रमात रणनीतीकार म्हणून आशिष कुलकर्णी यांची भूमिका महत्वाची मानली जात आहे.

SCROLL FOR NEXT