राजकीय क्षेत्रात एकमेकांवर कुरघोडी करण्याची परंपरा आहे, मात्र सध्या त्याला जणू तीव्र स्पर्धेचं स्वरूप आलंय. 1989 मध्ये एक युवक एका राजकीय पक्षाचा वॉर्ड अध्यक्ष होता आणि आज तो राज्याच्या राजकारणात चाणक्य म्हणून ओळखला जातोय तर यावर कुणाचाही लवकर विश्वास बसणार नाही. पण ही वस्तुस्थिती आहे. जवळपास 34 वर्षांपूर्वी वॉर्ड अध्यक्ष पदापासून आपली राजकीय कारकीर्द सुरू करणारे देवेंद्र फडणवीस विदर्भातील पहिले व महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात कमी वयाचे मुख्यमंत्री ठरलेत.
देवेंद्र फडणवीस यांनी वॉर्ड अध्यक्ष ते आताचे उपमुख्यमंत्री व्हाया मुख्यमंत्री असा राजकीय प्रवासाचा टप्पा गाठला असला तरी येत्या काळात महाराष्ट्राचा हा राजकीय चाणक्य आपल्या बुद्धीबळाने कोणाला ‘चेकमेट’ करणार, याबाबत उत्सुकता आहे.वॉर्ड अध्यक्षपद मिळताच अवघ्या दोन वर्षांत फडणवीस हे नागपूर महापालिकेत नगरसेवक झाले. त्यानंतर महापौर बनले. राजकारणात एन्ट्री घेतल्यानंतर केवळ 10 वर्षांत आमदार होऊन त्यांनी राज्याच्या राजकारणात आपली छाप पाडली. महाराष्ट्राच्या राजकारणाचे गेमचेंजर म्हणून आता त्यांच्याकडे पाहिले जाते. फडणवीस यांचा राजकीय प्रवास एखाद्या चित्रपटाच्या कथानकाप्रमाणे आहे.
1999 पासून आजपर्यंत ते विधानसभा सदस्य आहेत. त्यापूर्वी 1992 ते 2001 या काळात ते सलग दोनदा नागपूर महापालिकेचे सदस्य होते. दोनदा नागपूरचे महापौरही होते. 1994 मध्ये आपल्या संघटन कौशल्याच्या बळावर फडणवीस राज्याच्या राजकारणात दाखल झाले. ते भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष झाले. 2001 मध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्षपदही त्यांनी भूषवले. राजकारणातील यशाचा त्यांचा हा प्रवास सुरूच राहिला. 2010 मध्ये फडणवीस भाजपचे प्रदेश सरचिटणी्स झाले. त्यानंतर लगेचच 2013 मध्ये पक्षाने त्यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवली. या कार्यकाळात त्यांनी पक्षबांधणी आणि पक्षविस्तारावर भर दिला.
महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपमध्ये त्यावेळी गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी, विनोद तावडे, एकनाथ खडसे यांचा बोलबाला होता. भाजपचे सगळे आकाश या नेत्यांनी व्यापून टाकले होते. अशावेळी देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकारची पोलखोल केली. फडणवीस यांनी 1999 मध्ये आमदार म्हणून निवडून आल्यानंतर दररोज सत्ताधारी पक्षावर किमान एकतरी प्रहार केला. 1999 ते 2014 या काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारची त्यांनी पुराव्यांसह पोलखोल केली. त्यांचा हा आक्रमकपणा राज्यातील जनतेला भावला. देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी सरकारला अक्षरशः सळो की पळो करून सोडलं. भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे त्यांनी उघडकीस आणली.भ्रष्टाचाराला कंटाळालेल्या जनतेला महाराष्ट्राचा नवा नेता म्हणून एक नवा चेहरा मिळाला.
रोजगारासह विविध विषयांवर देवेंद्र फडणवीस यांनी नितीन गडकरी, सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत महाराष्ट्र पिंजून काढला. केंद्रात सरकार अटलबिहारी वाजपेयी यांचे असो की राज्यात मनोहर जोशी आणि गोपीनाथ मुंडे यांचे, पक्षातील सच्चा कार्यकर्ता म्हणून त्यांनी भाजपसाठी संपूर्ण समर्पण दिलं. भाजपचे प्रदेशाध्यक्ष असताना त्यांनी पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांचा विश्वास संपादन केला.
स्वातंत्र्यानंतर 2014 मध्ये प्रथमच भाजपला लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळालं आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. अमित शाह त्यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. मोदी, शाह असो की, महाराष्ट्रातून केंद्रीय राजकारण गेलेले नितीन गडकरी यांच्याशी फडणवीस यांचे ट्यूनिंग चांगलं राहिलं. राजनाथ सिंह, सुषमा स्वराज, अरुण जेटली, प्रकाश जावडेकर यांच्याशी त्यांचे संबंध चांगलेच राहिले. त्यामुळे त्यांनी मोदी-शाह यांच्यासोबत महाराष्ट्रातील जनतेचाही विश्वास संपादन केला. त्याचवेळी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे 122 आमदार विजयी झाले व देवेंद्र फडणवीसांनी मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये भव्यदिव्य सोहळ्यात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
देवेंद्र फडणवीस हे त्यावेळी महाराष्ट्राचे दुसरे कमी वयाचे मुख्यमंत्री होते. त्यांच्यापूर्वी शरद पवार हे सर्वांत कमी वयाचे मुख्यमंत्री म्हणून नोंद होती. विदर्भातून सर्वांत कमी वयात मुख्यमंत्री होण्याचा बहुमान फडणवीस यांना मिळाला. 2014 ते 2019 या काळात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी अनेक क्रांतीकारी निर्णय घेतले.
शेतकरी, कामगार, सिंचन, उद्योग, रस्ते बांधणी यावर त्यांनी भर दिला. शासकीय स्वस्त धान्य दुकानांमध्ये इलेक्ट्रॉनिक वजन काटे लागले. आधारकार्ड वापराचा निर्णयही याच काळात झाला. विदर्भाचा अनुशेष भरून काढत फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात नागपूरचा कायापालट करून टाकला. समृद्धी महामार्ग, ग्रामीण भागात रस्त्यांचं जाळं, राज्यातील मेट्रो प्रकल्प, जलयुक्त शिवार, पोकरा योजना, शेतमालाची संगणकीय प्रणालीने नोंद, बाजार समितीमधून हमीभावाने खरेदी, सौरऊर्जा पंप, नैसर्गिक संकटात थेट आर्थिक मदत, शेतरस्त्यांची निर्मिती अशा निर्णयांची मालिकाच दिसली.
महाराष्ट्रातील कृत्रिमरित्या पेरलेली सामाजिक गुंतागुंत, आंदोलने, संघटनांचे नॅरेटिव्ह आदी अडचणींतून फडणवीस यांनी यशस्वीपणे मार्ग काढला. वेगवेगळ्या प्रकल्पांच्या विरोधात सुरू असलेली आंदोलनं अत्यंत योग्य पद्धतीने हाताळात त्यांनी सहकारी मंत्र्यांच्या मदतीने महाराष्ट्र विकासाच्या मार्गावर पुढे नेला. अर्थात त्यात विदर्भाचाही मोठा वाटा होता. मुंबईसह पुणे, नागपूरला मेट्रोचं जाळं तयार झालं. ऊर्जा निर्मितीसाठी सौर ऊर्जा प्रकल्प उभारला गेला, मराठवाडा वॉटर ग्रीड योजना आली. अशा अनेक योजना त्यांनी राबविल्या.
मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची ठिणगी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना नुकतीच पडलेली होती. कोपर्डीतील दुर्दैवी घटनेनंतर राज्यभरात मराठा क्रांती मोर्चे निघाले. आकडेवारीनुसार फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात राज्यात सर्वाधिक मोर्चे निघाले. त्यातून आरक्षणाची मागणी पुन्हा एकदा पुढे आली. आरक्षणाचा गुंता फडणवीस यांनी सोडवला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांकडं झालेलं दुर्लक्ष त्यांनी भरून काढलं. गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी स्वतंत्र दुर्ग संवर्धन समिती स्थापन झाली. अनेकदा विरोधकांकडून मुंबई ठप्प करण्याचा प्रयत्न झाला. पण त्यावर त्यांनी यशस्वी तोडगा काढला. 2014 ते 2019 हा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील मोठ्या कालावधीनंतरचे मुख्यमंत्री ठरले.
2019 मध्ये विधानसभा व लोकसभा निवडणुकीत फडणवीस यांनी स्वत:ला पक्षकार्यासाठी झोकून दिले. केंद्रात पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. या दोन्ही निवडणुकींसाठी फडणवीस यांनी जे कार्य महाराष्ट्रात केले, त्याची नोंद भापजच्या राष्ट्रीय नेत्यांनी घेतली. त्यामुळे दिल्लीत आधीपासूनच प्रतिष्ठा मिळविलेल्या फडणवीस यांचे राजकीय वजन आणखी वाढलं. राज्यात विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत मिळालं. परंतु राजकारणात अचानक काही नकारात्मक तडजोडी घडून आल्या. एकमेकांना दोष देणारे नेते एकत्र आले आणि महाविकास आघाडीचे सरकार राज्यात सत्तेवर आले. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाला सलग दुसऱ्यांदा गवसणी घालता आली नाही.
महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात फडणवीस विधानसभेचे विरोधी पक्षनेते झाले. कोरोनासारखे महाभयंकर संकट त्यावेळी देशात व महाराष्ट्रात घोंघावत होते. अशात फडणवीस यांनी विरोधीपक्ष नेते म्हणून पायाला भिंगरी बांधावी तशा वेगाने महाराष्ट्राभर दौरा केला. आरोग्य सेवा देणारे डॉक्टर, कर्मचारी, स्वछता कामगार, पोलीस यांच्या प्रत्यक्ष भेटी घेतल्या. भाजपच्या माध्यमातून कोविडग्रस्तांना मोठ्या प्रमाणावर मदत मिळवून दिली.
महाराष्ट्रात विरोधी पक्षनेता असताना भाजपने देवेंद्र फडणवीस यांना अनेक राज्यांमध्ये भाजपची ताकद वाढविण्यासाठी पाठवले. काही राज्यांमध्ये राजकीय पेच निर्माण झाले होते. अशा ठिकाणी फडणवीस यांना पाठवण्यात आले. त्यानंतर केंद्रीय राजकारणात जसे अमित शाह यांना मोदींचे चाणक्य मानले जात होते, अगदी त्याच पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणाक्य संबोधले जाऊ लागलं. त्यांच्या या कामांचे कौतुकही झालं आणि भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने पुन्हा त्याची दखलही घेतली.
विरोधी पक्षनेते म्हणून फडणवीस यांनी विधान सभेत अनेक ‘पेनड्राइव्ह बॉम्ब’ विरोधी पक्षांवर टाकले. ठाकरे-पवार सरकारचे अपयश त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेपुढे मांडले. महाविकास आघाडीच्या सरकारला अक्षरशः सळो की पळो करून सोडले. महाराष्ट्राचे राजकारण अनेक वळणांवर पुढं सरकत असताना महाविकास आघाडीमध्ये प्रचंड धुसफूस सुरू होती. आपल्या चातुर्याचा वापर करीत फडणवीस यांनी कोविडची महासाथ ओसरताच टायमिंग साधलं व महाविकास आघाडी सरकारचं पतन झालं. मात्र त्यानंतरही त्यांनी मुख्यमंत्री पद न घेता मुख्यमंत्रिपदाची माळ शिवसेनेतून फुटलेले एकनाथ शिंदे यांना गळ्यात घातली.
पहाटेचा शपथविधी अशा शब्दांचा वापर करीत डिवचणाऱ्यांना त्यांनी चोख प्रत्युत्तर दिलं. घड्याळाचे काटे असे काही उलटे फिरविले की राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा आपल्या काकांची साथ सोडून सत्ताधारी बाकांवर आले. हे कसे झाले हे कोणालाही कळले नाही. मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ संपायला आला असताना फडणवीस यांनी ‘मैं समंदर हूँ, लौट के जरूर आऊंगा..’ असं सांगत ‘मी पुन्हा येईन..’ असा शब्द दिला होता. तो त्यांनी खरा करून दाखवला. टीकाकारांचे तोंड त्यामुळे बंद झालं. मात्र ते मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर उपमुख्यमंत्री म्हणून परत आले.
राजकीय कारस्थान, षडयंत्राचे जाळे तयार करणाऱ्या घटकांना जशास तशी परतफेड करण्याचे कसब फडणवीस यांच्यात आहे, हे विरोधकही मान्य करतात. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक युवा नगरसेवक झाले. त्यातले अनेकजण फारतर विषय समित्यांचे सभापती, महापौर झाले. काही आमदार पदापर्यंत पोहाचले. त्यानंतर त्यांच्या नावापुढे केव्हा माजी आमदार लागले व त्यांची कारकीर्द संपल्याने ते इतिहासजमा झाले हे कळलंही नाही. परंतु वॉर्ड अध्यक्षपासून दिल्लीत प्रचंड वजन असलेला नेता म्हणून फडणवीस यांनी मिळविलेले नावलौकिक वेगळंच आहे. ‘नागपुरातील भाजप बूथ अध्यक्ष असलेला आमचा देवेंद्र आज इतका मोठा झालाय यावर विश्वासच बसत नाही,’ असे त्यांचे मित्र व राजकीय सहकारी अभिमानाने सांगतात.
फडणवीस यांच्या वागण्यात, बोलण्यात आजही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार दिसून येतात. महाराष्ट्राच्या या राजकीय चाणक्याला राज्यातील व केंद्रातील राजकारणाने केव्हाच प्रेमाने स्वीकारले आहे. राज्याच्या राजकारणातून देवेंद्र फडणवीस केंद्रीय राजकारणात जाणार अशा वावड्या नेहमीच उठत असतात. या सर्वांना चपखलपणे उत्तर देताना ते नेहमीच सांगतात की, ‘दिल्ली अभी दूर है..’ त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात फडणवीस हे नाव आणखी कोणकोणती चाणक्यनीती दाखवणार, हे पाहणं रंजक ठरणार आहे.
तूर्तास फडणवीस यांनी वॉर्ड अध्यक्ष ते आताचे उपमुख्यमंत्री व्हाया मुख्यमंत्री असा राजकीय प्रवासाचा टप्पा गाठला असला तरी येत्या काळात महाराष्ट्राचा हा राजकीय चाणक्य आपल्या बुद्धीबळाने कोणाला ‘चेकमेट’ करणार, याबाबत उत्सुकता आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.