Sugarcane Factory Sarkarnama
महाराष्ट्र

Sugarcane Weight Fraud : कारखान्यांच्या 'काटामारी'तून शेतकऱ्यांना २६०० कोटींचा फटका; एफआरपी वाढीपेक्षा लूट अधिक

Sugarcane Farmers : शेतकऱ्यांचे सरासरी एकरी २० ते २५ हजार रूपयांचे नुकसान झालेले आहे. कारखान्यांकडून उसाच्या वजनात ७ ते १० टक्क्यांपर्यंत काटामारी केली जाते, असे मत विश्लेषक सांगितले जात आहे.

सरकारनामा ब्यूरो

Farmers News : महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी साखर कारखान्यांचा गळीत हंगाम आर्थिक नुकसानीचा ठरत असल्याचे चित्र आहे. एकीकडे सरकारकडून उसाच्या रास्त व किफायतशीर दरात (एफआरपी) वाढ केली जात असताना दुसरीकडे कारखान्यांकडून वजनात काटामारी होत असल्याचा दावा केला जात आहे.

साखर कारखान्यांनी केलेल्या उसाच्या काटामारीमुळे शेतकऱ्यांना गेल्या वर्षीच्या हंगामात किमान २६०० कोटी रुपयांचा थेट फटका बसल्याचा अंदाज आहे. शेतकऱ्यांचे सरासरी एकरी २० ते २५ हजार रूपयांचे नुकसान झालेले आहे. कारखान्यांकडून उसाच्या वजनात ७ ते १० टक्क्यांपर्यंत काटामारी केली जाते, अशी माहिती या क्षेत्रातील तज्ज्ञ, अभ्यासक आणि विश्लेषकांनी दिली.

या प्रकारामुळे शेतकऱ्यांचे किमान २६०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जाते. तर काटामारीचे प्रमाण दहा टक्के गृहीत धरल्यास हा आकडा ३७०० कोटी रुपयांपर्यंत जातो. एका एकरातील उसाच्या उत्पादनावर शेतकऱ्यांना २० ते २५ हजार रुपये गमवावे लागत असल्याचा अंदाज आहे. विशेष म्हणजे या वजनातील तफावतीचा फटका ऊसतोड मजुरांनाही बसत असून त्यांचेही शेकडो कोटींचे नुकसान होत आहे.

केंद्र सरकारने २०२५-२६ च्या हंगामासाठी उसाची एफआरपी प्रतिटन ३५५० रुपये निश्चित केली होती. मागील हंगामाच्या तुलनेत एफआरपीमध्ये प्रतिटन १५० रुपयांची वाढ करण्यात आली. मात्र, कारखान्यांकडून होणाऱ्या काटामारीमुळे या वाढीचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांपर्यंत पूर्णपणे पोहोचत नसल्याचा दावा केला जात आहे.

शेतीमाल बाजार अभ्यासकांच्या मते, काटामारीमुळे शेतकऱ्यांना प्रतिटनामागे सुमारे २४७ रुपयांचे नुकसान सहन करावे लागते. म्हणजेच सरकारने एफआरपीमध्ये दिलेली १५० रुपयांची वाढही काटामारीतून होणाऱ्या संभाव्य नुकसानीपेक्षा कमी आहे. शेतीमाल बाजार विश्लेषक राजेंद्र जाधव यांनीही या प्रकारावर चिंता व्यक्त केली आहे. यंदाच्या दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी साखर कारखान्यांनी काटामारी थांबवून पारदर्शक वजनप्रक्रिया राबवावी, असे त्यांनी म्हटले आहे.

काटामारीचे गणित काय?

साखर आयुक्तालयाच्या आकडेवारीनुसार, २०२५-२६ या हंगामात राज्यातील २१० साखर कारखान्यांनी एकूण १०४५ लाख टन उसाचे गाळप केले. या गाळपापैकी किमान सात टक्के ऊस वजनातून कमी दाखवला गेला, असे गृहीत धरल्यास सुमारे ७३ लाख टन उसाची काटामारी झाल्याचा अंदाज आहे. एफआरपीच्या दरानुसार याची किंमत सुमारे २६०० कोटी रुपये होते.

काटामारीचे प्रमाण दहा टक्के असल्यास सुमारे १०४ लाख टन उसाचे वजन कमी दाखवले गेले असून, त्याची किंमत जवळपास ३७०० कोटी रुपये होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनीही गेल्या हंगामात दहा टक्के काटामारी झाल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या मते, या माध्यमातून कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या पैशांवर डल्ला मारला आहे.

वजनकाट्यांमध्ये फेरफार करून होते काटामारी?

उसाच्या वजनात काटामारी करण्याचा प्रकार अनेक वर्षांपासून सुरू असल्याचे या क्षेत्रातील अभ्यासकांचे म्हणणे आहे. कारखान्यांच्या वजनकाट्यांमध्ये फेरफार करून प्रत्यक्ष वजनापेक्षा कमी वजन नोंदवले जाते. शेतकऱ्यांना पैसे देताना याच नोंदवलेल्या वजनाचा आधार घेतला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उसाचे पूर्ण पैसे मिळत नसल्याचा आरोप आहे.

राज्यातील सर्वच साखर कारखाने अशा प्रकारात सहभागी आहेत, असे नाही. काही कारखाने वजनप्रक्रियेत पारदर्शकता ठेवून काटामारी करीत नसल्याचे सांगितले जाते. मात्र, काटामारी करणाऱ्या कारखान्यांची संख्या अधिक असल्याचा दावा या क्षेत्रातील जाणकार करतात.

शेतकऱ्यांना बाहेरील काट्यावर वजन करण्याचा अधिकार

काटामारी रोखण्यासाठी राज्य सरकारने नियम निश्चित केले आहेत. साखर आयुक्तालयाकडून प्रत्येक गळीत हंगामाच्या सुरुवातीला परिपत्रक काढून कारखान्यांना नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या जातात. शेतकऱ्यांना कारखान्याबाहेरील वैध वजनकाट्यावर उसाचे वजन करण्याचा अधिकारही आहे.

नियमानुसार, बाहेरील दोन वैध वजनकाट्यांवर उसाचे वजन करून घेतल्यानंतर दोन्ही ठिकाणचे वजन समान आले आणि कारखान्याच्या काट्यावर वजन कमी नोंदवले गेले, तर संबंधित कारखान्यावर कारवाई होऊ शकते. मात्र, प्रत्यक्षात या नियमांची अंमलबजावणी होत नसल्याच्या तक्रारी आहेत.

काही कारखाने खासगी वजनकाट्यावर वजन करून आणलेल्या वाहनांचा ऊस स्वीकारत नसल्याचा आरोप शेतकरी करतात. कारखान्यांशी ऊस वाहतूकदारांचे करार असल्याने वाहतूकदारही खासगी काट्यावर वजन करण्यास उत्सुक नसतात. दुसरीकडे, कारखान्यांविरोधात तक्रार केल्यास ऊस स्वीकारला जाणार नाही, अशी भीती शेतकऱ्यांना वाटते. त्यामुळे अनेकदा शेतकरी तक्रार करण्याचे टाळतात. तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने काटामारीचा प्रश्न कायम असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

एका एकरात पाच ते सहा टन उसाचे वजन कमी?

शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, एका एकरातून सरासरी ५० टन उसाचे उत्पादन मिळत असेल, तर पाच ते सहा टन उसाचे वजन कमी दाखवले जाते. त्यामुळे प्रतिएकर २० ते २५ हजार रुपयांचे नुकसान होते. उत्पादन खर्च, मजुरी आणि वाहतूक यांचा विचार करता शेतकऱ्यांच्या आर्थिक गणितावर याचा मोठा परिणाम होतो.

ऊसतोड मजुरांच्या मजुरीवरही परिणाम

काटामारीचा परिणाम केवळ शेतकऱ्यांपुरता मर्यादित राहत नाही. ऊसतोड मजुरांची मजुरीही कारखान्याच्या वजनकाट्यावर नोंदवलेल्या उसाच्या वजनानुसार ठरते. त्यामुळे वजन कमी नोंदवले गेल्यास मजुरांनाही कमी मजुरी मिळते.

२०२५-२६ च्या हंगामात गाडी सेंटरवर प्रतिटन ४०८ रुपये, तर डोकी सेंटरवर प्रतिटन ३६७ रुपये दर होता. बैलगाडीने ऊस कारखान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी एक किलोमीटरपर्यंत ७०० रुपये दिले जातात. त्यापुढील अंतरासाठी प्रतिकिलोमीटर २० ते २५ रुपये अतिरिक्त मिळतात.

अशा परिस्थितीत कारखान्याच्या वजनकाट्यावर उसाचे वजन कमी नोंदवले गेले, तर मजुरांच्या मजुरीतही कपात होते. सात टक्के काटामारी गृहीत धरल्यास ७३ लाख टन उसाच्या वजनातील तफावतीमुळे मजुरांचे २६८ ते ३०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

खासगी काट्यावर वजन करण्याची मुभा द्यावी

शेतीमाल बाजार अभ्यासक राजेंद्र जाधव यांच्या मते, एफआरपीमध्ये सातत्याने वाढ होत असली तरी शेतकऱ्यांच्या उत्पन्नात त्याच प्रमाणात वाढ झालेली नाही. कारखान्यांकडून होणारी काटामारी हे त्यामागील एक कारण आहे.

"शेतकरी दोन वेगवेगळ्या कारखान्यांना सारख्याच प्रमाणात ऊस पाठवतात, तेव्हाही वजनात मोठी तफावत दिसून येते. खासगी वजनकाट्यावर वजन करून आणलेल्या ट्रक आणि ट्रॅक्टर-ट्रॉलींना काही कारखाने प्रवेश देत नाहीत. वाहतूकदारांचे करार कारखान्यांशी असल्याने तेही कारखान्यात वजन करण्यापूर्वी खासगी काट्यावर वाहने नेण्यास तयार होत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना वजनात फसवणूक होत असल्याची जाणीव असूनही काही करता येत नाही. कारखान्यांनी प्रामाणिक व्यवहार करायचे असतील, तर ऊस आणण्यापूर्वी शेतकऱ्यांना कोणत्याही वैध वजनकाट्यावर वजन करण्याची मुभा द्यावी," असे जाधव यांनी सांगितले.

इलेक्ट्रॉनिक काट्यांमुळे काटामारी शक्य नाही

दुसरीकडे, साखर कारखानदारांनी काटामारीचे आरोप फेटाळले आहेत. साखर कारखान्यांसाठी इलेक्ट्रॉनिक वजनकाटे बंधनकारक करण्यात आले असून सर्व कारखान्यांनी त्यांची उभारणी केली आहे. त्यामुळे काटामारी करणे शक्य नसल्याचा दावा नॅचरल शुगरचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बी. बी. ठोंबरे यांनी केला.

"पाच वर्षांपूर्वी साखर कारखान्यांसाठी इलेक्ट्रॉनिक वजनकाटे बंधनकारक करण्यात आले आहेत. सर्व कारखान्यांनी इलेक्ट्रॉनिक काटे बसवले आहेत. तरीही शेतकऱ्यांना वजनाबाबत शंका असल्यास त्यांनी बाहेरील वैध इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यावर उसाचे वजन करून आणावे. बाहेरील काट्यावर वजन करून आणलेल्या शेतकऱ्यांचा ऊस कारखान्याने स्वीकारला नाही, तर ते चुकीचे आहे. वजनाची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक असली पाहिजे," असे ठोंबरे यांनी स्पष्ट केले.

काटामारीतून ३७०० कोटींचा काळा पैसा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी काटामारीच्या मुद्द्यावरून साखर कारखान्यांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, गेल्या हंगामात दहा टक्के काटामारी झाली असून कारखान्यांनी शेतकऱ्यांचा १०४ लाख टन ऊस कमी वजनात नोंदवला.

"या काटामारीतून कारखान्यांकडे सुमारे ३७०० कोटी रुपये काळा पैसा जमा झाला. काळा पैसा निर्माण करणारी ही समांतर व्यवस्था भक्कम झाली आहे. ती मोडून काढली पाहिजे. मी साखर आयुक्तांकडे ५०० टनांपेक्षा जास्त ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची यादी मागितली होती. या यादीच्या माध्यमातून खरे आणि खोटे शेतकरी कोण, हे स्पष्ट झाले असते. मात्र, साखर आयुक्तांनी अद्याप ही यादी दिलेली नाही," असा आरोप शेट्टी यांनी केला आहे.

एकीकडे कारखानदार इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यांमुळे काटामारी शक्य नसल्याचे सांगत आहेत, तर दुसरीकडे शेतकरी संघटना आणि अभ्यासकांकडून मोठ्या आर्थिक नुकसानीचे दावे केले जात आहेत. त्यामुळे उसाच्या वजनप्रक्रियेची स्वतंत्र तपासणी, नियमांची प्रभावी अंमलबजावणी आणि शेतकऱ्यांना पारदर्शक वजनाची हमी देण्याची मागणी पुन्हा ऐरणीवर आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT