

BVA News : विरार पश्चिमेतील म्हाडा मैदान परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या क्रीडा संकुलाला हितेंद्र ठाकूर यांचे नाव देण्याची मागणी विविध क्रीडा संघटनांनी केली असतानाच त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपने नरवीर चिमाजी आप्पाचे नावे देण्याची मागणी महापौरांकडे केल्याने येथील राजकीय वाद चांगलाच रंगला होता. अद्ययावत क्रीडा संकुलाच्या नामकरणाचे पडसाद वसई-विरार महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुरुवारी गुरुवारी उमटले.
या संकुलाला माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांचे नाव देण्याच्या प्रस्तावाला बहुजन विकास आघाडीच्या ६८ नगरसेवकांनी पाठिंबा दिला. तर विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांनी मांडलेल्या 'नरवीर चिमाजी आप्पा' नामकरणाच्या प्रस्तावाला ३६ नगरसेवकांनी समर्थन दिले. अखेर बहुमताच्या जोरावर क्रीडा संकुलाला 'लोकनेते हितेंद्र ठाकूर आप्पा' असे नाव देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.
पालिकेच्या २७ नोव्हेंबर रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेवर १३ विषय होते. मात्र, सर्वांचे लक्ष तेराव्या विषयाकडे लागले होते. विरार पश्चिमेतील नव्याने उभारण्यात आलेल्या क्रीडा संकुलाला कोणाचे नाव द्यायचे, यावरून गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. विविध क्रीडा संघटना आणि नगरसेवकांकडून या संकुलाला माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांचे नाव देण्याची मागणी करण्यात आली होती.
दुसरीकडे, विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांनी महापौरांना निवेदन देत संकुलाला'नरवीर चिमाजी आप्पा' यांचे नाव देण्याची मागणी केली होती. सर्वसाधारण सभेत हा विषय चर्चेला आला असता मनोज पाटील आणि प्रफुल्ल साने यांनी नरवीर चिमाजी आप्पा यांच्या ऐतिहासिक कार्याची माहिती सभागृहात मांडली. तर सभागृहनेते प्रफुल्ल साने यांनी कला आणि क्रीडा क्षेत्रातील हितेंद्र ठाकूर यांच्या योगदानाचा उल्लेख करत त्यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला.
या दोन्ही प्रस्तावांवर मतदान घेण्यात आले. हितेंद्र ठाकूर यांच्या नावाच्या प्रस्तावाच्या बाजूने बहुजन विकास आघाडीच्या ६८ नगरसेवकांनी मतदान केले. तर 'नरवीर चिमानी आप्पा' यांच्या नावाच्या प्रस्तावाला विरोधी पक्षातील ३६ नगरसेवकांनी पाठिंबा दिला. त्यामुळे 'लोकनेते हितेंद्र ठाकूर आप्पा' असे नामकरण करण्याचा उराव बहुमताने मंजूर झाला.
पूरप्रतिबंधक उपाययोजनांच्या चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांच्या प्रभागातील कामावरून वाद निर्माण झाला. बविआचे नगरसेवक अजय साळुंखे यांनी आक्षेप घेतल्याने पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. त्यावरून भाजप आणि बविआच्या नगरसेवकांमागे शाब्दिक चकमक उडाली. अखेर महापौर अजीव पाटील यांनी सदस्यांना शांत राहण्याचे आवाहन केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.