Pune News : उपमुख्यमंत्री पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी संघटनात्मक पातळीवर सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रत्येक आमदारांशी थेट संवाद साधणार असून त्यानुसार त्यांच्या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे. विलीनीकरणाची चर्चा सुरू असतानाच त्यांनी हा निर्णय घेतल्याने आता चर्चांना उधाण आले आहे.
एक बाजूला दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चा तीव्र झाल्या असताना, दुसरीकडे सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या बळकटीवर भर देण्याचे संकेत दिले आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षातील नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारलेल्या सुनेत्रा पवार यांनी संघटनात्मक स्तरावर हे पाऊल उचलले आहे. हे पाऊल पक्षातील एकजूट आणि मजबुतीसाठी महत्त्वपूर्ण मानले जात आहे.
पुढील आठवड्यापासून सुरू होणार संवाद सत्र!
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पुढील आठवड्यापासून पक्षातील सर्व आमदारांशी वैयक्तिक संवाद साधणार असल्याचे सांगितलं जात आहे. हा संवाद पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आणि आमदारांच्या अडचणी, समस्या जाणून घेण्यासाठी आयोजित करण्यात आला आहे. प्रत्येक आमदाराचे मत, सूचना आणि अपेक्षा जाणून घेण्यासाठी सुनेत्रा पवार स्वतः मैदानात उतरल्या असून, हा पक्षातील आमदारांशी त्यांचा पहिलाच असा व्यापक संवाद ठरणार आहे.
दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर आता कामाला सुरुवात केली आहे. काल त्यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यानंतर आज पुण्याच्या पालकमंत्री म्हणून जिल्हा नियोजन समितीच्या (DPC) बैठकीला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून अध्यक्षस्थानी उपस्थित राहून विकासकामांना गती देण्याच्या सूचना केल्या.
पक्ष आणि सरकार दोन्ही स्तरावर सुनेत्रा पवार या सक्रिय भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे. हा निर्णय पक्षातील आमदार आणि पदाधिकाऱ्यांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी सकारात्मक संदेश असल्याचे बोलले जात आहे. सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री आहेत. त्या राज्यसभेच्या खासदार असून त्यांना सहा महिन्यांच्या आत महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या सदस्य व्हावे लागणार आहे. त्यामुळे त्या राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन बारामती विधानसभेची पोटनिवडणूक लढविण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.