Maharashtra Politics: उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संसदीय बैठकीकडे सहा खासदारांनी पाठ फिरवल्यानंतर आता त्यांच्या खासदारकीवर प्रश्नचिन्ह निर्माण होणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
पक्षाने जारी केलेल्या व्हीपकडे दुर्लक्ष केल्यामुळे या खासदारांवर पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई होऊ शकते का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र, घटनातज्ज्ञ आणि कायदेतज्ज्ञांच्या मते संसदीय किंवा विधिमंडळातील मतदानाच्या वेळी लागू होणारा व्हीप आणि पक्षाच्या अंतर्गत बैठकीसाठी दिलेला व्हीप यात मोठा फरक आहे.
पक्षाचा अधिकृत व्हीप हा प्रामुख्याने संसद किंवा विधानसभेच्या सभागृहात लागू होतो. एखाद्या विधेयकावर मतदान, विश्वासदर्शक ठराव, अविश्वास प्रस्ताव किंवा महत्त्वाच्या निर्णयाच्या वेळी पक्ष सदस्यांनी कोणती भूमिका घ्यायची, याबाबत पक्ष व्हीप जारी करतो. त्या व्हीपचे उल्लंघन केल्यास संबंधित खासदार किंवा आमदारावर पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई होऊ शकते.
पक्षाच्या बैठकीसाठी जारी केलेला व्हीप हा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा असला, तरी तो संविधानिकदृष्ट्या बंधनकारक मानला जात नाही. त्यामुळे बैठकीला अनुपस्थित राहिल्याने थेट खासदारकी किंवा आमदारकी रद्द होऊ शकत नाही. मात्र, पक्षशिस्त मोडल्याचा ठपका ठेवत संबंधित सदस्यांवर पक्षांतर्गत कारवाई केली जाऊ शकते.
बैठकीला गैरहजर राहिलेल्या सदस्यांना पक्ष कारणे दाखवा नोटीस बजावू शकतो. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई, पक्षातील पदे काढून घेणे किंवा पक्षातून निलंबनासारखे निर्णय घेतले जाऊ शकतात. मात्र, केवळ अंतर्गत बैठकीला गैरहजर राहिल्यामुळे निवडून आलेले सदस्यत्व तात्काळ रद्द करण्याचा अधिकार पक्षाला मिळत नाही.
सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या विविध निकालांमध्ये स्पष्ट केले आहे, की पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई करण्यासाठी व्हीपचे उल्लंघन हे सभागृहाच्या आत झालेले असणे आवश्यक आहे. म्हणजेच मतदानाच्या वेळी पक्षाच्या निर्देशांच्या विरोधात मतदान करणे किंवा अनुपस्थित राहणे हे महत्त्वाचे मानले जाते. पक्षाच्या घरगुती किंवा अंतर्गत बैठकीसाठी ही तरतूद लागू होत नाही.
ठाकरे गटाच्या बैठकीला सहा खासदार गैरहजर राहिल्याने राजकीय संदेश नक्कीच गेला आहे. मात्र, केवळ या बैठकीला अनुपस्थित राहिल्याच्या आधारावर त्यांची खासदारकी धोक्यात येईल, अशी शक्यता तात्काळ दिसत नाही. पुढे संसदेतील मतदानावेळी पक्षाच्या अधिकृत भूमिकेविरोधात भूमिका घेतल्यास पक्षांतर बंदी कायद्याचा मुद्दा गंभीर ठरू शकतो.
परभणीचे संजय जाधव, यवतमाळ-वाशिमचे संजय देशमुख, धाराशिवचे ओमराजे निंबाळकर, शिर्डीचे भाऊसाहेब वाकचौरे, ईशान्य मुंबईचे संजय दीना पाटील आणि हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर हे नव्या राजकीय घडामोडींमध्ये सक्रिय असल्याची चर्चा रंगली आहे. या खासदारांनी स्वतंत्र भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे. उद्या (१९ जून) रोजी होणाऱ्या शिवसेनेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात हे खासदार आपली पुढील राजकीय भूमिका जाहीर करू शकतात, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.