Teachers News: शिक्षकांना मोठा दिलासा! अशैक्षणिक कामांना ब्रेक; आता अध्यापनासाठी अधिक वेळ

Maharashtra Education Department: महाराष्ट्रातील शिक्षकांना वाढत्या अशैक्षणिक कामांमधून दिलासा देण्यासाठी शिक्षण विभागाचा मोठा निर्णय. आता बहुतांश अहवाल आठवड्यातून फक्त शनिवारी सादर करावे लागणार.
 Maharashtra Education Department  Decided to reduce non-academic workload on teachers:
Maharashtra Education Department Decided to reduce non-academic workload on teachers:Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Education News: राज्यातील शिक्षकांना गेल्या काही वर्षांपासून वाढत्या अशैक्षणिक कामांच्या ओझ्याला सामोरे जावे लागत होते. निवडणुकीचे काम, विविध योजनांचे अहवाल, ऑनलाइन-ऑफलाइन माहिती, विद्यार्थ्यांची आकडेवारी, पोषण आहाराच्या नोंदी, सर्वेक्षणे आणि प्रशासनाकडून वारंवार मागवली जाणारी माहिती यामुळे शिक्षकांचा मोठा वेळ अध्यापनाऐवजी कागदोपत्री कामांमध्ये खर्च होत असल्याची तक्रार सातत्याने होत होती.

आता शिक्षण विभागाने यावर महत्त्वपूर्ण पाऊल उचलत शिक्षकांना मोठा दिलासा दिला आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७पासून शिक्षक आणि मुख्याध्यापकांना दैनंदिन आवश्यक नोंदी वगळता अन्य सर्व प्रकारचे अहवाल आणि माहिती आठवड्यातून केवळ एकदाच, म्हणजे शनिवारी सादर करावी लागणार आहे.

शिक्षकांची अशैक्षणिक कामे कमी करून त्यांना विद्यार्थ्यांच्या अध्ययन-अध्यापनासाठी अधिक वेळ उपलब्ध करून देणे, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी याबाबत परिपत्रक काढले आहे. विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक, गट शिक्षणाधिकारी, महापालिका प्रशासन अधिकारी तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांच्या प्राचार्यांना यासंदर्भात स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.

 Maharashtra Education Department  Decided to reduce non-academic workload on teachers:
Operation Tiger News: ऑपरेशन टायगर 3? 6 खासदारांनंतर आता 65 नगरसेवकही ठाकरे यांची साथ सोडणार, नरेश म्हस्केंचा दावा

राज्यातील शाळांकडून विविध स्तरांवर माहिती मागवली जात होती. केंद्र शासन, राज्य शासन, जिल्हा परिषद, शिक्षण विभाग, विविध अभियान आणि योजनांसाठी शाळांना सतत वेगवेगळे अहवाल पाठवावे लागत होते. अनेक वेळा एकाच प्रकारची माहिती वेगवेगळ्या पोर्टलवर अपलोड करावी लागत असल्याने शिक्षकांमध्ये नाराजी होती. त्यातच विद्यार्थ्यांची उपस्थिती, पोषण आहार, शिष्यवृत्ती, सुरक्षा, सर्वेक्षणे, विविध उपक्रमांचे फोटो व माहिती अपलोड करणे या कामांमध्ये शिक्षकांचा अध्यापनाचा वेळ कमी होत असल्याचे निदर्शनास आले होते.

“माहितीचा वार शनिवार”

या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने काही महत्त्वाच्या सुधारणा केल्या आहेत. यूडायस आणि सरल प्रणालींचे एकत्रीकरण करण्यात आले आहे. शाळा स्तरावरील अनेक समित्यांची संख्या कमी करण्यात आली आहे. पीएम पोषण योजनेतील नोंदवही सुलभ करण्याचा प्रयोग लातूर जिल्ह्यात पथदर्शी तत्त्वावर राबवण्यात आला होता. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा, गडचिरोलीतील एटापल्ली, बीडमधील आष्टी आणि नंदुरबारमधील अक्कलकुवा या तालुक्यांतील प्रत्येकी एका केंद्रात “माहितीचा वार शनिवार” हा उपक्रम प्रायोगिक स्वरूपात सुरू करण्यात आला.

कामांचा ताण कमी

या प्रयोगातून सकारात्मक परिणाम समोर आले. जवळपास ९० टक्के शिक्षकांनी या निर्णयाबाबत समाधान व्यक्त केले, तर ९६.६ टक्के शिक्षकांनी अध्यापनासाठी अधिक वेळ मिळाल्याचे नमूद केले. शिक्षकांना प्रशासनिक कामांचा ताण कमी झाल्याने विद्यार्थ्यांकडे अधिक लक्ष देता येत असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.

आठवड्यातून फक्त शनिवारी

नवीन निर्णयानुसार विद्या समीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदविणे, पीएम पोषण संकेतस्थळावर पोषण आहाराची माहिती देणे, विद्यार्थी सुरक्षा, आपत्कालीन परिस्थिती आणि विधिमंडळ कामकाजाशी संबंधित तातडीची माहिती ही कामे नियमित सुरू राहणार आहेत. मात्र त्याव्यतिरिक्त इतर सर्व प्रकारची माहिती आणि अहवाल शिक्षकांना आठवड्यातून फक्त शनिवारी सादर करता येणार आहेत.

 Maharashtra Education Department  Decided to reduce non-academic workload on teachers:
Operation Tiger News: ‘ऑपरेशन टायगर’चे पुणे कनेक्शन! नाना भानगिरेंच्या पोस्टर्समुळे खळबळ; स्क्रिप्ट आधीच तयार होती?

निर्णयाचे स्वागत

शिक्षक संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले असून हा निर्णय शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी महत्त्वाचा ठरेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. वारंवार माहिती पाठविण्याच्या प्रक्रियेमुळे वर्गातील अध्यापनावर परिणाम होत होता. आता शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेकडे अधिक लक्ष देता येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

शिक्षणावर भर

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थीकेंद्रित शिक्षणावर भर देण्यात येत आहे. त्यासाठी शिक्षकांना अध्यापनासाठी अधिक वेळ मिळणे आवश्यक असल्याचे शिक्षणतज्ज्ञांचे मत आहे. डिजिटल यंत्रणा वाढल्याने माहिती व्यवस्थापन सुलभ झाले असले, तरी त्याचबरोबर शिक्षकांवरील ऑनलाइन नोंदींचा ताणही वाढला होता. त्यामुळे माहिती संकलनाची प्रक्रिया मर्यादित ठेवण्याचा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

शैक्षणिक प्रगतीवर अधिक लक्ष

या निर्णयामुळे ग्रामीण भागातील शिक्षकांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. अनेक ठिकाणी इंटरनेट समस्या, तांत्रिक अडचणी आणि सततच्या माहिती संकलनामुळे शिक्षक त्रस्त होते. आता आठवड्यातून एकदाच अहवाल सादर करावा लागणार असल्याने त्यांचा वेळ आणि ऊर्जा वाचणार असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर अधिक लक्ष केंद्रित करता येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com