National Cleanliness Awards Navi Mumbai First Rank Sarkarnama
महाराष्ट्र

Swachh Survekshan 2025-26: महाराष्ट्राचा स्वच्छतेत डंका! नवी मुंबई देशात अव्वल; विटा, पाचगणी, पिंपरी-चिंचवडचाही गौरव

National Cleanliness Awards Navi Mumbai First Rank:स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ मध्ये महाराष्ट्राची राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी. नवी मुंबई देशात अव्वल, तर विटा, पाचगणी, रत्नागिरी आणि पिंपरी-चिंचवडचाही गौरव.

Mangesh Mahale

Maharashtra Cleanest Cities: स्वच्छ शहरांच्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राने पुन्हा एकदा आपली छाप उमटवली आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार २०२५-२६ मध्ये राज्यातील विविध शहरांनी वेगवेगळ्या श्रेणींमध्ये उल्लेखनीय यश मिळवले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने 'सुपर स्वच्छ लीग'मध्ये देशात पहिला क्रमांक पटकावून महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

विशेष म्हणजे, सांगली जिल्ह्यातील विटा शहराने आपल्या लोकसंख्या गटात देशात अव्वल स्थान मिळवले आहे. पर्यटननगरी पाचगणी, कोकणातील रत्नागिरी आणि पिंपरी-चिंचवडचाही राष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यात आला आहे.

नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार वितरण सोहळा नुकताच झाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विजेत्या शहरांना सन्मानित करण्यात आले. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कार्यमंत्री मनोहर लाल, राज्यमंत्री तोखन साहू, मंत्रालयाचे सचिव सत्येंद्र सिंह यांच्यासह देशातील विविध शहरांचे महापौर, आयुक्त आणि प्रशासकीय अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

नवी मुंबईचा देशात पहिला क्रमांक

नवी मुंबई महानगरपालिकेने 'सुपर स्वच्छ लीग'मध्ये अव्वल स्थान मिळवले. शहरातील कचरा व्यवस्थापनाची प्रभावी अंमलबजावणी, ओला-सुका कचरा वेगळा करणे, कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता या निकषांवर नवी मुंबईने सरस कामगिरी केली. नागरिकांचा स्वच्छता मोहिमेतील सहभागही या यशासाठी महत्त्वाचा ठरला. या श्रेणीत सुरतला दुसरा, तर विजयवाड्याला तिसरा क्रमांक मिळाला.

विटा-पाचगणीचीही राष्ट्रीय स्तरावर चमक

लहान शहरांच्या गटात महाराष्ट्रातील दोन शहरांनी विशेष कामगिरी केली. सांगली जिल्ह्यातील विटा नगरपरिषदेने २० हजार ते ५० हजार लोकसंख्या गटात देशात पहिला क्रमांक मिळवला. नियमित कचरा संकलन, वर्गीकरण आणि स्वच्छता व्यवस्थापनातील सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे विटाला हा बहुमान मिळाला. दुसरीकडे, २० हजारांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांच्या श्रेणीत पाचगणीने देशात द्वितीय क्रमांक पटकावला.

रत्नागिरी आणि पिंपरी-चिंचवडलाही पुरस्कार

कोकणातील रत्नागिरी नगरपरिषदेने स्वच्छ तटीय शहरांच्या श्रेणीत देशात तिसरे स्थान मिळवले. किनारपट्टी स्वच्छ ठेवणे, सागरी प्रदूषण रोखण्यासाठीचे प्रयत्न आणि पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमांची या पुरस्कारातून दखल घेण्यात आली. तर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला 'स्टेट फर्स्ट स्वच्छ सिटी' पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यामुळे राज्यातील स्वच्छ शहरांच्या यादीत पिंपरी-चिंचवडने प्रथम स्थान मिळवले आहे.

स्वच्छतेसाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा

पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वच्छतेचा संबंध केवळ शहरांच्या सौंदर्याशी नसून नागरिकांचे आरोग्य, सामाजिक जाणीव आणि प्रशासनाच्या उत्तरदायित्वाशी असल्याचे स्पष्ट केले. 'बढाएं हाथ, करें सफाई साथ' या संदेशातून त्यांनी स्वच्छता मोहिमेत नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले.

केंद्रीय मंत्री मनोहर लाल यांनी स्वच्छ भारत अभियानामुळे देशातील शहरी कचरा व्यवस्थापनात झालेल्या बदलांची माहिती दिली. २०१४ मध्ये शहरी कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे प्रमाण केवळ १६ टक्के होते. आता हे प्रमाण ८० टक्क्यांवर पोहोचले आहे. देशातील ९६ टक्क्यांहून अधिक घरांमधून कचऱ्याचे घरपोच संकलन केले जाते. तसेच देशातील ४ हजार ७५१ शहरांचा स्वच्छ सर्वेक्षणात समावेश करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT