Tanaji Sawant News : परतीच्या पावसाने झोडपलेल्या मराठवाड्याला आधार देण्यासाठी सरकारने आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. पण शिवसेनेने स्वतंत्रपणे मदत पाठवली आहे. मदतीच्या किटच्या माध्यमातून धान्य, तेल, साखर, शेंगदाणे अशा गोष्टी देऊ केल्या आहेत. पण हे देताना या मदतीच्या किटवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे फोटो छापण्यात आले आहेत.
या फोटोवरून शिवसेना आणि शिंदे, सरनाईक यांच्यावर टीका होऊ लागली आहे. येत्या काळात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका होणार आहेत. दिवाळीनंतर निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. या मदतीचे निमित्त साधून नेतेमंडळींकडून प्रचार केला जात असल्याचे दिसून येते. यावरच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनीही टीका केली.
याबाबत पत्रकारांनी धाराशिव दौऱ्यावर असलेल्या एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारला. त्यावर ते म्हणाले, अरे त्या मदतीमध्ये आत काय गोष्टी आहेत ते बघा. फोटो काय घेऊन बसलात? एवढे बोलताच शेजारी उभ्या असलेल्या आमदार तानाजी सावंत यांनी माईकचा ताबा घेतला आणि संजय राऊत यांना झोडून काढायला सुरुवात केली.
तानाजी सावंत म्हणाले, संजय राऊतला म्हणावं एक किलो धान्य आणं, माझ्या शेतकऱ्याच्या बांधावर जा आणि त्याला दे. त्याला म्हणावं कमीत कमी एक बाटली पाणी तर दे. मी तुझं कौतुक करतो. बाळासाहेबांचं त्याने काय घेतलं? बाळासाहेबांची आम्हाला शिकवण आहे, 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण, आले लक्षात.
हा भोंगा सकाळी 7 वाजता चालू होतो आणि रात्री 9 वाजेपर्यंत चालू असतो. त्याला फक्त उणीवा काढणं एवढंच येतं. आज त्यांच्या एक पदाधिकारी कुठल्या शेतकऱ्याच्या बांधावर गेलेला दिसतो का? एक किलो धान्य कोणाच्या घरात जाऊन देऊन त्यांचं अश्रू पुसण्याचं काम केलंय का? असा प्रतिप्रश्नच तानाजी सावंत यांनी अत्यंत संतप्त आवेशात केला.
पुढे सावंत म्हणाले, भाऊ ही मदत आज करत नाहीत. कोल्हापूरला ज्यावेळी झाले त्यावेळी सुद्धा लाखो लोकांच्या मदतीला भाऊच उभे राहिले होते. त्यावेळी नाव तुमचं होतं, करणारे आम्ही होतो. आज आम्ही स्वतः या ठिकाणी जाऊन जीव धोक्यात घालून शेतकऱ्याच्या बांधावर आम्ही जातोय, कारण आम्ही शेतकऱ्याची पोरं आहोत.
हे बोलून तानाजी सावंत माईकपासून थोडे मागे झाले आणि शिंदेंकडे बघून सफारी ताठ करत जग जिंकल्याप्रमाणे हसू लागले. तानाजी सावंत यांचा हा आवेश पाहुन शेजारी उभे असलेले एकनाथ शिंदेही काही वेळासाठी थक्क झाले. गेल्यावर्षीपासून मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने तानाजी सावंत नाराज असल्याच्या चर्चा होत्या. ते सार्वजनिक कार्यक्रमात, सार्वजनिक व्यासपीठावर दिसत नव्हते.
माध्यमांपासूनही अनेक दिवस लांबच होते. मध्यंतरी सावंत रुग्णालयात दाखल असल्याचेही समोर आले होते. आता काही दिवसांपासून तानाजी सावंत पुन्हा अॅक्टिव्ह झाल्याचे दिसत आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या भेट घेतल्याच्याही चर्चा आहेत. त्यामुळे त्यांची पुन्हा मंत्रिमंडळात एन्ट्री होणार असल्याचे बोलले गेले.
अशात त्यांचे पुन्हा अॅक्टिव्ह होणे, मुंबईत भेटीगाठी घेणे, शिंदे यांची बाजू सावरण्यासाठी धडपडणे या सगळ्या गोष्टींमधून त्यांचे खरंच मंत्रिपद फिक्स आहे का? अशा चर्चांना सुरुवात झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.