शिक्षक होण्याच्या स्वप्नासाठी अनेक महिने मेहनत घेणाऱ्या लाखो उमेदवारांना ऐनवेळी मोठा धक्का बसला आहे. राज्यभरात 28 जून रोजी होणारी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) अचानक पुढे ढकलण्यात आली. पेपरफुटीच्या संशयामुळे हा निर्णय घेण्यात आला असून, भिवंडी-ठाणे परिसरातून समोर आलेल्या धक्कादायक माहितीमुळे संपूर्ण परीक्षा प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. परीक्षेच्या आदल्या दिवशीच प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न बाहेर आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने यंदाची TET परीक्षा राज्यातील 1028 केंद्रांवर आयोजित करण्यात आली होती. NEET परीक्षेच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या वादांनंतर यावेळी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली होती. तरीही काही व्यक्तींकडे प्रश्नपत्रिकेशी संबंधित माहिती पोहोचल्याचे समोर आल्यानंतर संपूर्ण यंत्रणा सतर्क झाली.
27 जूनच्या पहाटे गोपनीय माहितीनुसार भिवंडी परिसरात पोलिसांनी छापा टाकला. तपासादरम्यान काही संशयितांकडे असलेल्या माहितीची पडताळणी करण्यासाठी परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले. तपासात संबंधित व्यक्तींकडे असलेले काही प्रश्न TET 2026 च्या प्रश्नपत्रिकेशी जुळत असल्याचे आढळून आले. त्यानंतर भिवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून पुढील चौकशी सुरू करण्यात आली.
दरम्यान, ठाणे परिसरात काही जणांकडून पैशांच्या मोबदल्यात प्रश्नपत्रिकेचा संच वितरित केला जात असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार कारवाई करत काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत परीक्षेशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
या गंभीर घडामोडींची माहिती मिळाल्यानंतर शिक्षण विभागाने तातडीची बैठक घेऊन परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. यंदा TET साठी राज्यभरातून 4 लाख 28 हजार 122 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी पुणे जिल्ह्यातील 45 हजार 562 उमेदवार परीक्षेला बसणार होते.
प्रश्नपत्रिका नेमकी कुठून बाहेर आली, ती कोणत्या माध्यमातून पसरवली गेली आणि या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा शोध आता तपास यंत्रणा घेत आहेत. नव्या परीक्षेची तारीख लवकरच जाहीर केली जाणार असली तरी या प्रकारामुळे प्रामाणिकपणे तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोषींवर कठोर कारवाईची मागणीही जोर धरू लागली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.