Mumbai : विधानसभा निवडणुकीच्या तयारी करणारे महाराष्ट्राचे माजी पोलिस महासंचालक संजय पांडे यांना मोठा धक्का बसला आहे. पांडे यांच्यासह इतर काही आजी-माजी पोलिस अधिकारी आणि वकिलावरही खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. ठाणे पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
मुंबईतील व्यावसायिक संजय पुनामिया यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली आहे. पांडे यांच्यासह निवृत्त एसीपी सरदार पाटील, पोलिस अधिकारी मनोहर पाटील, वकील शेखर जगताप, श्यामसुंदर अग्रवाल, शुभम अग्रवाल, शरद अग्रवाल आणि इतरांचा आरोपींमध्ये समावेश करण्यात आला आहे.
आरोपींकडून मे 2021 ते 30 जून 2024 या कालावधीत आपल्याला त्रास दिल्याचा आरोप पुनामिया यांनी केला आहे. 2016 मध्ये दाखल गुन्ह्याचा तपास बेकायदेशीरपणे करण्यात आला. खोट्या केसच्या धमक्या, पैसे उकळणे, खोटे दस्तावेज करून न्यायालयाची दिशाभूल करणे, असे आरोप तक्रारीत करण्यात आले आहेत.
पुनामिया यांनी सोमवारी ही तक्रार केली आहे. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांकडून आरोपींना अटक केली जाणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे. पांडे यांनी विधानसभा निवडणुकीत उतरण्याची घोषणा केली आहे. तसेच त्यांनी राज्याच्या इतर काही मतदारसंघातही उमेदवार उतरवण्याची तयारी केली असून चार जणांची नावेही जाहीर केली आहेत. राष्ट्रीय जनहित पक्षाच्या नावाने निवडणूक आयोगाकडे नोंदणी केली जाणार आहे.
संजय पांडे हे 1986 च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी असून 2022 मध्ये सेवेतून निवृत्त झाले. राज्याचे पोलिस महासंचालक, मुंबईचे पोलिस आयुक्त यांसह अनेक महत्वाच्या पदांवर त्यांनी काम केले आहे. कथित फोन टॅपिंग प्रकरणात पांडे यांना सीबीआयने सप्टेंबर 2022 मध्ये अटक केली होती. त्यानंतर दिल्ली हायकोर्टाने जामीन मंजूर केल्याने ते जेलमधून बाहेर आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.