CM Eknath Shinde Sarkarnama
महाराष्ट्र

CM Eknath Shinde Dasara Melawa : महाविकास आघाडीला लोकसभेत मिळालेले यश एक्सीडेंटल!

Jagdish Pansare

CM Eknath Shinde Speech News : लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला यश मिळाले. कारण आपण गाफील राहिलो, सलग सुट्या आल्याने मतदानाऐवजी आपण फिरायला गेलो. पण यावेळी ती चूक करू नका, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात केले. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेले यश हे एक्सीडेंटल होते, पर्मनंट नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

मुंबईच्या आझाद मैदानावर झालेल्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महाविकास आघाडीवर कडाडून हल्ला चढवला. एकनाथ शिंदे यांनी आपल्या अर्ध्यातासाहून अधिकच्या भाषणात जोरदार फटकेबाजी करतांना उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले होते. महाविकास आघाडीचे सरकार घालवले नसते तर राज्यातील विकासाचे प्रकल्प, जनतेच्या कल्याणासाठी राबवत असलेल्या योजना सुरू करता आल्या नसत्या.

लोकसभा निवडणुकीत आमच्या जागा कमी आल्या, पण त्यांच्यापेक्षा आमचा स्ट्राईक रेट जास्त होता. महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत जे यश मिळाले ते एक्सीडेंटल होते, ते पर्मनंट नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी `जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो, मातांनो आणि भगिनींनो, गर्व से कहो हम हिंदू है, याची आता काही लोकांना अलर्जी झाली आहे, असा टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

हिऱ्यापोटी जन्माला आलेल्या गारगोट्यांना आता याची लाज वाटते आहे. बाळासाहेबांच्या विचारांशी बेइमानी करणाऱ्यापासून आपण शिवसेना (Shivsena) मुक्त केली. म्हणून आझाद शिवसेनेचा हा आझाद मेळावा आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले. दोन वर्षात आपल सरकार लाडकं झालंय, लाडक्या बहीणी, भावांचं, शेतकऱ्यांच सरकार हे सरकार आहे. महाविकास आघाडीने तिसऱ्या क्रमांकावर नेलेले आपले राज्य आम्ही पुन्हा पहिल्या क्रमांकावर आणले.

सत्तांतर झाले नसते तर लाखो कोटींचे प्रकल्प थांबले असते. जनतेच्या कल्याणाच्या योजना झाल्या नसत्या. लाडक्या बहिणींची योजनाही आली नसती. आता राज्यातील लाडक्या बहिणी, भाऊ, ज्येष्ठ माझ्या सरकारचे ब्रँड ॲम्बेसेडर झाले आहेत. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ताठ मानेने लोकांसमोर जा, फेक नरेटीव्ह खोडून काढा, असे आवाहन शिंदे यांनी उपस्थितांना केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT