Manjara Dam  
महाराष्ट्र

राज्यात मुसळधार पावसाचा कहर; नद्या नाल्यांना पूर, शेतपिकांचे नुकसान

सरकारनामा ब्युरो

गुलाब चक्रीवादळामुळे (Gulab cyclone) हवामान विभागाने राज्यातील कोकण (Kokan), मध्य महाराष्ट्र (Madhy maharashtra), विदर्भ (Vidarbh) आणि मराठवाड्यात (marathwada) मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. या जिल्ह्यात २७ आणि २८ सप्टेंबरला झालेल्या मुसळधार पावसाने नद्या नाले तुडुंब भरुन वाहू लागले आहेत. अनेक ठिकाणी पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहेत. तर काही ठिकाणी हातातोंडाशी आलेल्या शेतपिकांचे नुकसान झाले.

उस्मानाबाद: जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी ही मुसळधार पाऊस आहे. गेल्या पाच दिवसापासून रात्र भर पाऊस तर दिवसभर ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. या सततच्या पावसाने जिल्ह्यातील सर्वच लहान मोठ्या नद्या नाले दुथडी भरुन वाहू लागले आहेत.

अनेक गावातील रस्त्यावरुन पाणी वाहू लागल्याने वाहतूक बंद झाली आहे. मांजरा नदीच्या पात्रात पाणी वाढल्याने वाकडी गावात काही लोक घराच्या छतावर अडकले आहेत. तर जिल्ह्यातील सीना कोळगाव धरणाचे दोन तर तेरणा धरणाचे सर्व दरवाजे उघडले आहेत. तर कालच्या पावसाने सोयाबीन व शेतीपिकेही पाण्याखाली गेली आहे.

लातूर :मागील काही दिवसापासून सातत्याने होत असलेल्या पावसामुळे लातूर जिल्ह्यातील अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. यात मांजरा, रेणा, तावरजा आणि तेरणा या मुख्य नदयांसह अनेक नद्यांना पूर आले आहेत. मात्र या पावसामुळे लातूर उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या मांजरा धरणाची स्थिती आता अतिशय उत्तम आहे. धरण 100 टक्के भरले आहे. यामुळे सहा दरवाजातून मागील काही दिवसापासून विसर्ग सुरू आहे.

मात्र परतीच्या पावसाचा पॅटर्न असलेल्या लातूर जिल्ह्यात येत्या काळात अधिक चा पाऊस अपेक्षित असल्याने शेतीचे नुकसान होण्याची भीती वर्तवली जात आहे. काढणीला आलेलं सोयाबीन भिजून नुकसान होत आहे तर शेतात उभं असलेलं सोयाबीन पिकात पाणी साचून हातच जात आहे यामुळे पुन्हा एकदा बळीराजा संकटात सापडला आहे मांजरा नदी काठच्या फकरानपुर, वांजरखेडा, हालकी, डोंगरगाव, उजेड, बिबराळ, बाकली, राणी अंकुलगा, शिवारातील पीक पाण्याखाली गेली आहेत तसेच शेंद, निटूर, ढोबळेवाडी, माचरटवाडी, बसपूर शिवारात पिकांना मोठा फटका बसला आहे.

बीड - मांजरा नदीला आलेल्या पूरामुळे 6 गावात पाणी शिरलं आहे. तर जवळपास 12 गावांचा संपर्क तुटला आहे. स्थानिक प्रशासनाकडून ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हवलण्यात येत आहे. मात्र गेल्या अनेक दशकानंतर मांजरा धरणाचे सर्वच्या सर्व 18 दरवाजे उघडल्याने, मांजरा नदीला महापूर आला आहे. त्याचबरोबर बीड जिल्ह्यात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील इतरही नद्यांना पूरस्थिती निर्माण झाली आहे.

यामुळे जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तर केज आणि अंबाजोगाई तालुक्यातील 6 गावांमध्ये पाणी शिरले आहे. तर जवळपास 12 गावांचा संपर्क तुटला आहे. आपेगाव, इस्तळ, देवळा, नायगाव, भटुंबा, सावळेश्वर पैठण, या गावात पुराचे पाणी शिरलं आहे. त्यामुळं अनेक ग्रामस्थांकडून स्थलांतर केलं जात आहे. दरम्यान या पूर परिस्थितीमुळे काल शेतामध्ये कामासाठी गेलेले अनेक जण, अडकल्याची देखील शक्यता वर्तविली जात आहे.

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पांगरी,उक्कडगाव, पांढरी, वाघाचीवाडी, वालवड या भागात काल रात्रभर पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. यामुळे गावातील नदी, नाले, ओढे तुडुंब भरून वाहून लागले आहेत. यामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाच्या पाण्यामध्ये मोठंमोठाले झाडे देखील वाहून जातानाचे चित्र पहायला मिळतं आहे. खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं दिसून येत आहे, तर जनावरांच्या चाऱ्याची ही गैरसोय झाली आहे. गावाला जोडणाऱ्या पुलांवर पाणी आल्याने परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT