Nagpur News : रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात टोरंट पॉवर कंपनीच्या प्रकल्पासाठी सुरू असलेल्या प्रस्तावित ३२ हजार झाडांच्या वृक्षतोडीवरून राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. अशातच सह्याद्रीच्या पर्यावरणाला धोका निर्माण करणाऱ्या आणखी सात प्रकल्पांचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या प्रकल्पांमुळे एकट्या कर्जत तालुक्यात सुमारे ११ हजार एकर जमीन बाधित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, वृक्षतोडीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. एकीकडे कर्जतमधील वृक्षतोडीला विरोध होत असतानाच राज्य वन्यजीव मंडळाच्या आणखी एका निर्णयामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
कर्जत तालुक्यातील साई डोंगर-१ प्रकल्पाला पर्यावरणप्रेमी, स्थानिक ग्रामस्थ आणि विविध राजकीय पक्षांकडून तीव्र विरोध होत आहे. मनसे, उद्धव ठाकरे यांची शिवसेना, काँग्रेस तसेच मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्यासह सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतील काही नेतेही जंगलातील वृक्षतोड थांबवण्याची मागणी करत आहेत. पर्यावरणप्रेमींकडूनही वृक्षतोडीविरोधात आवाज उठवला जात आहे.
कर्जतमधील वृक्षतोडीवरून राज्यात वातावरण तापले असतानाच राज्य वन्यजीव मंडळाच्या निर्णयामुळे आणखी एका मोठ्या वृक्षतोडीचा मुद्दा समोर आला आहे. 'लोकसत्ता'च्या वृत्तानुसार, राज्य वन्यजीव मंडळाने ४०० केव्ही वीजवाहिनी टाकण्याच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी तब्बल ५ हजार १५२ झाडे तोडली जाणार आहेत. विशेष म्हणजे, ही वीजवाहिनी वाघांच्या भ्रमणमार्गातून जाणार असल्याने वन्यजीवांच्या अधिवासावर आणि त्यांच्या नैसर्गिक मार्गिकांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या प्रकल्पाला राज्य वन्यजीव मंडळाने मंजुरी दिली असली, तरी अंतिम मंजुरीसाठी तो केंद्रीय वन्यजीव मंडळाकडे पाठवण्यात आला आहे. छत्तीसगडमधील रायपूर ते महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा या मार्गावर ही ४०० केव्ही वीजवाहिनी टाकली जाणार आहे. हा प्रकल्प अदानी पॉवरचा असून, त्यासाठी सुमारे १३६ हेक्टर क्षेत्राचा वापर केला जाणार आहे. या वीजवाहिनीमुळे महाराष्ट्रातील नवेगाव-नागझिरा ते पेंच आणि मध्य प्रदेशातील कान्हा ते छत्तीसगडमधील इंद्रावती व्याघ्रक्षेत्रांना जोडणाऱ्या वाघांच्या भ्रमणमार्गावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
या मार्गिका वाघांच्या मुक्त संचारासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. त्यामुळे वीजवाहिनी प्रकल्पामुळे जंगलातील जैवविविधता आणि वन्यजीवांच्या नैसर्गिक हालचालींवर परिणाम होण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या प्रकल्पामुळे वन्यजीवांवर होणारे संभाव्य परिणाम कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांच्या अनुषंगाने कंपनीला वनविभागाकडे ४ कोटी ४७ लाख रुपये जमा करण्यास सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्राला १,६०० मेगावॉट औष्णिक वीजपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा असल्याचे कारण देण्यात आले आहे. राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीच्या अजेंड्यानुसार, देशाच्या विद्युत पायाभूत सुविधांच्या विकासातही या प्रकल्पाची महत्त्वाची भूमिका राहणार आहे. राज्य वन्यजीव मंडळाने या प्रकल्पाला मंजुरी दिली असून, अंतिम मंजुरीसाठी तो केंद्रीय वन्यजीव मंडळाकडे पाठवण्यात आला असल्याची माहिती राज्याचे मुख्य वन्यजीव रक्षक एम. एस. रेड्डी यांनी दिली.
'वाघांच्या जनुकीय पुलासाठी भ्रमणमार्ग महत्त्वाचे'
या प्रकल्पावर पर्यावरणप्रेमी आणि वन्यजीव अभ्यासकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. पर्यावरणाला बाधा पोहोचवणाऱ्या आणि वाघांच्या भ्रमणमार्गांना धक्का देणाऱ्या कोणत्याही प्रकल्पांना मान्यता देऊ नये, अशी भूमिका मानद वन्यजीव रक्षक सावन बाहेकर यांनी मांडली आहे. वाघांच्या जनुकीय विविधतेसाठी आणि त्यांच्या अधिवासांमधील नैसर्गिक संपर्क टिकवून ठेवण्यासाठी या मार्गिका अत्यंत महत्त्वाच्या असतात. अशा परिस्थितीत विकासकामांच्या नावाखाली या मार्गिकांमध्ये अडथळे निर्माण झाल्यास वाघांचा जनुकीय संपर्क तुटण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, असे बाहेकर यांनी म्हटले आहे.
एकीकडे कर्जत तालुक्यातील टोरंट पॉवर प्रकल्पामुळे होणाऱ्या वृक्षतोडीविरोधात राज्यभरातून आवाज उठत असताना दुसरीकडे वाघांच्या भ्रमणमार्गातून जाणाऱ्या वीजवाहिनी प्रकल्पाला मंजुरी मिळाल्याने पर्यावरण आणि विकास यांच्यातील संघर्ष पुन्हा ऐरणीवर आला आहे. आता केंद्रीय वन्यजीव मंडळ या प्रकल्पाबाबत काय निर्णय घेते, याकडे पर्यावरणप्रेमी आणि वन्यजीव अभ्यासकांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.