FDA Raids News : बेधडक IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांची राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी नियुक्ती होऊन आज एक महिना पूर्ण होत आहे. या कालावधीत त्यांच्या नेतृत्वात अन्न आणि औषध प्रशासनाने बेधक कारवाया करत राज्याचे लक्ष वेधले आहे. फक्त एका महिन्याभराच्या कालावधीतच राज्यातील अवैध धंदेवाल्यांसह गुटखा व्यापार्यांचे कंबरडे मोडले आहे.
राज्यात त्यांनी कारवाईचा धडाका लावत गुटखा, पानमसाला, भेसळयुक्त अन्नपदार्थ, बनावट औषधे, वैद्यकीय उपकरणे आणि विनापरवाना व्यवसायांना चाप लावली आहे. यामुळे राज्यात सध्या तुकाराम मुंढे यांच्याबद्दल भीतीयुक्त दबदबा तयार झाला असून 5 मे ते 24 जून 2026 या कालावधीत राज्यभर 904 धाडीत तब्बल 34 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर 457 जणांना गजाआड करण्यात आले असून 42 वाहने देखील जप्त करण्यात आली आहेत.
सामम टीव्हीवर आलेल्या वृत्तानुसार अन्न व औषध प्रशासनाने 25 मे ते 24 जून 2026 या कालावधीत राज्यभर व्यापक मोहीम हाथी घेतली. या धडक मोहिमेत प्रतिबंधित गुटखा, पानमसाला, भेसळयुक्त अन्नपदार्थ, बनावट औषधे, वैद्यकीय उपकरणे आणि विनापरवाना व्यवसायांना चाप लावण्यात आली. तर महिन्याभरात 904 धाडी टाकत अन्न व औषध प्रशासनाने तब्बल 34 कोटी 66 लाख 90 हजार 624 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याच धाडीत 457 जणांना अटक करत 322 आस्थापना सील करण्यात आली आहेत. तर 42 वाहने जप्त करण्यात आली आहेत. तसेच या कालावधीत प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाल्याविरोधात 446 धडक कारवाया करण्यात आल्या आहेत. याशिवाय खाद्यपदार्थ आणि अन्न सुरक्षातंर्गत देखील 431 कारवाया केलेल्या आहेत.
आंबे, दुग्धजन्य पदार्थ, खाद्यतेल, मसाले, पॅकेज्ड पिण्याचे पाणी, खवा, बेकरी पदार्थ आणि इतर अन्नपदार्थांवर कडक कारवाई करत तब्बल 29.11 कोटी रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. यादरम्यान औषधे, वैद्यकीय उपकरणे, सौंदर्यप्रसाधने व इतर उत्पादनांवर जप्ती अथवा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी 55 विशेष मोहिमा विभागाने हाथी घेतल्या.
दिशाभूल करणाऱ्या औषध जाहिरातींविरोधात 31 कारवाया करत विभागाने त्यांच्यावर कारवाई केली आहे. तसेच विनापरवाना औषध व्यवसायाविरोधात एनडीपीएस कायद्यांतर्गत स्वतंत्र कारवाया करत 11 धाडी टाकण्यात आल्या. ज्यानंतर 9 गुन्हे नोंदवण्यात आले असून 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान नुकताच अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषद घेत जनतेच्या आरोग्याशी तडजोड केली जाणार नाही असा इशारा दिला आहे. तसेच कोणत्याही बेकायदेशीर कृतीला पाठीशी घातले जाणार नसून कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.