Nilesh Lanke met Anna Hazare sarkarnama
महाराष्ट्र

Nilesh Lanke : गजा मारणेनंतर थेट अण्णा हजारे; नीलेश लंकेंच्या गाठीभेटींचे 'विरुद्ध टोक'

Pradeep Pendhare

Nilesh Lanke : कुख्यात गुंड गजा मारणेच्या चहानं तोंड पोळल्यानंतर खासदार नीलेश लंके गाठीभेटी घेण्याबाबत काहीसे सजग झालेत. तसा ते जाणिवपूर्वक प्रयत्न करताना दिसत आहेत. किंबहुना गजानन मारणे भेट प्रकरणावर पांघरूण घालण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

नुकतीच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या वाढदिवसानिमित्तानं आज खासदार लंकेंनी त्यांची भेट घेतली. खासदार लंके यांच्या दोन दिवसांतील गाठीभेटीचा पट पाहिल्यास यातील विरुद्ध टोकं समोर येतात. ते उघडल्यास राजकारणात घूमजाव करण्याचे प्रयत्न स्पष्ट दिसतात.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके यांचे राजकीय होमग्राऊंड पारनेर. त्याच तालुक्यातील अण्णा हजारे. भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून देशात उभारलेले जनआंदोलनाचे नायक. त्यांच्या वक्तव्याची आणि भूमिकेचीच काय पण मौनाची देखील राज्य आणि केंद्र सरकार दखल घेते, असे हे व्यक्तिमत्त्व.

भ्रष्टाचाराच्या लढाईत त्यांना ' दुसरे गांधी ' म्हटलं गेलं हे विशेष. असे व्यक्तिमत्त्व देखील काहीसे वादात सापडले असले तरी, आंदोलन यशस्वी झाल्यामुळे त्यांना ज्येष्ठ समाजसेवक म्हणून आदर्श व्यक्तीचं स्थान कायमस्वरूपी मिळालं. अशा अण्णांचा आज वाढदिवस होता. या वाढदिवसानिमित्ताने खासदार नीलेश लंके यांनी त्यांची भेट घेतली. अण्णांना मिठाई भरवून शुभेच्छा दिल्या आणि आशीर्वाद घेतले. या दोघांमध्ये काही वेळ गप्पाही रंगल्या.

खासदार नीलेश लंके यांनी दोन दिवसांपूर्वी कुख्यात गुंड गजा मारणे याची भेट घेतली होती. या भेटीत मारणे याने त्याच्या मित्रपरिवाराच्या उपस्थितीत नीलेश लंके यांचा सत्कार केला. हा सत्काराचा व्हिडिओ समोर आल्यानंतर नीलेश लंके यांच्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली. भाजपने तुटून पडत चांगलेच वाभाडे काढले.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाने लोकसभेचा संदर्भ देत गाठभेट असावी, असे म्हणून डिवचले. नीलेश लंके या भेटीमुळे पुरते बॅकफूटवर गेले. ही भेट कळत-नकळत अपघात झाल्याचे सांगून बाजू सावरण्याचा त्यांनी प्रयत्न केला. यानंतर आमदार रोहित पवार खासदार लंकेंच्या मदतीला धावून आले. आमदार पवार यांनी स्वतः माफी मागितली.

नीलेश लंके यांनी या दोन दिवसांत समाजातील दोन विरुद्ध टोकांचे स्थान असणाऱ्या भेट घेतली. त्यामुळे बदलत्या राजकारणातील सारवासारव चर्चेत आली आहे. लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी पुढे सत्तेत आल्यावर कधी काय करतील याचा नेम नाही, अशी सर्वसामान्यांना वाटणारी भीती खरी ठरल्याचे बोलले गेले. राजकारणात लोकभावना सर्वात महत्त्वाची असते आणि ती जपण्यासाठी लागते नेत्याची स्वच्छ प्रतिमा. त्यामुळे लोकांना वेठीस धरणाऱ्या कुख्यात गुंडाला भेटल्यानंतर लगेचच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची भेट घेणे, हे मलीन प्रतिमा स्वच्छ करण्याचे प्रयत्न न वाटले तर नवलच!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT