Uddhav and Raj Thackeray’s strong stance against Hindi puts Congress in a political dilemma before key elections. 
महाराष्ट्र

Thackeray Brothers Vs Congress : ठाकरे बंधूंच्या एकीने 'काँग्रेसचं' मरण : धरलं तर चावतंय अन् सोडलं तर पळतंय...

Thackeray Brothers Vs Congress : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या हिंदी विरोधामुळे काँग्रेसची प्रचंड कोंडी झाली आहे. मुंबई महापालिका आणि बिहार निवडणुकीत हिंदी विरोधाचा फटका बसेल अशी भीती वाटत आहे.

Hrishikesh Nalagune

Thackeray Brothers Vs Congress : गत शनिवारी ठाकरे बंधूंनी आयोजित केलेला विजयी मेळावा पार पडला. या मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांनीही आगामी युतीबाबतचे संकेत दिले. दोघेही युतीबाबत अत्यंत सकारात्मक दिसून आले. यानंतर राज ठाकरे यांनी युतीबाबत कोणत्याही नेत्याने आपल्याला विचारल्याशिवाय बोलू नये असे आदेश दिले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात ही युती आकार घेईल हे निश्चित समजले जात आहे.

पण ठाकरे बंधूंच्या याच एकीने काँग्रेसची प्रचंड कोंडी झाली आहे. ठाकरेंनी आयोजित केलेल्या विजयी मेळाव्याला काँग्रेसचा एकही कार्यकर्ता किंवा कोणतेही नेते उपस्थित नव्हते. मराठी माणसाचे ऐक्य हा विषय महत्त्वाचा असल्याने मेळाव्याला हजर राहण्याचा प्रस्ताव एका महत्त्वाच्या मुंबईकर नेत्याने मांडला होता; मात्र हे योग्य होणार नाही, असे दिल्लीने कळवले. त्यामुळे काँग्रेसने या मोर्चाकडे पाठ फिरविली.

धरलं तर चावतंय...

दोन्ही बंधूंचा अजेंडा असलेल्या हिंदीविरोधाचा मुंबई आणि बिहार विधानसभेच्या निवडणुकीत फटका बसू शकेल, अशी भीती काँग्रेसला वाटते आहे. ठाकरे बंधू हे महाराष्ट्रापुरते मर्यादित आहेत. परंतु काँग्रेसचे स्वरुप देशव्यापी आहे. त्यामुळे काँग्रेसला सर्व भाषिकांशी नाते ठेवावे लागते. मुंबईतही 45 ते 50 टक्के असलेले मराठी भाषिक आज घडीला 30 ते 35 टक्के राहिले आहेत.

गुजराती, राजस्थानी, बिहारी, उत्तर प्रदेशी यांच्यासह दक्षिणात्य भाषिकांची लोकसंख्या मुंबईत लक्षणीय प्रमाणात आहे. हे सर्व काँग्रेसचे मतदार आहेत. मतासाठी त्यांना सांभाळणे काँग्रेसला भागच आहे. काँग्रेसनेही पूर्वीपासून मुंबईमध्ये भाषिक समतोल राखण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष मराठी दिले तरी मुंबईत बॅ. रजनी पटेल, मुरली देवरा असे गुजराती - राजस्थानी मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष होते.

या सगळ्यामुळे ठाकरे बंधूंसोबत न जाता काँग्रेसने सध्या तरी 'हिंदी विरोध' हा मुद्दा काठावर बसून बघणेच योग्य समजले आहे. यातूनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा प्रस्ताव नेत्यांच्या विचारात आहे. शिवाय स्थानिक नेतृत्वाला संधी दिल्यास पक्षविस्तारासाठी वेगळे लढण्याचा भविष्यात विचार होईल, असे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना वाटते.

काँग्रेसला उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाण्यात आणखीही अडचणी आहेत. एक तर काँग्रेसची व्होटबँक येत्या निवडणुकीत ठाकरेंकडे जाऊ शकते, असे काँग्रेसला वाटते. काँग्रेसचा आधार असलेली अल्पसंख्यांकांची मते ठाकरेंना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मिळाली. आता स्थानिकच्या निवडणुकीतही हीच चूक झाली तर आपली हक्काची मते कायमची गमावून बसू असे काँग्रेसला वाटते.

सांगली लोकसभा मतदारसंघाच्या राजकारणापासून आपण केवळ मान्यता देण्याचे काम केले अशी खंत दिल्लीदरबारात व्यक्त करण्यात आली. त्यामुळे आगामी काळात काँग्रेस ठाकरेंप्रति आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण या सगळ्यावर योग्य भूमिका घेण्यास अजून वेळ हवा आहे. त्यामुळे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी मुंबईचा दौराही पुढे ढकलला आहे.

सोडलं तर पळतंय...

दुसऱ्या बाजूला काँग्रेसची मोठी अडचण आहे ती केडरची. काँग्रेस एकेकाळी मुंबईत स्वबळावर सत्तेत होता. मुंबईतील सहाही खासदार काँग्रेसचे होते. पण शिवसेना आणि भाजपचे काँग्रेसचे केडर उद्ध्वस्त केले आहे. काँग्रेसला बहुभाषिक भाग असलेल्या उत्तर मुंबईतून दारूण पराभव स्वीकारावा लागला. वर्षा गायकवाडही संघर्षमय विजयातून निवडून आल्या आहेत.

त्यामुळे युतीतून बाहेर पडायचे तर स्वबळावर लढायला केडर आणि सैनिक कुठून आणायचे असा प्रश्न आहे. एकूणच काँग्रेससाठी आताची अवस्था इकडे आड आणि तिकडे विहीर अशी झाली आहे. ठाकरे बंधूंचे भावबंधन होत असताना काँग्रेस ही कोंडी कशी फोडणार? हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. पण हिंदी आणि मराठी मुद्दा साधताना कॉंग्रेस नेतृत्वाची कसोटी लागणार आहे हे नक्की.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT