BJP Delimitation Strategy : मतचोरीविरोधात विरोधांची धार भाजपला रोखता आली नाही. एसआयआरचा मुद्दा सत्ताधाऱ्यांच्या विरोधातच गेला. यातच पेपरफुटीवरून जेन-जीने पुरता आरसा दाखवला. यातूनच डिलिमिटेशन विधेयक आणल्याशिवाय आणि ते मंजूर केल्याशिवाय गत्यंतर नसल्याने केंद्रातील भाजप मोदी सरकार दुसऱ्यांदा जोरदार प्रयत्न करत आहे. त्यांचा हा प्रयत्न जवळपास विजयाच्या उंबरठ्यावर आहे.
भाजपचा हा डाव यशस्वी होईल, हे विरोधकांनी देखील जवळपास मान्य केल्याचे दिसते. यातच शेवटचा प्रयत्न म्हणून, काँग्रेस जोर लावताना दिसत आहे. यातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी, 'सत्ताधारी भाजपने विरोधकांच्या विजयाची शक्यताच संपुष्टात आणली', याचे गणित मांडले. उद्धव ठाकरेंच्या या गणितावर विरोधक, या विधेयकाविरोधात संसदेत किती प्रभावी मांडणी करतील, याकडे आता लक्ष लागले आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena UBT) म्हणाले, “हा सर्व एका कटाचा भाग आहे. केवळ दिखावा केला जात आहे. महिला आरक्षण विधेयक यापूर्वीच मंजूर झाले आहे आणि आजही माझा त्याला पाठिंबा आहे. मात्र, सध्याच्या खासदारांच्या संख्येच्या आधारेच ही प्रक्रिया सुरू व्हायला हवी, असे माझे मत आहे. आमचा विरोध महिला आरक्षणाला नसून संपूर्ण प्रक्रियेलाच आहे."
ज्ञानेश कुमार यांच्यावर मतांची फेरफार केल्याचे आरोप झाले आहेत आणि ते आरोप सिद्धही झाले आहेत. तरीही त्यांच्याकडेच जबाबदारी कायम राहणार आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश कोण असतील? आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तिसरी व्यक्ती कोण असेल? ती व्यक्ती ज्ञानेश कुमार यांच्या पसंतीने निवडली जाणार आहे. यावरून संपूर्ण पटकथा आधीच लिहून ठेवण्यात आली आहे, असा गंभीर आरोप उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) केला.
मतदारसंघ फेररचनेच्या प्रक्रियेचा आम्हाला थेट अनुभव आहे, हे सांगताना 2017 मध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत नेमके हेच घडले होते. दोन प्रभाग असे होते, जिथे आम्ही सातत्याने विजय मिळवत होतो. त्यावेळी त्यांनी नियोजनपूर्वक खेळी केली आणि विरोधकांचा प्रभाव मोडून काढण्यात आल्याकडे उद्धव ठाकरेंनी लक्ष वेधले.
मतदार याद्यांचे विश्लेषण करून भाजपला मतदान करणारे कोण आणि विरोधकांना मतदान करणारे कोण, हे तपासण्यात आले. त्यानंतर विशिष्ट मतदारांना दोनपैकी एकाच प्रभागात एकत्र करण्यात आले. हे निवडणूक आयोगाच्या कारभारामुळे शक्य झाले. हाच डाव आता डिलिमिटेशन विधेयकाच्या माध्यमातून देशपातळीवर खेळला जात आहे, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.
या गणितामुळे आमचा एक प्रभाग आणखी मजबूत झाला आणि त्या प्रभागातील मताधिक्य वाढले. मात्र, दुसऱ्या प्रभागात आम्ही आधी मिळवलेली ताकद गमावली. कारण दुसऱ्या मतदार यादीतील मतदार त्या प्रभागात आणण्यात आले. अशा प्रकारे आमच्या दोनपैकी एका प्रभागातील विजयाची शक्यता तिथेच संपुष्टात आणण्यात आली, याकडे उद्धव ठाकरेंनी लक्ष वेधले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.