

Government Doctors Private Practice : सरकारी रुग्णालयांमध्ये सेवा देण्याऐवजी खासगी दवाखाने चालवणाऱ्या डॉक्टरांवर आता थेट बडतर्फीची कारवाई होऊ शकते. सरकारी आरोग्य सेवेत काम करताना खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांची माहिती गोळा केली जात असून, अशा प्रकारचा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिला.
'तुम्हाला खासगी प्रॅक्टिस करायची असेल, तर आम्ही बुके देऊन शुभेच्छा देऊ,' अशा शब्दांत त्यांनी सरकारी डॉक्टरांना सुनावले.
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर (Sangamner) येथे आरोग्य संवाद यात्रेचा प्रारंभ करण्यात आला. यानिमित्ताने त्यांनी संगमनेर ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन आरोग्य सुविधांचा आढावा घेतला. यावेळी आमदार अमोल खताळ उपस्थित होते.
राज्य सरकारकडून सर्वसामान्य आणि गरीब नागरिकांसाठी शहरी तसेच ग्रामीण भागात विविध आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. रुग्णालयांना आवश्यक निधी आणि सुविधा दिल्या जात असतानाही काही ग्रामीण आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांमधील डॉक्टर (Doctor) सरकारी सेवेकडे दुर्लक्ष करून खासगी दवाखाने चालवत असल्याच्या तक्रारी आहेत. अशा डॉक्टरांवर आता कठोर कारवाई केली जाईल, असे आबिटकर यांनी स्पष्ट केले.
सरकारी सेवेत असलेल्या डॉक्टरांना खासगी रुग्णालय सुरू करण्याची परवानगी नाही. तरीही काही डॉक्टर खासगी प्रॅक्टिस करत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत आरोग्य विभागाकडून माहिती गोळा केली जात आहे. सामान्य नागरिकांनीही अशा डॉक्टरांविरोधात तक्रार केल्यास त्याची दखल घेऊन कारवाई केली जाईल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढल्याने डॉक्टरांची उपलब्धताही वाढत आहे. अनेक तरुण डॉक्टर सरकारी आरोग्य सेवेत काम करण्याची संधी शोधत आहेत. त्यामुळे सरकारी सेवेत राहून खासगी प्रॅक्टिस करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, संगमनेर ग्रामीण रुग्णालयातील रुग्णसंख्या आणि प्रसूतीचे प्रमाण अत्यल्प असल्याचे पाहून आरोग्यमंत्री आबिटकर यांनी नाराजी व्यक्त केली. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना पुरेशा आरोग्य सुविधा मिळतात की नाही, याची तपासणी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. रुग्णालयातील रुग्णांना आरोग्यदायी आणि उत्तम दर्जाचे जेवण मिळाले पाहिजे, अशा सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या. आरोग्य विभागाकडून रुग्णालयांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जातो. मात्र, त्यानंतरही जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असेल, तर संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे आबिटकर यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.