राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या मोठी खळबळ उडवणारी एक चर्चा जोर धरताना दिसत आहे. शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मध्यरात्री वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट झाल्याचा दावा काही माध्यमांतून करण्यात आला आहे. या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
प्रकाश आंबेडकर यांच्या प्रबुद्ध भारत या मीडिया हाऊसकडून ही माहिती समोर आल्याचं सांगितलं जात आहे. या दाव्यानुसार बुधवारी रात्री साधारण 2 वाजण्याच्या सुमारास ही भेट झाली. मात्र या भेटीबाबत अद्याप दोन्ही बाजूंनी कोणताही अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. त्यामुळे ही भेट प्रत्यक्षात झाली की नाही, याबाबत संभ्रम कायम आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी यावर थेट बोलणं टाळलं. अशा प्रकारच्या संवेदनशील विषयांवर संबंधित नेतेच स्पष्ट बोलू शकतात, असं त्यांनी सांगितलं. तसेच, माझ्याकडे काही माहिती असली तरी ती सध्या उघड करण्याची गरज नाही, राजकारणात अजून बऱ्याच गोष्टी घडणार आहेत, असं सूचक विधान करत त्यांनी अधिक चर्चा टाळली. राजकारणात पुढे अनेक घडामोडी घडणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
दुसरीकडे, भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी मात्र हा दावा फेटाळून लावला आहे. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची अशी कोणतीही भेट झालेली नाही, तसेच ही पूर्णपणे चुकीची आणि दिशाभूल करणारी बातमी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे या प्रकरणात नेमकं सत्य काय आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
एकूणच, या कथित मध्यरात्रीच्या भेटीने राजकीय वातावरणात उत्सुकता आणि संभ्रम दोन्ही वाढवले आहेत. अधिकृत माहिती समोर येईपर्यंत या चर्चांना आणखी रंग चढण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.