मुंबई : लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक पार पडल्यानंतर शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुजरातवरती लक्ष केंद्रीत केले आहे. आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधील पदाधिकाऱ्यांची सोमवारी ‘मातोश्री' निवासस्थानी बैठक पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी बुथ लेवलपासून संघटन मजबूत करण्यावर भर देऊन पक्षबांधणीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
या बैठकीला पक्षाचे सचिव विनायक राऊत, हिंद केसरी श्रमिक सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक राऊत, गुजरात राज्याचे माजी राज्यप्रमुख दीपक खर्शिकर, बिमल भट, अरुण कलाल, दिलीप अहिर, मंजुषा गायकवाड आणि रश्मी साळगावकर यांच्यासह 70 हून अधिक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आपण कायम उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वासोबत खंबीरपणे उभे आहोत, अशी शाश्वती पदाधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान, या बैठकीनंतर कार्यकर्त्यांनी गुजरातमध्ये यंदा शिवसेना (उबाठा) ताकद दाखविणारच असा दावा केला. शिवसेनेची पकड आधीपासूनच गुजरातमध्ये आहे. याउलट भाजपला आम्ही उभे केले आहे. शिवसेनेमुळे भाजप (BJP) उभा राहु शकला. भाजपची गुजरातमध्ये ताकद नाही. आतापर्यंत केवळ ईव्हीएमच्या आधारे भाजपने गुजरातमधील निवडणूक जिंकली आहे, असाही दावा कार्यकर्त्यांनी केला.
शिवसेना (उबाठा) ची राज्याबाहेर ताकद वाढवण्याचा उद्धव ठाकरे यांचा प्रयत्न असल्याचे दिसून येते. यापूर्वीही शिवसेना एकत्र असताना महाराष्ट्राबाहेर निवडणूक लढवली आहे. दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश, गुजरात, गोवा अशा राज्यांमध्ये सेनेने आपली ताकद आजमावली आहे. यात त्यांना उत्तर प्रदेशमध्ये एकदा यश आले होते. तर 2021 मध्ये दादरा-नगर हवेली पोटनिवडणुकीतही शिवसेनेने कलाबेन डेलकर यांच्यारुपाने विजय संपादन केला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.