Mumbai News: दिल्लीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ग्रीन सिग्नल दिल्यानंतर अवघ्या 35 मिनिटांतच राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी 'ऑपरेशन टायगर'ची स्क्रिप्ट लिहिल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.यानंतर ऑपरेशन अंतर्गत ठाकरेंना जय महाराष्ट्र करत सहा खासदारांनी ठाकरेंची साथ सोडल्यातच जमा आहे. यासर्व खासदारांबाबत नवी अपडेट समोर येत आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या सहा खासदारांनी बंडखोरी करत स्वतंत्र गट स्थापन केल्याचं पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना दिले आहे. येत्या 21 जूनला हे सर्व खासदार एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची अधिकृत घोषणा करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी बंडखोर खासदारांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेशी गद्दारी केल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच त्यांनी शिवसैनिकांना फुटलेल्या खासदारांना कायद्याची कोणतीही तमा न बाळगता रस्त्यात तुडवा असं टोकाचं आवाहनही केलं आहे. यामुळे शिवसेनेचं राजकारण तापलं आहे.
आता शिवसेनेतील या दुसर्या बंडामागं परभणीचे खासदार संजय जाधव हे महत्त्वाचे सूत्रधार असल्याची जोरदार चर्चा आहे. तेच या बंडखोर खासदारांच्या स्वतंत्र गटाचं नेतृत्व करणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे संजय राऊतांच्या धमकीवजा इशार्यानंतर आणि शिवसैनिकांच्या संतप्त भूमिकेनंतर आता बंडखोर खासदारांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
याच पार्श्वभूमीवर आता बंडखोर खासदारांच्या स्वतंत्र गटाचे कॅप्टन म्हणून शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा असतानाच परभणीचे खासदार संजय जाधव यांच्या घराबाहेर घराबाहेर मोठ्या प्रमाणात सुरक्षा वाढवण्यात आल्याचं समोर येत आहे. पोलिसांनी खबरदारी म्हणून संबंधित खासदारांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली आहे. यात संजय जाधवांसह ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांचाही समावेश आहे.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून गुरुवारी (ता.18 जून) संसदीय दलाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून सर्व खासदारांना व्हीपही जारी करण्यात आला होता. तसेच या बैठकीकडे खासदारांच्या एकनिष्ठतेची 'लिटमस टेस्ट' म्हणून पाहिले जात होते.
उद्धव ठाकरेंचे नेमके किती खासदार फुटले, किती एकनिष्ठ यासंबंधीचे चित्रही या संसदीय दलाच्या बैठकीनंतर स्पष्ट झालं आहे.कारण या बैठकीसाठी लोकसभेचे एकूण 9 पैकी 3 खासदार उपस्थित राहिले. ऑपरेशन टायगरमधील सहाही खासदार गैरहजर राहिल्यानं ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचं निश्चित मानलं जात आहे
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.