Uddhav Thackeray 1 Sarkarnama
महाराष्ट्र

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी नाराज नगरसेवकांना सुनावले; म्हणाले, 'अडचणीच्या काळात पक्षाला ब्लॅकमेल करणे योग्य नाही'

Shiv Sena Updates News : काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून महायुतीकडे जाणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.

Sachin Waghmare

Mumbai News : राज्यातील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून महाविकास आघाडीतील तीन ही पक्षाला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून महायुतीकडे जाणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे टेन्शन वाढले आहे. त्यातच ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतील नाराज नगरसेवकांना सुनावले आहे.

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला (BJP) मिळालेल्या प्रचंड यशानंतर ठाकरे गटाचे अनेक नगरसेवक पक्षांतर करण्याच्या विचारात असल्याची माहिती आहे. पक्षात नाराजीचा सूर आवळणाऱ्या माजी नगरसेवकांना आणि पदाधिकाऱ्यांसमोर उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. विधानसभा निवडणुकीनंतर काही शिवसैनिक पदाधिकारी ठाकरेंचे शिवसेनेला सोडून गेले. त्यानंतर आता काहींनी नाराजीचा सूर आवळला आहे. त्यामुळे येत्या काळात शिवसेनेतील काही नगरसेवक महायुतीच्या वाटेवर असल्याची चर्चा जोरात आहे.

येत्या काळात मुंबई महानगरपालिका निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केले. पक्षाच्या अडचणीच्या काळात पक्षाला ब्लॅकमेल करणं योग्य नाही. ज्याला जायचं आहे त्यांनी जा, मी कोणाला थांबवणार नाही, पक्षाचा शिवसैनिक लढणारा आणि जिंकणारा आहे, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारासाठी मातोश्रीवर ठाकरे गटाची आढावा बैठक पार पडली होती. या बैठकीत अनेक जुन्या नगरसेवकांनी जाहीरपणे नाराजी बोलून दाखवली. मातोश्रीवर होणाऱ्या पदाधिकारी आढावा बैठकीत देखील माजी नगरसेवकांना बोलवले जात नाही. विधानसभा निवडणुकीत देखील विधानसभा मतदारसंघात उमेदवार देताना माजी नगरसेवकांना विश्वासात घेतले नव्हते, अशी तक्रार एका नगरसेवकाने केली होती.

एकसंध शिवसेना असताना पक्षाचे नगरसेवक इतक्या उघडपणे नाराजी व्यक्त करण्याची हिंमत करत नव्हते. मात्र, विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे. त्यामुळे आता पक्षातील नाराजांना उघडपणे नेत्यांच्या धोरणांवर टीका करण्याचा आत्मविश्वास आल्याचे दिसत आहे. यापैकी अनेकजण आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी भाजप किंवा शिंदे गटाची वाट धरण्याची शक्यता आहे. बहुतांश नाराज नगरसेवकांची पसंती भाजपला असल्याची चर्चा आहे. त्यामुळे येत्या काळात हे नाराज नगरसेवक काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT