Vishwajit Kadam, Vishal Patil, Udhav Thackeray, Chandrahar
Vishwajit Kadam, Vishal Patil, Udhav Thackeray, Chandrahar Patil sarkarnama
महाराष्ट्र

Sangli Politics: हेतू स्पष्ट झाला... ठाकरे वडिलांसमान, समजून घेतील; चंद्रहार पाटलांना चितपट करणाऱ्या पाटलांना कॉन्फिडन्स

Jagdish Patil

Vishal Patil on Uddhav Thackeray: आमचा हेतू स्पष्ट झाला असून उद्धव ठाकरे आमच्या वडिलांसमान आहेत. त्यामुळे ते आम्हाला समजून घेतील असा विश्वास शिवसेनेच्या उमेदवाराला पराभूत करणाऱ्या अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी व्यक्त केला आहे. सांगली लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडून आलेले खासदार विशाल पाटील यांनी काँग्रेसचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारले. तसे पत्र त्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना दिलं.

मात्र, पाटील यांनी दिल्लीवारी केल्यापासून आता महाविकास आघाडीतील मित्रपक्ष आणि सांगलीची जागा लडवणाऱ्या शिवसेनेने काँग्रेसच्या या मिलीभगतवर नाराजी दर्शवली आहे. सांगलीत काँग्रेसने आघाडीच्या उमेदवाराला मदत न करता अपक्ष उमेदवाराला मदत केली.

त्यांनी आघाडी धर्म पाळला नाही याचा राग शिवसेना ठाकरे गटाच्या मनात असल्याचं लपून राहिलेलं नाही. त्यामुळे काँग्रेस नेते विश्वजीत कदम आणि सांगली लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी आता शिवसेनेची नाराजी दूर करण्याच्या प्रयत्नात असल्याचं दिसत आहे

सांगली जिल्ह्यातील परिस्थिती वेगळी होती, उद्धव ठाकरेंना वेळ पाहुन भेट घेऊ असं वक्तव्य विश्वजीत कदम यांनी केलं आहे. त्यामुळे ठाकरेंच्या मनधरणीसाठी कदम-पाटील जोडगोळी लवकरच मातोश्रीवर जाणार असल्याचं बोललं जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर बोलताना विश्वजीत कदम म्हणाले, "आम्ही शिवसेनेवर नाराज नाही. पण मेरिटवर जागा वाटल्या गेल्या पाहिजे हे ठरलं होतं. ज्या एक दोन जागा भाजपला मिळाल्या त्या देखील मिळाल्या नसत्या. सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. आम्ही सगळे इंडिया आघाडीसोबत होतो. विशाल पाटील हे देखील आमचाच घटक आहेत."

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना माझ्या विजयाचे श्रेय

दरम्यान, काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी आपल्या विजयाचं श्रेय काँग्रेस कार्यकर्त्यांना दिलं. पाटील म्हणाले, "अपक्ष उमेदवाराला एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान मिळणं हे क्वचितच घडतं. काँग्रेस पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांना माझ्या विजयाचे श्रेय जातं. जनतेने भाजपचा पराभव केला. जनतेने आणि आम्ही ठरवलं होतं भाजपचा पराभव करायचा.

प्रत्येक जिल्ह्याची राजकीय परिस्थिती वेगळी असते. सांगलीची परिस्थिती आम्ही सातत्याने मांडत होतो. जिल्ह्यातल्या मतदारांच्या मनात काय हे आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत होतो. जनतेने ही निवडणूक हातात घेतली. सांगली हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे."

उद्धव ठाकरे आमच्या वडिलांसमान

तर महाविकास घाडीचा हेतू साध्य झाला असून उद्धव ठाकरे आम्हाला समजून घेतील अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, "महाविकास आघाडीचा हेतू होता भाजपचा पराभव करणे तो हेतू स्पष्ट झाला. बाळासाहेब ठाकरेंचे आणि वसंतदादा घराण्याचे चांगले सबंध होते. वसंतदादांचा नातू निवडून आल्यामुळे ठाकरे मनात राग धरणार नाहीत. निवडणुकीत जे घडलं त्यातून कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता. उद्धव ठाकरे आमच्या वडिलांसमान आहेत. ते आम्हाला समजून घेतील. आम्ही काँग्रेसी विचारांचे आहोत. काँग्रेससोबतच राहणार."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT