Zelensky Meets Trump in Washington news Sarkarnama
महाराष्ट्र

Donald Trump: लै नुकसान केलंय झेल्यानं! त्याला सांगा माझ्या नादी नको लागूस, नाय तर ‘रासपुतीन’ जागा होतो....

Zelensky Meets Trump news: पुतीनमामांचं आगमन होतं. ट्रम्प तात्यांनी त्यांच्यासाठी आधीच लाल पायघड्या घातलेल्या असतात. ते पुतीनरावांचं स्वागत करतात. दोघं हस्तांदोलन करून अभिवादन करतात. तोपर्यंत दोघांच्या डोक्यांवरून आकाशातून अमेरिकेची बॉम्बर विमानं घरघरत जातात. पुतीन-ट्रम्प वर पाहतात. त्यांच्यातील हा औपचारिक अन् अनौपचारिक संवाद

सरकारनामा ब्यूरो

अभय नरहर जोशी

स्थळ : आलास्का

ट्रम्प तात्या ( स्वगत - आलास्काला आलास का बाबा एकदाचा) :

काय पुतीनमामा कसं काय बरं आहे ना. प्रवास कसा झाला?

पुतीनमामा : छान. प्रवास सुखरूप झाला. पण मघाशी डोक्यावरून विमानं घरघरवत नेली. तेव्हा थोडा वेळ वाटलं तो झेले अण्णा हल्ला करतो की काय?

तात्या : झेले अण्णा कोण बुवा?

मामा : तोच तो. ‘नाटो’त सामील होऊन नाट लावणारा. भांडणं काढणारा उक्रून काढणारा. उक्रेनवाला.

तात्या : उक्रेन म्हंजे युक्रेनवाला झेलेन्स्की म्हणायचंय तुम्हाला.

मामा (फणकाऱ्यानं) : नाव नाय घ्यायचं मला त्या झेले अण्णाचं.

तात्या : बोलू. सबुरीनं घ्यावं माणसानं. किती तो राग... माझ्यासारखं शांत आणि समंजसपणे वागा मामा.

मामा (स्वगत- आँ. तुम्ही अन् समंजसपणा, या हिशेबानं हिटलरला शांतिदूतच म्हंटलं पाहिजे) : बरं बरं. बोला काय बोलायचं ते.

तात्या : कसं वाटतंय अमेरिकेच्या महान भूमीवर आल्यानंतर...

मामा : पस्तावल्यासारखं वाटतंय.

तात्या : आँ. असं का वाटतंय मामा?

मामा : अहो ही कसली तुमची महान भूमी. हा आलास्का प्रांत आम्हीच तुम्हाला विकलाय कधी काळी. मी असतो तर तसं केलंच नसतं कधी. येथे नंतर तुम्हाला सोनं सापडलं, खनिज तेल सापडलं. तेव्हा या आलास्काला रशियातून गेलास का बाबा, असं विचारावंसं वाटतंय म्हणून पस्तावलोय.

तात्या : चालायचंच मामा. आता असं पस्तावू नका. मी तर कॅनडा पण घ्यायला निघालोय. असो.

मामा : चला मुद्द्याचं बोला. मला वेळ नाहीये फार.

तात्या : त्या झेले अण्णाला मी समजावून सांगतो. तुम्ही आता हे भांडण आवरा.

मामा : बघू. विचार करू. त्या झेल्याला सांगा माझ्या नादी नको लागूस. माझ्याशी चांगलं वागलं तर मी पुतीन आहे. नाय तर मग माझ्यातला ‘रासपुतीन’ जागा होतो.

तात्या : हा ‘रासपुतीन’ कोणाय ब्वॉ?

मामा : तुम्ही नका फार विचार करू. नाय समजायचं तुम्हाला.

तात्या : हे बघा मी आतापर्यंत सहा युद्ध बंद केलीत. तुमचं सातवं बंद करायचंय मला. (स्वगत - शांततेचं ‘नोबेल’ मिळायला किती युद्ध बंद करावी लागतील कुणास ठाऊक?) मागच्या वेळी त्या भारत-पाकिस्तानला मीच बजावलं की थांबवता की नाय युद्ध. नाय तर तुमचं धंदापाणी अन् हुक्कापाणी बंद.

मामा : मला धमकी देताय की काय?

तात्या (वरमून) : नाही हो. सांगतोय फक्त. त्यांची गोष्ट वेगळी. तुमची वेगळी. तुम्ही टाका मिटवून आता.

मामा : माझ्या मनासारखं झाल्याशिवाय नाय मिटवणार. लै नुकसान केलंय त्या झेल्यानं.

तात्या : झेलेन्स्कींशीही बोलतो. मागच्या वेळी चांगला झाडलाय त्याला. मी आणि आमच्या उपाध्यक्षानं. यावेळी त्याला बोलावून सबुरीनं समजावतो.

मामा : मग आधी त्याला सांगा अन् मला कळवा. मी निघालो.

काही दिवसांनंतर.

स्थळ : पांढरं व्हाईट्ट हाऊस

प्रसंग : ट्रम्प-झेलेन्स्की भेट

तात्या : या झेलेअण्णा या.

झेलेन्स्की (गोंधळून) : हा झेलेअण्णा कोण?

तात्या : अहो पुतीनमामांनी तुमचं लाडाचं नामकरण केलंय.

झेलेअण्णा : काय तात्या. पुतीनमामा आमचं विलीनीकरण करायला निघालेत. माझं कशाला नामकरण करतील?

तात्या : जाऊ द्या. विषयांतर नको. चला मुद्द्याचं बोलू.

अण्णा : तात्या, हे तुमचं नेहमीचंच झालंय. मला इथं बोलवायचं अन् झाप झाप झापायचं. या व्हाईट्ट हाऊसात माझं थोबाड अपमान करून काळठिक्कर पाडता तुम्ही. त्यात तुमचा हा उपाध्यक्ष व्हान्स आणखी आग लावतो.

तात्या (संताप आवरत मनात ‘नोबेल’, ‘नोबेल’ जप करतात) : हे बघ भांडण आवर. तुमचे लोक मरत असताना बघवत नाही. हे थांबवायला हवंय. व्हान्स यावेळी काही पण बोलणार नाहीये.

अण्णा : हे बघ. माझं ऐकायचं आता. मी पुतीनमामांला फोन लावतो. समोरासमोर बसून भांडण मिटवा. लै झालं आता. मी सहा युद्ध थांबवलीत. तुमच्याबाबतीतही मला यश येऊ द्या. मी काही तुम्हाला थेट शस्त्रबिस्त्र देणार नाय. आता बास.

अण्णा : आम्ही तुमच्याकडून घेतच नाही शस्त्र. ‘नाटो’कडून घेतो.

तात्या : अरे मेल्या, ‘नाटो’वाले माझ्याकडूनच ही शस्त्र विकत घेतात. ते थांबवायचंय मला. जगात शांती हवीये मला. एकदम शांती.

झेलेन्स्की : हे इतके दिवस समजत नव्हतं का?

तात्या (चिडून) : त्या भ्रष्ट बायडेनमुळं हे युद्ध सुरू झालंय. हे मी थांबवून मी शांतता प्रस्थापित करणार आणि...

अण्णा : आणि शांततेचे नोबेल मिळवणार.

तात्या (उफाळलेल्या रागानं) : माझं पायताण काढतो आता. (भानावर येत) नाय लै खाजतंय म्हणून म्हणतोय. कोण आहे रे तिकडे. यांना आतल्या खोलीत घेऊन जा. पुढच्या वाटाघाटी बंद खोलीतच करतो त्यांच्याशी.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT